भारत-पाक दरम्यान सचिवस्तरावरची चर्चा रद्द होणार?

August 8, 2013 9:59 PM0 commentsViews: 444

india vs pak08 ऑगस्ट : भारत-पाक सिमारेषेवर तणावानंतरही भारत पाकशी चर्चा कायम सुरूच ठेवणार हे सरकारकडून स्पष्ट झालंय मात्र यावर तमाम देशवासीयांचा संताप आणि विरोधकांचा तीव्र विरोध असल्यामुळे केंद्र सरकारला याबद्दल आता पुनर्विचार करावा लागतोय. आयबीएन नेटवर्कला मिळालेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसांत ज्या भारत आणि पाकिस्तानमध्ये विविध पातळ्यांवर चर्चा होणार होती ती न होण्याची शक्यता आहे.

सचिवांच्या पातळीवरील चर्चेची अजून तारीख ठरलेली नाहीये. आता तीही रद्द होऊ शकते. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे न्यूयॉर्कमध्ये जी भारताचे पंतप्रधान आणि पाकिस्तानचे पंतप्रधान यांची भेट होण्याची शक्यता होती ती रद्द होण्याची शक्यता कमी आहे. ही भेट होण्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी पाकिस्तानची आहे असं आता भारताला वाटतंय.

दरम्यान पाकीस्तान चे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनाही याबद्दलची माहिती त्यांच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलीय. त्यानंतर, नवाझ शरीफ यांनी एक निवदेन जाहीर केलंय. त्यात ते म्हणतात…

“नुकत्याच पुन्हा एकदा नियंत्रण रेषेवर तणाव वाढवणार्‍या घटना घडल्या आहेत आणि यांत काही बळीही गेले आहेत. याचं आम्हांला निश्चितच दुख आहे. भारत आणि पाकीस्तान नियंत्रण रेषेवर शांतता रहावी आणि अशा घटना घडू नयेत यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. येत्या काळात भारतीय पंतप्रधान मनमोहन सिंग साहेब यांच्याशी माझी भेट होणार आहे. तेव्हा हे संबंध अधिक वृद्धींगत व्हावेत आणि विश्वास वाढावा यासाठी आम्ही चर्चा करू.”

 भारताच्या संयमाला गृहित धरू नका, भारताने सुनावले खडेबोल

तर पाकिस्ताननं केलेल्या भ्याड हल्ल्याबाबत आपलंच वक्तव बदलण्याची नामुष्की आज केंद्र सरकारवर ओढावली. पूंछमध्ये एलओसीवर जो हल्ला झाला तो पाकिस्तानी लष्कराच्या वेशात आलेल्या अतिरेक्यांनी केल्याचं निवेदन संरक्षण मंत्री ए. के. ऍन्टोनी यांनी केलं होतं. पण, आक्रमक विरोधकांच्या दबावापुढे झुकत अखेर त्यांनी हे निवेदन मागे घेत हल्ल्यामागे पाकिस्तानी लष्कराचा हात असल्याचं नवं निवेदन संसदेत दिलं. काँग्रेस आणि सरकारने ऍन्टोनींना पाठिंबा दिला असला तरी झाल्या प्रकारामुळे पक्षप्रतिमेला नुकसान पोचल्याचं काही काँग्रेस नेत्यांमध्येच चर्चा होती.

ऍन्टोनी यांनी आपल्या नव्या निवेदनात काय म्हटलंय?

– आम्हाला त्यावेळी जी माहिती मिळाली त्याच आधारावर मी निवेदन केलं.
– पण, या हल्ल्यात पाकिस्तानच्या लष्करानं प्रशिक्षण दिलेल्या तुकड्या सहभागी असल्याचं आता स्पष्ट झालंय.
– एलओसीवर पाकिस्तानच्या बाजूनं जे काही घडतं ते पाकिस्तानी लष्कराच्या सहकार्य, सहाय्य, मदत आणि थेट सहभागाशिवाय होत नाही, हे आपणा सर्वांना माहीत आहे.
– या दुदैर्वी घटनेसाठी आणि या वर्षाच्या सुरुवातीला दोन जवानांच्या अमानुष कत्तलीसाठी जे जबाबदार असतील त्यांना शिक्षा झालीच पाहिजे
– मुंबईत नोव्हेंबर 2008मध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यातल्या दोषींनाही तात्काळ शिक्षा करण्याच्यादृष्टीनं ठोस पावलं उचलली पाहिजे.

close