जयमाला शिलेदार यांचा जीवन प्रवास

August 8, 2013 11:13 PM0 commentsViews: 115

जयमाला शिलेदार…. संगीत रंगभूमीवरील एक उत्साही आणि प्रेमळ व्यक्तिमत्त्व…संगीत रंगभूमीच्या गेल्या सव्वाशे वर्षाच्या इतिहासात अनेक कलाकारांची नावं अजरामर झाली, त्यात जयराम आणि जयमाला शिलेदार यांची नावं ठळकपणे घ्यावी लागतील. जयमालाबाईंच्या जन्म 21 ऑगस्ट 1926 चा…अत्यंत मृदू स्वभावाच्या असलेल्या जयमालाबाईंनी रंगभूमीवरच्या अभिनयातून अनेकांच्या मनावर आपलं नाव कोरलं होतं.

संगीत रंगभूमीच्या पडत्या काळात तिला जगवण्याचं काम कुणी केलं असेल, तर ते शिलेदार कुटुंबीयांनी.. जयमालाबाईंनी 16 संगीत नाटकांचं दिग्दर्शन केलं. 52 संगीत नाटकांमध्ये अभिनय केला. जयमाला शिलेदार यांचं संगीत नाटक रंगभूमीवरचं योगदान मोठं होतं. संगीत सौभद्र, संगीत संशयकल्लोळ, संगीत शारदा, संगीत मृच्छकटिक जयमालाबाईंची ही संगीत नाटकं प्रचंड लोकप्रिय झाली. पती जयराम शिलेदारांसोबत जयमालाबाईंनी संगीत नाटकांचा काळ गाजवला. जयमालाबाईंचं पडद्यामागचं कार्यही मोठं होतं.

जयराम आणि जयमाला शिलेदारांनी मराठी रंगभूमी या संस्थेची रंगभूमीवरील कार्यासाठी स्थापना केली. त्यात अनेक कलाकारांना त्यांनी घडवलं. संगीत रंगभूमीवर त्यांच्याबरोबरीने त्यांच्या मुलींनीही मोठं योगदान दिलंय. या रंगभूमीवर आज त्यांची तिसरी पिढी काम करतेय. वयाच्या 88 व्या वर्षी जयमालाबाईंचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात आला. संगीत रंगभूमीवरील त्यांचं योगदान समजून घ्यायला कदाचित सरकारी यंत्रणेला वेळ मिळाला नसावा, त्यामुळे त्यांचा इतक्या उशिरा पद्मश्री देऊन गौरवण्यात आलं. टवटवीत दिसणारा हा पारिजात कोमेजल्यानं संगीत रंगभूमी आज सुनी सुनी झालीय. जयमालाबाईंनी आयबीएन लोकमतची भावपूर्ण श्रद्धांजली.

close