बँकेत पैसे भरा नाहीतर ठार मारू !

July 27, 2013 6:15 PM0 commentsViews: 1573

प्रवीण मुधोळकर, नागपूर

27 जुलै : बँकेच्या कर्ज रिकव्हरीच्या पद्धतीबद्दल लोकांच्या कायम तक्रारी असतात. नागपूरमध्ये मात्र न वापरलेल्या क्रेडीट कार्डचे पैसे भरावे म्हणून धमकवल्याचा आरोप होतोय. नागपूरच्या सुनील कुमार पांडे यांना गेल्या एप्रिल महिन्यात आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडीट कार्ड डिपार्टमेंटकडून फोन आला. आणि क्रेडीट कार्डचे पैसे भरायला सांगण्यात आलं. पण आपण आयसीआयसीआयचं कोणतही क्रेडीट कार्ड घेतलं नसल्याचं पांडे यांनी स्पष्ट केलं. मात्र या उत्तरानंतरही बँकेच्या रिकव्हरी एजंटने पांडे यांना पैसे न भरल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

नागपूरमधल्या बँकेच्या सिव्हील लाईन ब्रँचमध्ये सुनील पांडेंनी याबाबत जाब विचारला. तेव्हा त्यांना सुनील लक्ष्मीकांत पांडे या व्यक्तीकडे बँकेच्या क्रेडीट कार्डचे पैसे थकित असल्याचं सांगण्यात आलं. या स्पष्टीकरणानंतरही पांडेंना मात्र धमकीचे फोन येतच राहिले. या संदर्भात पांडे यांनी बँकेच्या मॅनेजिंग डायरेक्टर चंदा कोचर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. अखेर बँकेनं पांडेंना झालेल्या मनस्तापाबद्दल खेद व्यक्त करत 25 हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचं मान्य केलं.
मात्र आता आयसीआयसीआय बँकेचे अधिकारी आणि स्थानिक राजकारण्यांनी सुनील पांडे यांच्यावर पोलीस तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकायला सुरवात केलीय. पण आयसीआयसीआय अशा प्रकारांना आळा घालत नाही तो पर्यंत आपला लढा सुरूच राहणार असल्याचा निर्धार पांडे यांनी केलाय.

close