गोष्ट एका कांद्याची…

August 14, 2013 7:08 PM3 commentsViews: 1066

dipti_raut_ibn_lokmat_nashik

Posted by- दीप्ती राऊत, ब्युरो चीफ, IBN लोकमत,नाशिक

झटपट प्रसिद्धी मिळवण्यात प्रसिद्ध असलेल्या पुण्यातल्या एका काँग्रेस नगरसेवकांनी सुरू केलेल्या स्वस्त कांदा विक्री केंद्राचं उद्घाटन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केलं. तिकडे दिल्लीत काँग्रेसच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी कांद्यावर निर्यातबंदी घालण्याची मागणी करणारं पत्र सरकारला लिहीलं. माणिकरावांच्या केंद्रातल्या आणि दीक्षितांच्या मंडीमधल्या कांद्यांमध्ये एकच खसखस पिकली, कसं लोकांना फसवताहेत बघा! सध्या देशभरातील लोकांच्या डोळ्यामधून पाणी काढण्यामागे कांदा जबाबदार दिसत असला तरी त्यामागची खरी मंडळी हीच आहेत आणि हीच यातली खरी मेख आहे.

सध्या किरकोळ बाजारात कांद्याच्या किमती 70-80 रुपयांच्या घरात गेल्यात. नाशिकच्या घाऊक बाजारातही कांदा 4000 ते 4500 रुपये क्विंटलनं म्हणजे 40-45 रुपये किलोनं विकला जातोय. इथे दोन बाबी आहेत – 1. घाऊक बाजारात कांदा एवढा का वधारलाय? आणि 2. घाऊक बाजार आणि किरकोळ बाजार यांच्यात एवढी तफावत का आहे?

सुरुवात पहिल्या प्रश्नापासून करूया. आशियातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या नाशिकच्या घाऊक बाजारात कांद्याचे लिलाव या जुलैमहिन्याच्या सुरुवातीपासून चढ्या दरानं सुरू झाले. गेल्या पंधरा वर्षात 4000 ते 4500 रुपये क्विंटल या उच्चांकी दरानं कांद्याचे लिलाव होताहेत. याला कारण नैसर्गिक तूट. जून-जुलै महिन्यात बाजारात येणारा कांदा उन्हाळी कांदा असतो. तो शेतकऱ्यांनी जानेवारीनंतर पाटाच्या पाण्यावर पिकवलेला असतो. गेल्या वर्षीच्या दुष्काळामुळे (पावसाच्या आणि सरकारी नियोजनाच्याही) पाण्याआभावी कांदा करपला आणि नाशिक जिल्ह्यातील कांद्याचं उत्पादन 40 टक्क्यांनी घटले. त्यामुळे सध्या लासलगाव बाजार समितीत दररोज 20 हजार क्विंटलएवजी फक्त 8 हजार क्विंटल कांदा येतोय. आवक कमी, भाव जास्त या बाजाराच्या मूलभूत तत्वानुसार चढ्या भावानं लिलाव होताहेत.

onion3434

आता ही परिस्थिती ऑगस्ट- सप्टेंबरपर्यंत कायम राहाण्याची शक्यता असता, कारण बैलपोळ्यानंतर पोळ कांदा (जो सध्या पावसाच्या पाण्यावर पिकतो आहे) बाजारात आला की, आवक वाढेल आणि भाव पडतील. त्यामुळे थोडे दिवस ग्राहकांनी थोडा संयम बाळगला आणि व्यापाऱ्यांनी सध्याच्या टंचाईचा गैरफायदा घेतला नाही तर कांदा कोणालाच रडवणार नाही.

यातली दुसरी परिस्थिती ही खरी मेख आहे. घाऊक भाव आणि किरकोळ भाव यांच्यातील तफावत. जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुंबई-दिल्लीच्या बाजारात कांद्याचे भाव वाढायला सुरुवात झाली. 22 जुलैला शहरांमधल्या बाजारात कांदा 42 रुपये होता, पण तेव्हा नाशिकच्या घाऊक बाजारात कांद्यांचे लिलाव 20 रुपयांनी सुरू होते. म्हणजे तेव्हापासूनच ही तफावत सुरू होती. तेव्हा 20 रुपयांची तफावत आता 40 रुपयांवर पोहोचली आहे. पॅकेजिंग, सॉर्टिंग, ट्रान्पोर्टेशन हे सर्व खर्च धरले तरी कांद्याच्या होलसेल आणि रिटेल भावात दिसणारा हा फरक समर्थनीय नाही. कांद्याच्या नैसर्गिक तुटीचा गैरफायदा घेऊन व्यापारी ग्राहकांची करत असलेली शुद्ध फसवणूक आहे.

आणि सत्ताधाऱ्यांची भूमिका नेमकी इथे येतेय. उन्हाळ कांद्याचे उत्पादन 40 टक्क्यांनी घटने घटणे ही एका रात्रीत आलेली आपत्ती नाही. फेब्रुवारी 2013 मध्ये याची कल्पना सरकारला होती. त्यांनी वेळीच जुलै-ऑगस्टच्या तुटीचं गांभीर्य लक्षात घेऊन उपाययोजना करणे अभिप्रेत होते. ते सरकारने केले नाही. जे माणिकराव ठाकरे पुण्याच्या स्वस्त कांदा विक्रीत 40 रुपयाने कांदा विकू शकतात, त्यांच्या काँग्रेस पक्षाचे सरकार राज्यात आहे, त्यांच्या काँग्रेसकडे कृषी, पणन, सहकार ही कांद्याशी निगडित सर्व खाती आहेत. मग ते राज्यातल्या रिटेलच्या कांद्यांच्या भावांचे नियमन का करू शकत नाहीत हा खरा प्रश्न आहे.

उदाहरणादाखल आपण पुन्हा लासलगाव मार्केट घेऊया. लासलगावमध्ये दररोज 1 हजार शेतकरी त्यांचा कांदा विक्रीसाठी आणतात आणि खरेदी करणारे व्यापारी असतात अवघे 10. जास्त आवक झाली की भाव पाडणं आणि कमी आवक झाली की भाव चढवणं ही खेळी व्यापारी खेळतात. बाजार समित्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या साक्षीनं हे सुरू असताना ते काहीच करू शकत नाहीत, कारण व्यापाऱ्यांच्या लॉबीसोबत गुंतलेले काँग्रेस-राष्ट्रवादीचे आर्थिक-राजकीय हितसंबंध. खरं तर महाराष्ट्र शासनानं मॉडेल अँक्ट मंजूर केल्यावर शेतीमालाची खरेदीविक्री खुली केली. राज्यातल्या कोणत्याही व्यापाऱ्याला कोणत्याही बाजार समितीतीचे लायसन घेऊन लिलावात सहभागी होण्याची मुभा त्या कायद्यानं दिली. त्यातून मोजक्या व्यापाऱ्यांची मोनोपोली तुटली असती, व्यापाऱ्यांची संख्या वाढली, लिलावातील स्पर्धा वाढली असती आणि शेतकरी आणि ग्राहक या दोघांनाही त्याचा लाभ झाला असता. कर्नाटक सरकारने आताच ही पद्धत अवलंबली आहे. महाराष्ट्रात विशेषत:  कांद्याच्या मार्केटमध्ये मात्र हा कायदा कागदावरच राहिला आहे.

मुंबई-पुण्यातील व्यापारी दूर, शेजारच्या धुळ्यातील व्यापारीही नाशिकच्या बाजारात येऊ शकत नाहीत एवढी व्यापाऱ्यांची दादागिरी आहे. नाशिकच्या बाजारातील कांदा व्यापाऱ्यांच्या या दादागिरीला कंटाळून दोन वर्षांपूर्वी एका बाजारसमितीनं धुळ्याच्या एका व्यापाऱ्याला खरेदीचं लायसन दिलं होतं, त्याला मारहाण करण्यात आली, लिलावात सहभागी होऊ दिलं नाही एवढी यांची मुजोरी. मॉडेल अक्टनंतर खरं तर व्यापाऱ्यांच्या संख्येत वाढ होणं अपेक्षित होतं. लासलगावमधील व्यापाऱ्यांच्या लायसन्समध्ये वाढ दिसत असली तरी काही व्यापारी कुटुंब त्यांच्या नातलगांच्या नावावर लायसन्स खरेदी करून हा आभास निर्माण करताहेत हे सगळ्यांना माहीत आहे. एकाच व्यापाऱ्याच्या दोन मुलांच्या नावावर दोन लायसन, बायकोच्या नावावर अडत्याचं लायसन अशी सारी धूळफेक. पिंपळगावमध्ये तर व्यापाऱ्यांच्या संख्येतच घट झालीए. अधिकाधिक व्यापाऱ्यांना लिलावात सहभागी होण्याची परवानगी देणं, व्यापाऱ्यांची संख्या आणि स्पर्धा वाढवणं हाच यावरचा उपाय आहे, हे करणं सरकारची जबाबदारी आहे, कृषी,पणन आणि सहकार खात्यांचं हे काम आहे, पण ते सोडून राजकर्ते काहीतरी सवंग, दिखाऊ, फोटोबाज उपक्रमांनी नागरिकांची दिशाभूल करताहेत.

दिल्लीत काँग्रेसचं सरकार आहे, महाराष्ट्रात काँग्रेसचं सरकार आहे. काही वर्षांपूर्वी उत्तरेतील कांद्याचे भाव वाढले असताना तिथल्या राज्य सरकारने नाशिक मंडीतून थेट कांदा खरेदी करून आपल्या लोकांना पुरवला होता. स्पर्धा खुली करण्याचा महत्त्वाचा उपाय पुढ्यात असताना, व्यापारी साठेबाजी करतात अशी ओरड करून त्यांच्यावर इन्कम टॅक्सच्या रेड घालणं हा एक दिल्ली सरकारचा गेल्या तीन वर्षातला द्राविडी प्राणायाम. त्यातून भीक नको पण कुत्रा आवर असं म्हणण्याची वेळ येते. कारण रेड झाल्या की, व्यापारी पुन्हा लिलाव बंद पाडतात आणि सुरळीत चाललेलं मार्केट पुन्हा डिस्टर्ब होतं. सरकार मात्र, आम्ही व्यापाऱ्यांवर कशी कारवाई करतोय अशा वल्गना करण्यास मोकळं होतं, प्रत्यक्षात परिस्थिती काहीच सुधारत नाही.

कांद्याच्या मंडीवर पडू शकते एवढे आपले सरकार तकलादू झाल्याची भीती शिला दीक्षितांना वाटत असेल तर त्यांनी दिल्लीच्या व्यापाऱ्यांना नाशिकमध्ये पाठवून थेट कांदा खरेदी करावा, महाराष्ट्र सरकारने तो दिल्लीच्या व्यापाऱ्यांना उपलब्ध करून द्यावा. दिल्ली दूर, आधी पुण्या-मुंबईच्या व्यापाऱ्यांना नाशिकच्या लिलावांमध्ये सहभागी होऊ द्यावं, मार्केट व्यवस्थित स्थिर राहाते. पण त्याएवजी निर्यात बंदीचं तेवढंच सवंग हत्यार उपसून शेतकऱ्याला नामोहर केलं जातंय.

निर्यात बंदीची मागणी करणारं पत्र देणं हाही स्वस्त कांदा विक्री केंद्र चालवण्याएवढा सवंग उपाय आहे. निर्यात बंदी लादून शहरी मतदारांना खूश करता येतं, पण कांद्याच्या किमतींवर काही परिणाम होत नाही हे गेल्या 5 वर्षांच्या अनुभवातून सिद्ध झाले आहे, कारण नाशिकच्या मार्केटमधला फक्त 10 टक्के कांदा निर्यात होतो. निर्यात बंदी लागू केलीच तर त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना मात्र बसतो. लागू केलेली निर्यात बंदी सहा सहा महिने उठत नाही. 3 आणि 5 एवढ्या कवडीमोल भावानं कांदा विकावा लागतो, शेतकऱ्याच्या डिझेलचे पैसेही सुटत नाहीत आणि तो देशोधडीला लागतो हा अनुभव फार दूरचा नाही.

भाव वाढले तर निर्यातबंदीसारखे अघोरी हस्तक्षेप करून ते नियंत्रणात आणायचे आणि भाव पडले तर काहीच करायचं नाही या सरकारी दुटप्पी नीतीचे शिकार नाशिकमधले कांदा उत्पादक झाले आहेत. कांद्याचं वार्षित उत्पादन घटण्याचं तेही एक कारण आहे. गेल्या पाच वर्षांमधील कांद्याच्या भावांमधली या चढउतारांचा फटका बसलेला, कर्जबजारी झालेला शेतकरी कांद्याच्या ऐवजी दुसऱ्या पिकाकडे वळतोय. त्यामुळे निर्यातबंदीची घोषणा किंवा व्यापाऱ्यांवर इन्कम टॅक्सच्या रेड करणं हेही तेवढंच नाटकी, तकलादू आणि जास्त घातक आहे.

कांदा खाल्ला नाही तर कुणी मरत नाही अशी भाषणं शेतकरीबहुल मतदारसंघांमध्ये करणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना शहरात आल्यावर मात्र कांदा-भाकर खाणाऱ्या गरीबाच्या अश्रूंची आठवण येते हा दुटप्पीपणा आहे. ग्रामीण शेतकरी मतदारांनाही फसवायचं आणि शहरी मध्यमवर्गीय ग्राहकालाही.

 • Kiran

  Dear Dipte mam ex-lant serve i proud of you …..

 • suresh karale, mumbai

  Kandyachi ‘khari’ story kalali. Thanxs.

 • Sham Dhumal

  शेतीमालाला दर मिळाला पाहीजे असे सागून कांही नेते कांदा दरवाढीचे
  समर्थन करत आहेत. दर वाढवून साठेबाजी करुन एजंट आणि मोठे व्यापारी
  भरमसाठ फायदा करुन घेत आहेत.
  भ्रष्टाचार करुन अफाट कमाई करणार्‍यांना दरवाढीने कांहीच फरक पडत नसेल
  परंतु सामान्य जनतेचे काय?

close