‘तो’ हल्ला पाकच्या स्पेशल तुकडीने केला?

August 9, 2013 10:48 PM0 commentsViews: 480

loc pak09 ऑगस्ट : जम्मू आणि काश्मीरमध्ये पूँछ इथं सिमारेषेवर मंगळवारी रात्री झालेला हल्ला पाकिस्तानी लष्कराच्या एका विशेष तुकडीनं केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळतेय.

या हल्ल्यात भारतीय लष्कराचे पाच जवान शहीद झाले होते. पाकिस्तानी सैन्याच्या स्पेशल सर्विसेस ग्रुप म्हणजेच एसएसजीनं हल्ल्याची व्यूहरचना आखल्याचं लष्कराच्या सूत्रांनी सांगितलंय. अतिशय खडतर हवामान आणि दुर्गम भागात छुटपुट लष्करी कारवाया करण्याचं प्रशिक्षण एसएसजीच्या कमांडोजना दिलेलं असतं.

 

पाकिस्तानी सैनिकांनी पूँछ सेक्टरमध्ये नियंत्रणरेषेजवळ चाकन दा बाग या गावात भारतीय सैन्याच्या गस्तपथकावर हल्ला केला. या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले. संरक्षण क्षेत्रातल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 ते 16 पाकिस्तानी सैनिकांनी सोमवारी मध्यरात्रीनंतर भारतीय हद्दीत घुसखोरी केली.

धक्कादायक बाब म्हणजे जानेवारीत दोन सैनिकांचा शिरच्छेद करण्याची कारवाईसुद्धा याच एसएसजी कमांडोजनी पार पाडली होती आणि त्यासाठी अतिरेक्यांची मदत घेण्यात आली, असाही संशय लष्कराला आहे.

 

close