इंधन स्वस्त होणार : सोनिया गांधी

January 27, 2009 4:58 PM0 commentsViews: 3

27 जानेवारी, रायबरेलीपेट्रोलियम पदार्थांच्या किंमती लवकरच आणखी कमी होतील, असे संकेत देऊन काँंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनी निवडणुकांची पार्श्वभूमी तयार केली आहे. सोनियांनी आज रायबरेली या आपल्या मतदारसंघातल्या वादग्रस्त रेल्वे कोच कारखान्याचं भूमिपूजन केलं. यावेळी सोनियांनी मायावतींवर टीका करणं टाळल्यामुळे अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत.एका बाणात सोनिया गांधींनी दोन गोष्टी साध्य केल्या. निवडणुकांवर डोळा ठेवून पेट्रोल दरकपातीचे संकेत दिले आणि रेल्वे कोच कारखान्याचं भूमिपूजन करून वर्षानुवर्षे गांधी घराण्याला निष्ठावान राहिलेल्या रायबरेलीतल्या लोकांना रोजगारही मिळवून दिला. या ठिकाणीच उद्योगधंदे निर्माण झाले तर उत्तर भारतातल्या तरुणांना नोकरीच्या शोधात मुंबईला जाण्याची गरज राहणार नाही, अशी आशा या वेळी उपस्थित असलेल्या रेल्वे मंत्र्यांनी व्यक्त केली.गेल्या ऑक्टोबरमध्ये मुख्यमंत्री मायावतींनी रेल्वे कोच कारखान्यासाठी दिलेली जागा परत घेऊन सोनिया गांधींना जोरदार हादरा दिला होता. पण आगामी निवडणुकीत मायावतींची भूमिका महत्त्वाची ठरू शकते हे लक्षात घेऊन सोनियांनी मायावतींवर टीका करणं कटाक्षाने टाळलं. या रेल्वे कारखान्याचा फायदा अमेठी या आपल्या मतदारसंघातल्या तरुणांनाही होईल, असं राहुल गांधींनी सांगितलं.पंतप्रधान मनमोहन सिंग यांची स्तुती करून सोनियांनी संकेत दिलेत की मनमोहन सिंग हेच यूपीए चे पुढचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील आणि मायावतींबद्दल मौन बाळगून त्यांनी समाजवादीला इशारा दिला आहे. जागावाटपात अवास्तव मागण्या केल्या तर आमच्यासाठी दुसरे पर्यायही खुले आहेत, हा इशारा समाजवादी पक्षाचे नेते किती गंभीरपणे घेतात, यावर सगळ्यांचं लक्ष असेल.

close