पुणेकरांचे 1300 कोटी गेले ‘खड्‌ड्यात’!

August 1, 2013 9:13 PM0 commentsViews: 302

अद्वैत मेहता, पुणे

01 ऑगस्ट : पावसाळा आला की रस्त्यांवरच्या खड्‌ड्यांचा प्रश्न गंभीर बनतो..पुणेही याला अपवाद नाही. पुण्यात गेल्या 5 वर्षात खड्डे दुरुस्तीवर तब्बल 1300 कोटी रुपये खर्च झालेत.पण हा सर्व पैसा खड्‌ड्यातच गेल्याचं चित्र पाहिला मिळतंय. प्रशासनातले भ्रष्ट अधिकारी आणि ठेकेदारांमधली अभ्रद युती याला जबाबदार असल्याचा आरोप होत असून कडक नियामावलीची अंमलबजावणी करण्याची मागणी पुणेकर करत आहे.
पुणे महापालिकेच्या मुख्य बजेटमधे तसंच वॉर्ड ऑफिसच्या अंदाजपत्रकात दरवर्षी नवीन रस्ते तयार करणं आणि खड्डे दुरूस्तीकरता 300 ते 600 कोटींची तरतूद केली जाते. गेल्या 5 वर्षात याकरता 2,391 कोटींची तरतूद करण्यात आली, आणि प्रत्यक्षात यासाठी 1,300 कोटी रूपये खर्च झालाय. पण इतका मोठा खर्च होऊनही पावसाळ्यात पुण्यातल्या रस्त्यांवरच्या खड्‌ड्यांची परिस्थिती जैसे थेच आहे. हे चित्र बदलायचं असेल तर टेंडर पद्धती आणि नियमावलीत बदल करा असं सामाजिक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.
टीका झाल्यावर प्रशासनाकडून खड्डे तात्पुरते बुजवले जातात. पण पावसाचा जोर वाढला की, पुन्हा खड्‌ड्यांचं साम्राज्य सुरु होतं आणि अपघातांना आमंत्रण मिळतं. प्रशासनाकडून होत असलेल्या फसवणुकीला आता पुणेकरही वैतागलेत.
खासदार सुरेश कलमाडी यांच्याकडून महापालिकेची सत्ता अजित पवारांनी खेचून आणली. महापालिकेतलं सुरेशभाईंचं वर्चस्व ढासळायला खड्डे हे महत्वाचं कारण होतं. पण बहुदा याचा विसर पुण्याचे पालकमंत्री अजितदादांना पडला असावा.

close