आम्ही हल्ला केलाच नाही : पाक सरकार

August 6, 2013 8:00 PM0 commentsViews: 1038

india vs pak06 ऑगस्ट : जम्मू काश्मीरच्या पुंछ सेक्टरमधल्या नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी लष्कराने गोळीबार केला. यात 5 भारतीय जवान शहीद झालेत. पण हा हल्ला आम्ही केलाच नाही असा आव पाकिस्तानने आणला आहे. भारतीय प्रसार माध्यमं नियंत्रण रेषेवर झालेल्या पाच भारतीय सैनिकांच्या हत्येसाठी पाकिस्तानला जबाबदार ठरवत आहेत. हे बिनबुडाचे आरोप आम्ही फेटाळून लावतो. आमच्या लष्कारानं अशा प्रकाराचा कोणताही गोळीबार केला नाहीये, असं आम्ही खात्रीपूर्वक सांगतो असं स्पष्टीकरणच पाक सरकारने दिलंय. मात्र पाकच्या या खोटारड्यापणावर हळुहळू सुरू होत असलेल्या भारत-पाक शांतता प्रक्रियेला आता पुन्हा खीळ बसण्याची शक्यता आहे.

जम्मू काश्मीरच्या पूंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानी लष्कराने घुसखोरी केली. पण तेवढ्यावरच न थांबता.. पाकिस्तानची बॉर्डर ऍक्शन टीम आणि दहशतवादी यांच्या 20 जणांच्या संयुक्त तुकडीने नियंत्रण रेषेच्या भारतीय बाजूला बेछूट गोळीबार केला. चाकन दा बाग या दुर्गम भागात झालेल्या या हल्ल्यात गस्तपथकातले 5 भारतीय जवान शहीद झाले. त्यातले एक जवान पुंडलिक माने हे मराठा रेजिमेंटचे नायक होते.
या घटनेचे संसदेत जोरदार पडसाद उमटले. सरकार या घटनेबद्दल गंभीर नसल्याचा आरोप संतप्त विरोधकांनी केला. संसदेत उत्तर देताना सरकारने या हल्ल्याचा कडक शब्दांत निषेध केला आणि पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना समन्म बजावलं. कोणतंही उत्तर द्यायला भारतीय सैन्य सज्ज आहे, असा सज्जड इशाराही संरक्षण मंत्र्यांनी दिला. लष्कर प्रमुख बिक्रम सिंग हे बुधवारी काश्मीर खोर्‍यात जाऊन पुंछमधल्या घटनास्थळाची पाहणी करण्याची शक्यता आहे. पण पाकिस्तानच्या लष्कराने मात्र आपण हा हल्ला केला नसल्याचा दावा केलाय.
पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालय
“भारतीय प्रसार माध्यमं नियंत्रण रेषेवर झालेल्या पाच भारतीय सैनिकांच्या हत्येसाठी पाकिस्तानला जबाबदार ठरवत आहेत. हे बिनबुडाचे आरोप आम्ही फेटाळून लावतो. आमच्या लष्कारानं अशा प्रकाराचा कोणताही गोळीबार केला नाहीये, असं आम्ही खात्रीपूर्वक सांगतो. 2003 साली झालेल्या शस्त्रसंधीला आम्ही कटिबद्ध आहोत. सुसंवाद साधण्यासाठी दोन्ही बाजूंनी सकारात्मक वातावरण तयार करायला हवं.”
जानेवारी महिन्यात हेमराज सिंग या भारतीय जवानाचं शिर धडावेगळं करण्यात आलं होतं. त्यावेळी भारताने पाकिस्तानसोबत सुरू असलेली चर्चा स्थगित केली होती. पण नवाझ शरीफ यांनी मे महिन्यात सत्ता हाती घेतल्यानंतर दोन्ही देशांमधले संबंध सुधारले होते. त्यामुळे पुढच्या महिन्यात संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत शरीफ आणि मनमोहन सिंह यांची न्यू यॉर्कमध्ये भेट होणार होती. पण आता ही भेट होण्याची शक्यता कमी झालीये.

close