दहशतवादाविरोधात जगानं एकत्र यावं- राष्ट्रपती

January 25, 2009 4:09 PM0 commentsViews: 5

25 जानेवारी दिल्लीप्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी देशाला उद्देशून दूरदर्शनवरून भाषण केलं. या भाषणात त्यांनी दहशतवादाविरोधात सा-या जगानं एकत्र यावं असं आवाहन केलं. दहशतवादाची पाळमुळं आता सर्वत्र पसरली आहेत. त्यामुळे आता दहशतवादाचं समूळ उच्चाटन करण्यासाठी जगाला एकत्र येऊन प्रयत्न करायला हवेत, असं राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी म्हटलं. देशाच्या विकासासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याचं आवाहन त्यांनी या भाषणात केलं. दरम्यान प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीतही कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षा दलाचे 25 हजार जवान तैनात करण्यात आले आहेत. कमांडोंचा खडा पहारा आणि हवाई निरीक्षण करण्यात येतं आहे. यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनी भारताला अनेक दहशतवादी संघटनांकडून धोका आहे. गुप्तचर संस्थांकडून याबाबतचे नेमके इशारे पहिल्यांदाच देण्यात आले आहेत. दिल्ली आणि चंदीगडमध्ये चॉपरच्या साहाय्यानं अतिरेकी हल्ला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रजासत्ताक दिनी चॉपर्सना परवानगी नाकारण्यात आली आहे. तसंच, चॉपर भाड्यानं घेण्यासाठीची मार्गदर्शक तत्वं तयार केले जातायत. दक्षिणेतल्या एअरपोर्ट्सना एकाच महिन्यात विमान अपहरणाच्या तीन धमक्या मिळाल्या आहेत. आसाम, झारखंड, पश्चिम बंगालमध्ये फिदायीन हल्ल्याचा धोका आहे. 50 अतिरेक्यांनी इथे बांग्लादेशातून घुसखोरी केल्याची माहिती मिळाली आहे.

close