पाकसोबत चर्चा सुरूच राहणार?

August 7, 2013 10:49 PM0 commentsViews: 444

india pak07 ऑगस्ट : पूंछमध्ये पाच भारतीय जवान शहीद झालेत मात्र तरीही दोन्ही देशांमधली चर्चा सध्या तरी रद्द करण्यात आलेली नाही असे संकेत सरकारकडून मिळत आहेत. पाकिस्तानला आपण आपली नाराजी कळवली आहे आणि यावर पुढे काय निर्णय घ्यायचा, हे पंतप्रधान ठरवतील असं परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद म्हणाले आहे. तसंच दोन्ही देशांच्या लष्करी अधिकार्‍यांनी आज हॉटलाईनवरून चर्चाही केली.

सोमवारी मध्यरात्री जम्मू काश्मीरच्या पूंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानी लष्कराने घुसखोरी केली. पण तेवढ्यावरच न थांबता पाकिस्तानची बॉर्डर ऍक्शन टीम आणि दहशतवादी यांच्या 20 जणांच्या संयुक्त तुकडीने नियंत्रण रेषेच्या भारतीय बाजूला बेछूट गोळीबार केला. चाकन दा बाग या दुर्गम भागात झालेल्या या हल्ल्यात गस्तपथकातले 5 भारतीय जवान शहीद झाले. या घटनेचे संसदेत जोरदार पडसाद उमटले. सरकार या घटनेबद्दल गंभीर नसल्याचा आरोप संतप्त विरोधकांनी केला.

तर संरक्षण मंत्री ए.के. अँटनी यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली. आज जम्मूमध्ये लष्करप्रमुख बिक्रम सिंग यांनी शहीद झालेल्या पाच जवानांना श्रद्धांजली वाहिली. मात्र खराब वातावरणामुळे सिंग यांना आपली पूंछ भागाचा दौरा रद्द करावा लागला. उद्या ते संरक्षण मंत्री ए.के. अँटनी यांना एकंदरित स्थितीबद्दलची माहिती देतील. तर पाकिस्ताननं मात्र हल्ल्याच्या घटनेत आपला हात नसल्याची पुन्हा एकदा बोंब मारली. एवढच नाही तर उलट भारतावर नियंत्रण रेषेवर नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप केलाय.

close