सिंधुरक्षक पाणबुडीला जलसमाधी, 18 नौसैनिकांचा मृत्यू?

August 14, 2013 3:25 PM0 commentsViews: 992

14 ऑगस्ट :  सिंधुरक्षक या पाणबुडीवर मध्यरात्री दोन स्फोट झाले त्यानंतर आग लागली. पहिला स्फोट हा कमी तीव्रतेचा होता मात्र दुसरा स्फोट मोठा होता त्यामुळे आग पसरली. यावेळी या पाणबुडीत नौदलाचे 18 जवान होते. या सर्वांचाच मृत्यू झाला असावा अशी भीती नेव्ही चीफ ऍडमिरल डी के जोशी यांनी व्यक्त केली. आगीमुळे काही जवान जखमी झालेत, त्यांना नौदलाच्या INHS अश्विनी या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.

अतिशय कडक सुरक्षा असलेल्या मुंबई नेव्हल डॉकयार्डच्या ठिकाणी सिंधुरक्षक या पाणबुडीला मध्यरात्री आग लागली. यावेळी या पाणबुडीत नौदलाचे 18 जवान होते. पण या घटनेनंतरही हे सगळे नौसैनिक जिवंत असू शकतात अशी शक्यता नौदल प्रमुखांनी व्यक्त केली. या घटनेप्रकरणी नौदलानं चौकशीचे आदेश दिलेत. चौकशी समिती 4 आठवड्यांच्या आत आपला अहवाल सादर करणार आहे. संरक्षणमंत्री ए के अँटनी आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी डॉकयार्डला भेट दिली.

नौदलाच्या आरमाराची शान असलेली सिंधुरक्षक पाणबुडीला झालेल्या भीषण अपघातात या पाणबुडीला जलसमाधी मिळाली. पण पाणबुडी अजूनही बंद असल्यामुळे हे सर्व 18 जवान जिवंत आहेत, असं मानून आमचे प्रयत्न सुरू राहतील असं नौदलानं स्पष्ट केलंय. भारतीय नौदलाला हा मोठा हादरा मानला जातोय.

सिंधुरक्षक… शत्रूचा अचूक वेध घेणारी ही पाणबुडी 1997मध्ये भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल झाली. पण, तब्बल 16 वर्षांनी एका दुदैर्वी अपघातानं या पाणबुडीला जलसमाधी मिळालीय.

मध्यरात्री साडे बाराजी वेळ होती…मुंबईत रात्रीच्या शांत समुद्रात सिंधुरक्षक पाणबुडी उभी होती. पाणबुडीच्या बॅटरी रुममध्ये मेनटेंन्सचं काम सुरू होतं. या बॅटरी रुममध्ये मोठ्या प्रमाणावर हायड्रोजन असतो. प्राथमिक अंदाजानुसार याच बॅटरी रुममध्ये दोन स्फोट होऊन आग लागली. या आगीच्या ज्वाळा दूरपर्यंत दिसत होत्या. हा स्फोट इतका जबरदस्त होता की, पाणबुडीचा पुढचा भाग जळून खाक झाला आणि त्यामुळे पाणबुडीत पाणी शिरू लागलं आणि ती बुडायला सुरुवात झाली.

रात्री 2 वाजता…मुंबई अग्निशमन दल आणि नौदलाच्या अग्निशमन गाड्या नेव्हल डॉकयार्डमध्ये दाखल झाल्या आणि आग विझवण्याचे प्रयत्न सुरू झाले.

सकाळी साडे सहा वाजेपर्यंत..आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात आलं. पण तोवर पाणबुडीला जलसमाधी मिळाली होती.

सकाळी सात वाजून 20 मिनिटांनी…पाणबुडीत अडकलेल्या 18 नौसैनिकांना शोधण्यासाठी नौदलानं विशेष प्रशिक्षण दिलेले स्कूबा डायव्हर्स पाठवले. पण, अपघातानंतर पाणबुडीचे सर्व दरवाजे ऑटोमॅटिक बंद होत असल्यानं या डायव्हर्सना आत शिरता आलं नाही.

या सर्व अपघातात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिंधुरक्षक पाणबुडीची बॅटरी रूम खराब झाल्यानं 2011मध्ये तिला रशियाला पाठवून दुरुस्त करण्यात आलं होतं. सहा महिन्यांपूर्वी या पाणबुडीचं प्रात्यक्षिकही घेण्यात आलं होतं. पण, याच बॅटरी रुममधला बिघाड पाणबुडीच्या अपघातासाठी कारणीभूत ठरलाय.

close