भारत-श्रीलंकेदरम्यान दम्बुलात रंगणार पहिली वन डे

January 28, 2009 3:48 AM0 commentsViews: 5

28 जानेवारीहिमांशू सिंघलभारतीय क्रिकेट टीमचा पाकिस्तान दौरा रद्द झाल्यामुळे टीमला नेहमीपेक्षा जास्त विश्रांती मिळाली. पण आता वन डे सीरिजमध्ये त्यांचा कस लागणार आहे. कारण त्यांचा मुकाबला आहे पाकिस्तानवरच्या विजयामुळे आत्मविश्वास उंचावलेल्या श्रीलंकेच्या टीमशी.भारतीय क्रिकेटर्सनी आपली शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच खेळून एका महिन्यापेक्षा जास्त काळ लोटलाय. पण देशातल्या तमाम क्रिकेट फॅन्सची प्रतीक्षा आता संपलीय. त्यांच्या लाडक्या टीमने गेल्या काही महिन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडवर दिमाखदार विजय मिळवलेत. आता याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्याची जिद्द महेंद्र सिंग धोणीची युवा टीम बाळगून आहे. दुसरीकडे श्रीलंकेची टीमही घरच्या मैदानवर टीम इंडियाचा सामना करण्यास सज्ज आहे. श्रीलंकेची टीम गेल्या काही महिन्यात पुरेपूर क्रिकेट खेळली आहे. बांग्लादेश आणि पाकिस्तानच्या टीमवर मिळवलेल्या विजयांमुळे टीमचा आत्मविश्वासही दुणावलाय. आता भारतीय टीमला सामोरं जायला महेला जयवर्धनेची टीम सज्ज झालीय. गेल्या वर्षीच्या पराभवाचा वचपा या टीमला काढायचा आहे. मुरलीधरनचा प्रयत्न असेल तो सर्वाधिक वन डे विकेट्सचा वसिम अक्रमचा रेकॉर्ड मोडण्याचा. पण भारतीय टीममधला त्याचा कट्टर प्रतिस्पर्धी हरभजन सिंग मात्र या सीरिजमध्ये नसेल. मांडीचा स्नायू दुखावल्यामुळे तो खेळू शकणार नाहीए. आणि त्याच्या अनुपस्थितीमुळे भारताची स्पीनची बाजू कमकुवत झाली आहे. भारत आणि श्रीलंकेविरुद्धची पहिली वन डे बुधवारी दम्बुला इथं होणार आहे. ही मॅच जिंकून मालिकेची विजयी सुरुवात करण्याचा दोन्ही टीमचा प्रयत्न असेल.

close