खडूस !

August 10, 2013 11:06 PM0 commentsViews: 795

  sandeep_chavan_                                  Posted by -संदीप चव्हाण, डेप्युटी न्यूज एडिटर, IBN लोकमत

भारतीय क्रिकेटमध्ये एक काळ असा होता की भारतीय टीममध्ये 11 खेळाडूंची निवड ही गुणवत्तेच्याही आधी कोटा पद्धतीच्या निकषावर केली जायची… अनेक गुणवान खेळाडू हे केवळ कोट्यमुळे बाहेर बसलेले पाहिलेत… अर्थात ही कोटा सिस्टिम अलिखित होती. पण तरीही निवड समितीत विभागवार प्रतिनिधीत्व असलेल्या निवड समिती सदस्यामुंळे ही कोटा संस्कृती विनासायास रुजत होती. त्यावेळी मनात यायचे की आपण कधीतरी आस्ट्रेलियासारके व्यावसायिक होऊ शकतो का? त्यांच्याइतकी व्यावसायिकता आपल्यात येऊ शकते का?

कालपरवापर्यंत तरी त्याचं उत्तर नाहीच होतं… कारण त्याला कारणीभूत होती ती भारतीय मानसिकता… आपण भारतीय डोक्यापेक्षा हृदयानं जास्त विचार करतो… आणि याचाच फटका आपल्याला क्रिकेटच्या मैदानात बसायचा… निवड समिती सदस्यत्वही मानद असायचं… पण नंतर चित्र बदललं. निवडसमिती सदस्यांना लाखोत मानधन मिळायला लागले. आणि हो निर्णयातही मग व्यावसायिकता येऊ लागली.

virat kohali

इतपत सगळं ठिक होतं, पण आता भारतीय कॅप्टनही पुरते व्यावसायिक होऊ लागल्याचं दिसू लागलंय. झिम्बाब्वेविरुद्धच्या क्रिकेट सीरिजमध्ये भारतानं 5-0 असा निर्णायक विजय मिळवला. खरंतर जागतिक क्रमवारीत नंबर एकवर असणाऱ्या भारतानं तळाशी असणाऱ्या झिम्बाब्वेला पराभूत करणं तसं फारशी मोठी कामगिरी नव्हती. पण तरीही विराट कोहली याने झिम्बाब्वेत जाऊन झिम्बाब्वेला हरवलं. त्याच्या वाट्याला कौतुक कमी आलं हे आपण समजु शकतो, पण अनाठायी टीका मात्र आली. कारण काय तर त्यानं जम्मू काश्मीरच्या परवेझ रसूलला एकाही मॅचमध्ये खेळवलं नाही. परवेझ रसूल हा जम्मू काश्मिरचा आजवर भारतीय क्रिकेट टीममध्ये निवडला गेलेला एकमेव खेळाडू. जर त्याला क्रिकेट पदार्पण करता आलं असतं तर ती एतिहासिक घटना होती.

जम्मू-काश्‍मीरसाठीच नव्हे, तर तमाम भारतीयांसाठीही ती ऐतिहासिक बाब होती. इतका दबाव असतानाही विराट कोहलीनं त्याला एकही मॅच खेळवली नाही. विशेषता पाच सामन्यांच्या सीरिजमध्ये भारत 4-0 असा आघाडीवर असताना किमान शेवटच्या मॅचमध्ये त्याला खेळवा यासाठी मीडियातही जोरदार मोहीम सुरू होती. शेवटच्या मॅचमध्येतरी अमित मिश्रा किंवा रविंद्र जाडेजाएवेजी परवेझ रसूलला खेळवा अशी ओरड करण्यात आली. पण याच अमित मिश्रानं शेवटच्या मॅचमध्ये 6 विकेट घेत झिम्बाब्वेची दाणादाण उडवली होती. दुसरीकडे रविंद्र जाडेजाच्या कामगिरीतील सातत्य कॅप्टन विराट कोहलीला डिस्टर्ब करायचे नव्हेत. आणि आपल्या या निर्णयावर तो ठाम राहिला. अगदी टोकाची टीका होऊनही तो शांत राहिला. त्याचं एकचं वाक्य मला खुप आवडलं.विराट म्हणाला, टीम कोणतीही असो आणि मॅच कोणतीही प्रत्येक मॅच ही जिंकण्यासाठीच आम्ही खेळलो.

विराटच्या या वक्तव्यानंतर मला सहज आठवलं ते मध्यंतरी सीनियर खेळाडूंना थेट कसं वगळायचं म्हणून अंतिम 11 खेळाडूंच्या यादीत रोटेशन पद्धत आणली गेली होती. म्हणजे एका मॅचमध्ये सचिनला, तर दुसऱ्या मॅचमध्ये सेहवागला तर तिसऱ्या मॅचमध्ये गंभीरला विश्रांती वगैरे… अरे जेव्हा भारतीय टीम जिंकण्यासाठी निवडता तेव्हा देशातील सर्वोत्तम टीमचं निवडली गेली पाहिजे. कुणाला वाईट वाटतंय, कुणाला खूश करायचं यावर या टीमची निवड करणे केव्हाही चूकच…

स्टीव्ह वा, रिकी पाँण्टिंगसारख्या खेळाडूलासुद्धा आस्ट्रेलियानं जा म्हणून सांगितलं. आपल्या येथे अजून इतका धाडसीपणा आलेला नाही पण किमान विराट कोहलीच्या निमित्तानं याची सुरुवात झालीय असं म्हणता येईल.

धोणीनंतर भारतीय टीमचा कॅप्टन म्हणून विराट कोहलीकडेच पाहिलं जातं. धोणी हा स्वता करुन दाखवणारा कॅप्टन आहे. वन डे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये सेहवाग आणि सचिन झटपट आऊट झाल्यावर धोणीनं जी बॅटिंग केली होती ती कोण कशी विसरू शकेल. त्याचा तो फायनलमधील विजयी सिक्सर अविस्मरणीय असाच. विराट कोहली त्याच्या तुलनेत थोडासा अधिक खडूस आहे… भारतीय क्रिकेट टीमसाठी अशाच खडूस कॅप्टनची गरज आहे…

close