किश्तवारमध्ये पुन्हा उफाळली हिंसा

August 12, 2013 5:40 PM0 commentsViews: 535

kishtwar roits12 ऑगस्ट : किश्तवारमध्ये निदर्शक आणि पोलिसांमध्ये आज पुन्हा एकदा हिंसा भडकली. निदर्शक आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत तीन नागरिक जखमी झालेत तर तीन पोलीसही जखमी झालेत.

दरम्यान, किश्तवारमधल्या जातीय दंगलीप्रकरणी जम्मू आणि काश्मीरचे गृह राज्यमंत्री सज्जाद अहमद किचलू यांचा राजीनामा राज्यपालांनी स्वीकारलाय. आज सकाळी किचलू यांनी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याकडे राजीनामा सोपवला होता. त्यापूर्वी केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीरच्या सरकारकडून अहवाल मागवलाय.

परिस्थिती नियंत्रणाखाली यावी यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करत आहे असं केंद्रीय गृहराज्यमंत्री आर पी एन सिंह यांनी सांगितलंय. राज्य सरकारनं या दंगलींची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, जम्मू आणि काश्मीरमधल्या किश्तवार शहरात झालेल्या जातीय दंगलीनंतर जम्मू विभागातल्या आठपैकी तीन जिल्ह्यांमधली संचारबंदी हटवण्यात आली आहे. सध्या किश्तवार, जम्मू, राजौरी, सांबा आणि रियासी या जिल्ह्यांमध्ये संचारबंदी कायम आहे.

close