कथेचा ‘श्रीमंत’ विस्तार !

July 26, 2013 8:04 PM0 commentsViews: 1590

अमोल परचुरे, समीक्षक

नाटकाच्याच नावाचा सिनेमा आहे ‘श्रीमंत दामोदरपंत’… केदार शिंदे या लेखक-दिग्दर्शकाने फँटसीवर आधारलेल्या अनेक कल्पना वापरून अनेक नाटकं तुफान लोकप्रिय केली. अशीच एक फँटसी दामोदरपंतांची…सहा वाजले की दामूचा दामोदरपंत होतो आणि मग दिवसभर दामूला फारसं महत्त्व न देणारे घरातले सदस्य दामोदरपंतांच्या दिमतीला उभे राहतात अशी ही कल्पना..आधी रंगमंचावर आणि नंतर सीडी-डीव्हीडी आणि युट्यूबवर या नाटकाने जबरदस्त यश मिळवलं. याच नाटकावर सिनेमा बनवताना केदारने या कल्पनेचा बराच विस्तार केलाय. नाटकाचा सिनेमा न करता नाटकातल्या थीमवर आधारित सिनेमा बनवलाय. केदारने आत्तापर्यंत आपल्याच नाटकावर सिनेमे बनवलेले आहेत, पण त्यांना फारसं यश मिळू शकलं नाही. श्रीमंत दामोदरपंत हा सिनेमा मात्र त्याबाबतीत नक्कीच अपवाद ठरू शकेल असं वाटतंय.

shrimant damodar pant movie

काय आहे स्टोरी?

दामोदरपंत म्हणजे नेमके कोण या गोष्टीपासून सिनेमाची सुरुवात होते. स्वातंत्र्यलढयातला त्यांचा पराक्रम, लखोबाबरोबरची दुश्मनी, त्यांचं मुंबईत येऊन स्थायिक होणं हा सगळा इतिहास सांगितल्यानंतर सिनेमा पुढे सुरू होतो. दामूच्या अंगात संध्याकाळी सहानंतर दामोदरपंतांचा प्रवेश होणं ही घटना एखाद्या उत्सवासारखी सिनेमात दाखवण्यात आलीये. बरं, इथं केवळ घरातले सदस्यच नाहीत तर वाड्यात राहणारे सगळे भाडेकरु जुना काळ जिवंत करण्यासाठी झटत असतात. वाड्यामध्ये दामोदरपंतांचा दरबारच भरतो. नाटकामध्ये जे विनोद येऊन गेलेत त्यातले बरेचसे विनोद, प्रसंग इथे रिपीट झालेले नाहीत हे महत्त्वाचं…कथेचासुद्धा पूर्ण वेगळा विचार करण्यात आलेला आहे. दामूच्या बहिणीच्या लग्नासाठी सगळ्या भाडेकरुंचं वर्‍हाड सातार्‍याला जातं आणि तिथे लखोबाच्या नातवाबरोबर त्यांचा सामना होतो आणि मग प्रियदर्शनच्या सिनेमात शोभेल अशी धावपळ, पाठलाग, गैरसमज, हाणामारी अशी सगळी धमाल घडते.
नवीन काय?

दामोदरपंतांची एंट्री असो किंवा त्यांचा दरबार, केदारने शक्य होईल तेवढा ‘ग्रँडनेस’ दाखवायचा प्रयत्न केलाय. या प्रयत्नांना कलाकारांचीसुद्धा चांगली साथ मिळालीये. भरत जाधव आणि विजय चव्हाण यांची जुगलबंदी सिनेमातही आहे, पण दामूच्या आईच्या रोलमध्ये अलका कुबल यांना पाहणं हासुद्धा एक चांगला चेंज आहे. अभिनय सावंतच्या हिरोगिरीमध्ये अजून नवखेपणा आहे. दामू आणि दामोदरपंत या दोन्ही अवतारांमध्ये भरतने मस्तच काम केलंय, फक्त गोड गोजिरी गाण्यावर त्याचा डान्स प्रेक्षक नक्कीच मिस करतील. खलनायकाच्या रोलसाठी सुनील बर्वेची निवडसुद्धा विचारपूर्वक केल्यासारखी वाटते, सुनीलचा व्हिलन वाटतोही भारदस्त… शेवटी एवढंच.. नाटक भयंकर आवडलं म्हणून सिनेमा बघायला गेलात तर कदाचित तुमचा अपेक्षाभंग होईल,अन्यथा एक खुसखुशीत कॉमेडी सिनेमाचा आनंद नक्कीच मिळेल.
श्रीमंत दामोदरपंत : रेटिंग – 60
 

close