आघाडीच्या नावानं चांग भलं !

July 26, 2013 2:58 PM0 commentsViews: 496

cm and ajit dada26 जुलै : : ‘तुझ माझ जमेना पण तुझ्या वाचून करमेना’ अशी साद देत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने निवडणुकांसाठी मतभेद, आरोप-प्रत्यारोप, टीका-टिप्पणी विसरून जुळवून घेतलं आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत निवडणूकपूर्व आघाडीचा निर्णय घेतल्यानंतर आता राज्यातही सगळीकडे आघाडीचा धर्म पाळण्याचा निर्णय काँग्रेस -राष्ट्रवादीने घेतलाय. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या बैठकीत हा निर्णय झाला.

त्यानुसार यवतमाळ जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी शिवसेनेची साथ सोडणार आणि सेनेला दिलेली दोन्ही सभापतीपदं काँग्रेसला देणार आहे. तर उस्मानाबाद जिल्हा परिषदेत काँग्रेस शिवसेनेची साथ सोडणार आणि राष्ट्रवादीला तीन सभापतीपदं देणार आहे. सध्या ही सभापतीपदं शिवसेनेकडे आहेत. अशाच पद्धतीने इतर ठिकाणी सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादी विरोधी पक्षांशी केलेली हातमिळवणी तोडून एकत्र येणार आहे.

अलीकडेच सांगली महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस विरूद्ध राष्ट्रवादी असा सामनाच रंगला होता. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी जयंत पाटील यांच्याबद्दल गौप्यस्फोट केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, आर.आर.पाटील, जयंत पाटील यांनी  काँग्रेस नेत्यांवरच एकच टीकास्त्र सोडलं होतं. मात्र तरीही पालिकेत निवडणुकीत राष्ट्रवादीचा पराभव झाला. राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या अशा वागण्यावर काँग्रेस नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत दिल्ली गाठली होती. आता निवडणुकीच्या पडघम वाजायला सुरूवात झालीय. त्यामुळे कोणतीही टोकाची कारवाई न करत जुळवून घ्या असा सबुरीचा सल्ला श्रेष्ठींनी दिलाय.

close