पंतप्रधानांची जबाबदारी प्रणव मुखर्जी आणि ऍन्टोनी सांभाळणार

January 25, 2009 7:12 AM0 commentsViews: 2

25 जानेवारी, दिल्लीपंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अनुपस्थित त्यांच्या जबाबदारीची विभागणी करण्यात आली आहे. प्रणव मुखर्जी अर्थमंत्रालयाचं खातं सांभाळतील. तर संरक्षणमंत्री ए. के. ऍन्टोनी प्रजासत्ताक दिनाचे सर्व सोपस्कार पार पाडतील. प्रणव मुखर्जी प्रभारी पंतप्रधान असणार नाहीत, असं सरकारनं स्पष्ट केलंय. सोनिया गांधी मनमोहन सिंग तंदुरुस्त होण्याची वाट पाहत आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये अनुपस्थित राहणारे मनमोहन सिंग हे पहिलेच पंतप्रधान असतील.पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर सर्जरी झाली असली तरी सरकारचं कामकाज सुरळितपणे पार पाडण्याची हमी त्यांनी दिलीय. शुक्रवारी हॉस्पिटलमध्ये भर्ती होण्यापूर्वी त्यांनी सर्व ज्येष्ठ मंत्री आणि सहकार्‍यांना सूचना दिल्या होत्या. मनमोहन सिंग यांच्या जबाबदार्‍यांची परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी आणि संरक्षणमंत्री ए. के. ऍन्टोनी यांच्यात विभागणी करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनी पंतप्रधानांचे सर्व सोपस्कार संरक्षणमंत्री ए. के. ऍन्टोनी पार पाडणार आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या परेडपूर्वी इंडिया गेटवरच्या कार्यक्रमाला ऍन्टोनी उपस्थित राहतील. राजपथवर राष्ट्रपती प्रतिभा पाटील आणि कझाकस्तानचे अध्यक्ष नूरसुलतान नझरबायेव यांचं स्वागतही तेच करतील. नझरबायेव हे यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे आहेत. 28 जानेवारीला होणार्‍या एनसीसीच्या वार्षिक रॅलीलाही ऍन्टोनीच संबोधित करतील. फेब्रुवारीच्या सोळा तारखेला संसदेचं अधिवेशन सुरू होत आहे. त्यावेळी राष्ट्रपतींच्या अभिभाषणालाही प्रणव मुखर्जी उत्तर देतील. पंतप्रधानांच्या अनुपस्थितीत सरकारमध्ये नंबर दोनवर असलेल्या प्रणव यांच्याकडे ही जबाबदारी येणं साहजिक आहे. पण, म्हणून त्यांच्याकडे कोणी भावी पंतप्रधान म्हणून पाहू नये, याची काळजीही सोनिया गांधी यांनी घेतली आहे. म्हणूनच कदाचित त्यांची नेमणूक प्रभारी पंतप्रधान म्हणून केली गेली नाही. कुणीही नाराज होऊ नये यासाठी जबाबदार्‍यांची विभागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर सध्यातरी मनमोहन सिंग यांच्याजागी कुणाचीही वर्णी लागणार नाही, असा स्पष्ट संदेश सोनियांनी दिला आहे.

close