NSDच्या संचालकपदी वामन केंद्रेंची निवड

July 25, 2013 4:37 PM0 commentsViews: 201

waman kendre25 जुलै : नाट्य पंढरी अर्थात ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’च्या संचालकपदी ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक वामन केंद्रे यांची निवड झाली आहे. गेल्या 60 वर्षांत एनएसडीच्या संचालकपदी पहिल्यांदाच मराठी माणसाची निवड झाली असून वामन केंद्रे हे पहिले मराठी संचालक ठरले आहे.

एनएसडीच्या संचालक पदासाठी देशभरातून 60 अर्ज आले होते. यात श्याम बेनेगल, गिरीष कर्नाड यांचा समावेश होता. एनएसडीच्या अध्यक्षा अमल अलाना यांच्या समितीने अर्जाची छाननी करून तीन जणांची नाव काढली. यात वामन केंद्रे यांचासह अरुंधरी नाग, अब्दुल लतिफ खटाना यांचा समावेश होता. अखेर वामन केंद्रे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.

प्रा. वामन केंद्रे हे  मुंबई विद्यापिठाच्या नाट्यशास्त्र विभागाचे संचालक आहेत. वामन केंद्रे यांनी नॅशनल थिअटर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स या संस्थेतून नाट्य शिक्षण घेतलंय. त्यांनी भासकवीच्या मध्यम व्यायोग या नाटकाचे ’प्रिया बावरी’ या नावाने मराठी रूपांतर केले आहे.कवी भास रचित ‘मध्यमव्यायोग’ या संस्कृत नाटकाचा मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीन भाषांतला प्रयोग केंद्रे यांनी मुंबईतील ‘एनसीपीए’मध्ये सादर केला होता. वामन केंद्रे यांनी दिग्दर्शित केलेले हे नाटक पंडूपुत्र भीमसेन, हिडिंबा आणि त्यांचा मुलगा घटोत्कच यांच्या जीवनावर बेतलेले आहे. भासाच्या या मूळ संस्कृत नाटकाचे मराठी रूपांतरही प्रा. केंद्रे यांनीच केले आहे. तसंच त्यांची झुलवा, रणांगण, राहिले दूर घर माझे, ती फुलराणी ही नाटकं गाजली.

close