राखीव जागांसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची मोर्चेबांधणी

January 27, 2009 5:36 PM0 commentsViews: 13

27 जानेवारी, मुंबईअमेय तिरोडकरकाँग्रेस आणि राष्ट्रवादीची लोकसभेच्या जागावाटपाबद्दलची बोलणी येत्या काही दिवसांत सुरू होत आहे. यामध्ये राज्यातल्या राखीव जागांवर सगळ्यात जास्त चर्चा आणि बोलणी होण्याची चिन्हं आहेत. यावरच आयबीएन लोकमतचा हा स्पेशल रिपोर्ट. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या यावेळच्या आघाडीत रिपब्लिकन पक्षाचे चार गट आणि समाजवादी पक्षही सामील होतील अशी चर्चा चालू आहे. त्याचा फायदा धर्मनिरपेक्ष मतांची फाटाफूट रोखण्यात होऊ शकतो. विशेषत: राखीव जागांवर युतीला रोखणं आघाडीला शक्य होईल. मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर राज्यात एकूण नऊ जागा राखीव आहेत. त्यामध्ये पाच जागा या अनुसुचित जातींसाठी तर चार जागा या अनुसुचित जमातींसाठी राखीव आहेत. अनुसुचित जातींसाठी असलेल्या जागांमध्ये अमरावती, रामटेक, शिर्डी, लातूर आणि सोलापूर या जागा आहेत. यांपैकी अमरावतीच्या जागेवर काँग्रेसनं हक्क सांगितला आहे. ही जागा काँग्रेस आपले मित्र असलेले केरळचे राज्यपाल रा.सु.गवई यांचा मुलगा राजेंद्र गवई याला सोडेल, असं म्हटलं जातंय. रामटेक मध्ये काँग्रेसचे मुकुल वासनिक इच्छुक आहेत. आणि रिपब्लिकन पक्षही आघाडीत सामील झाला तर, ही जागा जोगेंद्र कवाडेंसाठी सोडावी लागेल. सध्या कवाडेंचं आणि राष्ट्रवादीचं चांगलं नाही. कवाडे काँग्रेसचे मित्र म्हणूनच आघाडीत सामील होतील, अशी चर्चा आहे. त्यामुळे पुन्हा ही जागा कॉंग्रेसच्या कोट्यातून द्यावी लागेल. शिर्डीचा तिढा तर अगदीच विचित्र आहे. या जागेवर रामदास आठवले यांची नजर आहे. म्हणजे राष्ट्रवादीच्या कोट्यात ही जागा जाऊ शकते. पण, सध्याचे शिर्डीचे खासदार बाळासाहेब विखे पाटील यांचं पवारांशी असलेलं वैर जाहीर आहे. ते या मतदारसंघात पवारांचा वारा लावून घेऊ इच्छिणार नाहीत हे उघड आहे. त्यामुळे शिर्डी स्थानिक एससी उमेदवार देऊन ते लढवतील, असा अंदाज आहे. त्यांना स्वत:ला अहमदनगर या मतदारसंघातून लोकसभेत जायचंय. पण, इथे राष्ट्रवादीचे तुकाराम गडाख खासदार आहेत. स्थानिक कार्यकर्त्यांना अहमदनगर आणि शिर्डीमध्ये अदलाबदल होईल असं वाटतंय. पण हा निर्णय दिल्लीच्या पातळीवर सोडवला जाईल हे नक्की.लातूर मतदारसंघातून काँग्रेसतर्फे टी. एम. कांबळे प्रयत्न करत आहेत. गेल्या निवडणुकीतही हा मतदारसंघ कॉंग्रेसकडेच होता. कदाचित बाळासाहेब विखे शिर्डीही आपल्याला सोडवून घेण्यासाठी लातूर राष्ट्रवादीला द्या असा हट्ट धरण्याची शक्यता आहे. पण, लातूर जिंकणं आघाडीला सोपं नाही. सोलापूर मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे. पण, सुशीलकुमार शिंदे इथे उमेदवार म्हणून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला हा मतदारसंघ सोडावा लागेल. अनुसुचित जमातींसाठीच्या मतदारसंघात नंदुरबार, दिंडोरी, पालघर आणि गडचिरोली – चिमूर हे मतदारसंघ आहेत. नंदुरबारमध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढलेली असली तरी, माणिकराव गावित हे काँग्रेसचे नेते तिथे खासदार आहेत. त्यामुळे कॉंग्रेसचा पहीला दावा राहील. दिंडोरी हा नवा मतदारसंघ निर्माण झालंय. राष्ट्रवादीची इथे ताकद आहे. त्यामुळे दिंडोरी राष्ट्रवादी आपल्याकडे मागून घेईल.पालघर मध्ये काँग्रेसचे दामू शिंगडा वर्षानुवर्षे जम बसवून आहेत. ही सीटही कॉंग्रेसच्या वाट्याला जाईल. गडचिरोली- चिमूरसाठी या दोन्ही पक्षांकडून इच्छुक अनेक आहेत. पण, सेनेची चिमूरमध्ये असलेली ताकद बघता हा गड सोपा नाही. यामुळे राष्ट्रवादीला जेमतेम नऊपैकी अवघ्या दोन जागा मिळू शकतील. आणि यातही रामदास आठवले यांच्यासाठी मतदारसंघ नसेल. राष्ट्रवादीच्या जातीनिरपेक्ष प्रतिमेवर याचा परीणाम होऊ शकतो. म्हणून राष्ट्रवादी किमान चार जागा मिळाव्यात यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. तर, काँग्रेस आपल्या हक्काच्या जागा सोडण्याच्या मनस्थितीत नाही. यातूनच आघाडीत या जागांसाठी अटीतटीची चर्चा होईल असं म्हटलं जात आहे.

close