लोकसभा निवडणुकांसाठी राजकीय पक्षांच्या हालचाली सुरू

January 28, 2009 5:47 AM0 commentsViews:

28 जानेवारीआगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज शिरूरमध्ये सभा घेत आहेत तर शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे महाडमध्ये सभा घेत आहेत. उद्धव ठाकरे आणि शरद पवार या सभांमध्ये काय बोलणार? याविषयी मोठी उत्सुकता आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार खासदारकीची निवडणूक लढवणार की मागच्या दारानं संसदेत जाणार सगळ्यांना पडलेल्या या प्रश्नाचं उत्तर खुद्द शरद पवारच देण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातल्या शिरूरमध्ये होणार्‍या पक्षाच्या सभेत पवार सहभागी होणार आहेत. याचवेळी ते त्यांच्या उमेदवारीबद्दलही बोलणार असल्याची शक्यता वर्तवली जातीये. आपल्या उमेदवारीबद्दल फारसं न बोलणारे पवार, आता शिरूरच्या सभेत नक्की काय बोलणार याबद्दल राजकीय पक्षांबरोबर सामान्यांमध्येही उत्सुकता आहे. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचीही आज रायगडमधल्या महाडमध्ये जाहीर सभा होत आहे. आगामी निवडणुका तसंच भाजपबरोबरचे ताणले गेलेले संबंध, या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे काय बोलणार , याबद्दल उत्सुकता आहे. त्याचबरोबर पंतप्रधानपदासाठी शरद पवार यांना शिवसेना पाठिंबा देणार असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळेच उद्धव यांच्या या सभेकडं अनेकांचं लक्ष लागलं आहे.

close