वाशिम विकासापासून दूरच !

August 8, 2013 9:39 PM0 commentsViews: 50

आशिष जाधव, वाशिम
08 ऑगस्ट : विदर्भातला अकरावा आणि शेवटचा तयार झालेला जिल्हा म्हणजे वाशिम..15 वर्षं होऊनही हा जिल्हा अतिमागास म्हणून ओळखला जातो. 15 वर्षांपूर्वी विदर्भातला अकोला जिल्हा हा राज्यातला दुसर्‍या क्रमांकाचा सर्वात मोठा जिल्हा होता. मात्र प्रशासन लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून 1998 साली अकोल्या जिल्ह्यातून वाशीम वेगळा करण्यात आला. सहा तालुक्यांच्या या जिल्ह्यात प्रशासकीय इमारती उभारल्या गेल्या खर्‍या पण प्रशासन मात्र लोकांपर्यंत पोहोचण्यात अपयशी ठरलं.

दुर्गम भागात असलेल्या वाशिम शहरात केवळ प्रशासकी इमारतींशिवाय काहीही दिसत नाही. एमआयडीसी तर केवळ नावापुरती आहे. चांगल्या शिक्षणसंस्थांचा इथं अभाव आहे. कुठलाही उद्योग इथं नव्यानं उभारला गेला नाही. सुतगिरणी उभारली गेली पण तिच्या चिमणीतून धूर कधी निघालाच नाही. त्यामुळे एकंदरितच या जिल्ह्यात रोजगाराच्या संधीही कमी आहेत.

वाशिम शहर इतकं भकास आहे की, त्या तुलनेत जिल्ह्यातली कारंजा, मंगळूरपीर ही तालुक्याची गावंच जास्त विकसीत वाटतात. आपल्या या जिल्ह्यात विकासाची गंगा वाहणार तरी कधी असा प्रश्न आता या जिल्ह्यातल्या लोकांना पडलाय.

close