अंजिठा लेणीला हिरवाईचा साज !

August 7, 2013 7:09 PM0 commentsViews: 521

सिध्दार्थ गोदाम,अजिंठा,औरंगाबाद

 

07 ऑगस्ट : दुष्काळाचे चटके सहन केल्यानंतर आता पावसामुळे मराठवाड्यात वातावरणच बदललंय. जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांचा परिसरही सध्या नैसर्गिक सौंदर्यानं पुरेपूर समृद्ध झालाय.

अजिंठा लेणी…भारताच्या समृद्ध परंपरेत भर टाकणार्‍या ऐश्वर्य संपन्न कलाकृती..पावसाळ्यात तर या अजिंठा लेण्यांचं सौंदर्य आणखीनच वाढतं. इथली हिरवीगार निसर्ग संपदा आणि या परिसरातली शांतता आपल्याला वेगळ्याच विश्वात घेऊन जाते. सध्या हा परिसर हिरवाईनं आणि वेगवेगळ्या रानफुलांनी नटलाय.

अजिंठ्याच्या परिसरात दुतर्फा हिरव्यागार झाडांमधून चालतांनाचा अनुभव काही वेगळाच आहे. डोंगर कपारीतून डौलात जाणारी ही वाघोरा नदी फक्त पावसाळ्यातच वाहते. इथलं वातावारणच असं आहे की, या परिसराचं रक्षण करणार्‍या सुरक्षा व्यवस्थापकालाही कवितेचा मोह आवरला नाही.

दगडात कोरलेली ही लेणी पाहण्यासाठी वर्षभर जगभरातून इथं पर्यटक येतात. पण पावसाळ्यात हिरवी शाल पांघरलेली ही लेणी पाहतानाचा अनुभव आपल्याला वेगळीच अनुभुती देतात, त्याची तुलना कशाचीच नाही…

close