विदर्भात ‘भर’पूर, यवतमाळमध्ये 800 लोक अडकले

August 2, 2013 3:12 PM0 commentsViews: 732

vidharbha rain4402 ऑगस्ट : जोरदार पावसामुळे विदर्भात पूरपरिस्थिती गंभीर बनलीय. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पुरानं थैमान घातलंय. गोसीखुर्द धरणाचे 33 दरवाजे 3 मीटरनं उघडण्यात आल्याने वैनगंगा नदीनं उग्र रुप धारण केलंय. प्राणहिता नदीही धोक्याच्या पातळीपेक्षा वर वाहत आहेत. त्यामुळे चंद्रपूर आणि गडचिरोली शहरांसह अनेक गावांमध्ये पाणी घुसलंय.

इरई धरणाचं पाणी चंद्रपुरात घुसल्यानं दोन जण वाहून गेलेत. सिरोंचा आणि अहेरी तालुक्यात प्राणहिता नदी धोक्याच्या पातळीवर वाहतेय. दोन तालुक्यांना पाण्याचा वेढा पडलाय. सिरोंचा तालुक्यात तीन दिवसांपासून वीज आणि टेलिफोन सेवा ठप्प झालीय. चंद्रपूर शहराला इरई धरणाच्या पाण्याचा वेढा पडलाय. यामुळे 25 टक्के शहर जलमय झालंय. 1000 कुटुंबांना सुरक्षीत स्थळी हलवण्यात आलंय.

तर यवतमाळमध्येही पूरस्थिती गंभीर बनलीये. वणी तालुक्यातल्या जुगाद, चिंचोली आणि झरी तालुक्यातल्या दिग्रस आणि धानोरा या गावांमध्ये एकूण 800 लोक अडकलेत. गेल्या 24 तासांपासून विदर्भाचा मराठवाड्याशी संपर्क तुटलाय.अरुणावती, इसापूर, अडाण, बेम्बळा धरण ओव्हरफ्लो झालेत. त्यांचं पाणी नदीपात्रात सोडण्यात येतंय. नद्यांना आलेल्या पुरामुळे झरी, पाटण आणि वणी तालुक्यातल्या अनेक गावांना पुराचा वेढा पडलाय, पैनगंगा, पूस, अडाण, नदीला पूर आलाय. खराब हवामानामुळे बचावकार्यासाठी हेलिकॉप्टर पाठवण्यात आलेलं नाही. पूरग्रस्त भागात बचावकार्यासाठी एलडीपीएफच पथक यवतमाळात दाखल झाल आहे. या गावातील सुमारे आठशे लोकांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरु करण्यात आलंय.

अकोल्यात पूरपरिस्थिती गंभीर

अकोल्यात जोरदार पाऊस सुरू असून बोर प्रकल्पाचे 9 दरवाजे, बेंबळा प्रकल्पाचे 8 तर लाल नाला प्रकल्पाचे 5 दरवाजे उघडलेले आहे. भंडारा-गोंदिया जिल्ह्यातही पूरपस्थिती गंभीर आहे. वाघ, गाढव, वैनगंगा नद्यांना पूर आलाय. अतिवृष्टीने आमगाव, सालेकसा, देवरी अर्जुनी मोरगाव जिल्ह्यांना पुराचा फटका बसलाय. त्यामुळे मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राला जोडणार्‍या पुलावरून दोन मीटर वरून पाणी वाहत असल्यानं दोन्ही राज्यांचा संपर्क तुटलाय.

वर्ध्यात धरणं ओव्हर फ्लो

तर वर्धा जिल्ह्यात अप्पर वर्धा धरणाचे 13 दरवाजे, लोअर वर्धाचे 31 दरवाजे दरवाजे उघडण्यात आले आहेत. पोथरा, डोंगरगाव, पंचधारा, मदनउन्नई ही धरणं ओव्हर फ्लो झालीत. धरणाचं पाणी सोडल्याने वना, वर्धा, भदाडी नद्यांना पूर आलाय. हिंगणघाट शहरातल्या जुन्या वस्तीत वना नदीचं पाणी शिरल्यानं 70 कुटुंबांना लाला लजपतराय शाळेत हलवण्यात आलंय. कान्होली कात्री या गावाला पाण्यानं वेढल्यानं जिल्ह्याशी संपर्क तुटलाय.

close