फेसबुकमुळे 11 वर्षांनंतर झाली दोन भावांची भेट !

August 2, 2013 11:08 PM0 commentsViews: 820

गोपाल मोटघरे,पुणे
02 ऑगस्ट : दूर गेलेल्या व्यक्ती सोशल नेटवर्किंग साईटमुळे आपल्या संपर्कात आणि आपल्या जवळ आल्यात…याचंच एक उत्तम उदाहरण पुण्यात पाहायला मिळालंय. फेसबुकच्या माध्यमातून अंकुश आणि संतोष या दोन सख्ख्या भावांची तब्बल 11 वर्षांनंतर भेट झाली.

 
गुरू ग्रंथ साहिबचं अस्खलित पठण करणारा हा गुरबाज सिंग, पण मुळचा अंकुश डोमले..पुण्यातून लहानपणी घर सोडून पळून गेलेल्या अंकुशची गाठ एका ट्रक ड्रायव्हरशी पडली आणि त्यानं थेट नांदेड गाठलं. इथं त्यानं शिख धर्माची दीक्षाही घेतली. पण काही वर्षांनंतर त्याला पुन्हा आपल्या घरच्यांची आठवण झाली, आणि त्यानं घरच्यांचा शोध घेण्याचं ठरवलं. यासाठी त्याला मदत झाली ती फेसबुकची. फेसबुकवर त्यानं आपल्या भावाला शोधून काढलं आणि तब्बल 11 वर्षांनंतर दोन भावांची भेट झाली.

 
अंगावर पैजामा, कुर्ता, डोक्यावर पगडी आणि कृपान अशा पोषाखात अकरा वर्षांनंतर गुरूबाज सिंग आपल्या घरी परतला. आपल्या मुलाचं बदललेलं रूप बघून सुरुवातीला त्याच्या आईनं त्याला ओळखलं नाही, पण ओळख पटल्यावर त्याच्या कुटुंबीयांचा आनंद अनावर झाला. घरी परतलेल्या अंकुशची भेट घेण्यासाठी नातेवाईकांनीही गर्दी केलीय. आपल्या माणसांना भेटुन अंकुशही आनंदी असला तरी आपलं पुढचं आयुष्य गुरबाज सिंग म्हणून घालण्याचा निर्णय त्यानं घेतलाय. आणि कुंटुबीयांनीही त्याच्या निर्णयाला पाठिंबा दिलाय.

close