स्पॉट फिक्सिंग :दाऊदसह 39 जणांवर आरोपपत्र दाखल

July 30, 2013 5:55 PM0 commentsViews: 397

daud ibrahim30 जुलै : आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आज चार्जशीट दाखल केलंय. 6 हजार पानांच्या चार्जशीटमध्ये कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम आणि छोटा शकीलचं नाव आहे. दाऊद सट्‌ट्याचे रेट ठरवत होता असा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. तर राजस्थान रॉयल्सचे तीन खेळाडू अजित चंडिला, अंकित चव्हाण आणि एस श्रीसंत यांची नावंही या चार्जशीटमध्ये आहेत. याप्रकरणी एकूण 39 जणांविरुद्ध आरोपपत्र तयार करण्यात आलंय. यात 21 जण सध्या जामिनावर बाहेर आहेत, तर 10 जण अजून फरार आहेत.

16 मे रोजी भारतीय किक्रेट विश्वाला एकच हादरा बसला. दिल्ली पोलिसांनी आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंग झाल्याचं पुराव्यानिशी जगासमोर आणलं. या प्रकरणी राजस्थान रॉयलचे खेळाडू एस.श्रीसंत, अंकित चव्हाण आणि अजित चंडिलाला अटक झाली आणि 15 दिवसांची तुरूंगात रवानगी करण्यात आली. मात्र आता सर्व खेळाडूंची जामिनावर सुटका झालीय.

या संपूर्ण प्रकरणात अंडरवर्ल्डचे संबंध असल्याचं उघड झालं. दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या चंद्रेश या बुकीचे दुबईमध्ये असलेल्या सुनील अभिचंदानी उर्फ सुनील दुबई या बुकीशी संबंध असल्याचं तपासात उघड झालंय. या सुनील अभिचंदानीचे डी कंपनीशीही संबंध असल्याचा संशय दिल्ली पोलीस व्यक्त केला होता. सुनील अभिचंदानीविरोधात 2012 मध्ये लूकआऊट नोटीस बजावली होती. सुनील अभिचंदानी हा पाकिस्तान आणि दुबईतल्या बुकीजबरोबर कार्यरत असल्याचं स्पष्ट झालंय.

तसंच दाऊदचा उजवा हात छोटा शकील अनेक बुकींच्या संपर्कात होता. स्पॉट फिक्सिंग प्रकरणी अटक सत्र सुरू झालं होतं तेव्हा अनेक बुकींनी दुबईला पलायन केलं होतं. या सर्व बुकींना शकीलने आश्रय दिला होता. विशेष म्हणजे या प्रकरणी पोलिसांनी डी कंपनीचं थेट नावं घेतलं नव्हतं. मात्र जसाजसा तपास पुढे सरकत राहिला फिक्सिंगचे धागेदोरे डी कंपनीशी जोडले गेले असल्याचं स्पष्ट झालं.

अजित चंडिलाची फिक्सिंग

5 मे रोजी जयपूरमध्ये पुणे वॉरिअर्सविरुद्ध झालेल्या मॅचमध्ये अजित चंडिलानं पहिल्यांदा स्पॉट फिक्सिंग केल्याचा खुलासा दिल्ली पोलिसांनी केला. चांदिलियाच्या स्पेलमध्ये दुसर्‍या ओव्हरमध्ये अजित 20 रन्स देणार हे ठरलं होतं आणि त्यासाठी किंमत 20 लाख पक्की झाली होती. पण या मॅचमध्ये अजित चांदिलियानं ठरलेली खूण ओव्हरअगोदर बूकीजना दिली नाही त्यामुळे या मॅचचे पैसे अजित चांदिलियाकडून बूकीजनं परत मागितले होते. – 5 मे 2013, जयपूर – राजस्थान रॉयल्स विरुद्ध पुणे वॉरियर्स- दुसर्‍या ओव्हरला 14 पेक्षा जास्त रन्स देण्यासाठी 20 लाख रुपये – बूकीजना खूण दिली नाही, त्यामुळे बूकीजनं पैसे मागितले परत

श्रीसंतची फिक्सिंग

9 मे रोजी मोहालीमध्ये पंजाब किंग्ज इलेव्हन विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये श्रीसंतनं स्पॉट फिक्सिंग केल्याचा खुलासा पोलिसांनी केला. श्रीसंतनं त्याच्या स्पेलच्या दुसर्‍या ओव्हरमध्ये 14 पेक्षा जास्त रन्स देण्याचं मान्य केलं होतं. त्यासाठी त्यानं आपण टॉवेल आपल्या पँटला लावू ही खूण ठरवली होती.

– 9 मे 2013, मोहाली- राजस्थान रॉयल्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब- पँटमध्ये टॉवेल लावण्याची ठरली होती खूण

 

अंकित चव्हाणची फिक्सिंग

तर 15 मे रोजी मुंबईमध्ये मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये अंकित चव्हाणने स्पॉट फिक्सिंग केल्याचा खुलासा पोलिसांनी केला. अंकितनं त्याच्या स्पेलच्या दुसर्‍या ओव्हरमध्ये 14 पेक्षा जास्त रन्स देण्याचं कबूल केलं होतं. आणि त्यासाठी त्याला 60 लाख रुपये दिले गेले. पण हे डील अंकित चव्हाणनं केलं नव्हतं तर अजित चांदिलियानं अंकित चव्हाणला भुरळ घालत स्पॉट फिक्सिंग करायला भाग पाडलं होतं.

– 15 मे 2013, मुंबई- राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स- दुसर्‍या ओव्हरला 14 पेक्षा जास्त रन्स देण्यासाठी 60 लाख रुपये – अजित चंडिलानं अंकित चव्हाणला स्पॉट फिक्सिंगसाठी केलं तयार

 

अंकित चव्हाणचं करिअर

– वय: 27 वर्ष – IPLमध्ये ‘राजस्थान रॉयल्स’ टीमचं प्रतिनिधित्व – याआधी ‘मुंबई इंडियन्स’ टीमचंही प्रतिनिधित्व केलंय. – ऑलराईंडर, डावखुरा बॅट्समन – फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये ‘मुंबई टीम’चं प्रतिनिधित्व

 

अजित चंदेलियाचं करिअर

– वय: 29 वर्ष – IPLमध्ये ‘राजस्थान रॉयल्स’ टीमचं प्रतिनिधित्व- ऑलराऊंडर, ऑफ ब्रेक बॉलर – याआधी ‘दिल्ली डेअरडेव्हिल्स’ टीमचंही केलं प्रतिनिधित्व- फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये हरयाणा टीमचं प्रतिनिधित्व- 2012: IPLमध्ये ‘पुणे वॉरियर्स’विरूध्द घेतली होती हॅट्‌ट्रिक

close