अवघा रंग एकच, सच्चा वारकरी राजूबाबा शेख !

August 12, 2013 10:28 PM0 commentsViews: 1120

सिध्दार्ध गोदाम,बीड

12 ऑगस्ट : भारत स्वतंत्र झाल्यावर या देशाने धर्मनिपेक्षता हे तत्व स्वीकारलं. पण स्वातंत्र्याच्या आधीपासूनच कित्येक शतकांपूर्वी सर्वधर्म समभाव भारताच्या मातीत रुजला, वाढला आणि नांदला…याचंच एक भिडणारं उदाहरण म्हणजे बीड जिल्ह्यातल्या केजमधले सच्चे वारकरी राजूबाबा शेख..

राजूबाबा शेख… 72 वर्षांचा सच्चा वारकरी. बीड ही त्यांची जन्मभूमी. पण या भल्या माणसाची सगळ्या धर्मांवर गाढी श्रद्धा आहे. जितका राजूबाबांना अल्लासाठी रमझान प्रिय तितकाच पंढरीचा विठोबा..देव सगळा एकच आहे. हिंदू धर्माचा असला काय किंवा मुस्लीम… देव जर वेगळा असता तर देवादेवांमध्ये भांडणं लागली असती..

देवाविषयीचं साधूसंतांनी मांडलेलं हेच तत्वज्ञान घेऊन राजूबाबा जगतायत. 50 वर्षांपूर्वी मंदिराबाहेर टाळ मृदुंग ऐकणार्‍या राजूबाबांना भजनाचा नाद लागला. भजन शिकण्याची इच्छा अनावर झाली. आणि मुस्लीम धर्माच्या माणसाने हाती आपल्या भगवी पताका घेतली. पण धर्मांध लोकांनी त्यांना जोरदार विरोध केला.

या विरोधामुळेच राजूबाबांचं लग्न वयाच्या 45 व्या वर्षी झालं. राजूबाबांचं भजन आणि किर्तनाची ख्याती दिवसेंदिवस पसरु लागली.

केजपूरच्या मारुतीमंदिरात जर सगळ्यांना कळलं की राजूबाबा शेख यायला लागलेत. सगळेजण काम सोडून त्यांना ऐकायला जायचे. परातीत खेळायचं. समई डोक्यावर घ्यायचे..खेळ करायचे..खूप समाधान वाटायचं असं येथील गावकरी दत्तात्रय आवटी सांगतात.

त्यांच्या सन्मानाला कोणत्याच धर्माची मर्यादा राहिली नाही. राजूबाबा शेख यांनी त्यांच्या मनातल्या देवाला धर्माच्या पलिकडे नेलंय. माणसांनी दिलेले रंग त्यांना मान्य नाहीत. त्यांच्यासाठी अवघा रंग एकच आहे.

close