मनसेच्या राडेबाजीवर एक नजर

January 27, 2009 4:30 PM0 commentsViews: 8

27 जानेवारीमनसेची तोडफोड सेना झालीय. मराठी मुद्द्याचं राजकारण करून परप्रांतियांना बेदम मारहाण करण्यात येतेय. मुंबईतल्या टॅक्सीचालकांपासून मनसेनं परप्रांतियांविरोधात आघाडी उघडली. त्यानंतर पुणे- नाशिक- औरंगाबाद अशा ठिकठिकाणी काहीना काही निमित्त काढून मनसेनं हिंसक आंदोलनं केली. परप्रांतियांना मारहाण हे त्यांचं एकमेव उद्दीष्ट बनलं आणि आज तर मुंबई विद्यापीठावर हल्लाबोल करून मनविसेनं समाजशास्त्र विषयच काढून टाका अशी मागणी केली. मनसेच्या आतापर्यंतच्या या राडेबाजीवरच एक नजर.पहिल्यांदा परप्रांतियांनी मनसेची हाय खाल्ली ती टॅक्सीफोड आंदोलनानंतर. त्यानंतर रेल्वेतल्या परप्रांतियांच्या नोकरभरतीवरून पुन्हा जाळपोळ, पुन्हा आंदोलन झालं. त्यानंतर राज ठाकरेंना अटक झाली आणि सुटकाही झाली. संपूर्ण देशाचं लक्ष या एकाच घटनेवरहोतं आणि त्याचे पडसाद राज्यभरात उमटले फेब्रुवारी 2008 पासून नाशिकमधील औद्योगिक वसाहतीतल्या परप्रांतिय कामगारांना मनसेनं टार्गेट केलं आहे. मारहाण, दगडफेक, जाळपोळ या सगळ्यात अंबादास धारराव या मराठी माणसाचाच हकनाक बळी गेला आहे. पुण्यात मनसेनं मराठी मुलांना प्राधान्याने ऍडमिशन द्यावी या मुद्द्यावरून शिक्षणसंस्थांवर हल्लाबोल केला. त्यात एमआयटी, भारती विद्यापीठ, इंदिरा इन्स्टिट्युट या संस्थांची तोडफोड करण्यात आली. इन्कम टॅक्स कार्यालयामध्ये परीक्षेसाठी आलेल्या परप्रांतीय उमेदवारांना हुसकावून लावलं गेलं. तर 15 ऑगस्टला पुण्याजवळच्या ंहिजवडी येथे मर्सिडीज बेन्झ इंटरनॅशनल स्कूल मध्ये स्वातंत्र्यदिन साजरा केला नाही म्हणून तोडफोड करण्यात आली.औरंगाबादमध्येही मनसेची दादागिरी सुरूच आहे. तिथल्या सरस्वती भवन कॉलेजमध्ये मुलीच्या वादातून मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. राज ठाकरे यांच्या अटकेनंतर संपूर्ण मराठवाड्यात 200 हून अधिक बस फोडण्यात आल्या. मराठी कामगारांना कामावरून काढून टाकल्याच्या निषेधार्थ ड्युरोवॉल आणि व्हीरॉक या कंपन्यांची 100 कोटींच्या मालमत्तेची नासधूस करण्यात आली. तरीही ठाण्यात राज ठाकरे यांची सभा होते, त्याला गर्दी होते. त्यानंतर लगेचच 26 जानेवारीला भोजपूरी गाण्यांवर आक्षेप घेऊन मनसे कार्यकर्ते राष्ट्रीय एकात्मता कार्यक्रमावरच हल्ला करतात. त्यातच शहिदांची पोस्टर्सही फाडली जातात. पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेतात. याच मनसेची मजल आज मुंबई विद्यापीठावर सोडा वॉटरच्या बाटल्या फेकण्यापर्यंत गेलीय. त्यांची मागणी आहे, समाजशास्त्र विषय अभ्यासक्रमातून वगळावाटॅक्सीची तोडफोड ते विद्यापीठाची तोडफोड… महाराष्ट्र नवनिर्माण सेना की तोडफोड सेना… आणि या सगळ्यात पोलिसांची बघ्याची भूमिका का घेतायत हाच खरा प्रश्न आहे.

close