भारत माझा देश नाही !!

August 15, 2013 8:11 PM8 commentsViews: 3083

sudhakar kasyap posted by- सुधाकर काश्यप, प्रिन्सिपल करस्पाँडंट, IBN लोकमत

आज 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्यदिन. पण खरंच भारताला स्वातंत्र्य मिळालंय. मिळालं असेल तर ते कुणाला मिळालंय, कुणाला मिळालं नाही. ज्यांना स्वातंत्र्य मिळालं नाही ते कोण आहेत? आणि त्यांना ते कधी मिळणार? ज्यांना मिळालंय ते कोण आहेत? त्यांनी त्या स्वातंत्र्याचं काय केलंय? असे अनेक प्रश्न माझ्या मनात आहेत. सर्वजण स्वातंत्र्य दिन साजरा करत आहेत. पण विचार करतोय, ज्यांना स्वातंत्र्य मिळालं नाही त्यांच्याबद्दल माझ्या मनात विचार सुरू झालाय. खूप विचार केल्यावर मला स्वातंत्र्य मिळालं नाही, असं मला वाटतं. मग जर मला स्वातंत्र्य मिळालं नाही तर मग हा देश माझा कसा? मी, या देशात महिलांना, शेतकर्‍यांना, दलितांना, आदिवासींना, अल्पसंख्यांच्या रूपात जगतोय.

महिला -दिल्लीत सामूहिक बलात्काराची घटना घडल्यानंतर पुन्हा एकदा माझं मन या देशाबद्दल विचार करू लागलं. देशाबद्दल म्हणजे देशाच्या भवितव्याबद्दल नव्हे तर देशाबद्दलच्या आत्मतीयतेबद्दल… अशा घटना अधूनमधून घडत असतात. जेव्हा जेव्हा मी हा देश माझा आहे का? याचा विचार करत असतो तेव्हा तेव्हा हा देश माझा नसावा, नव्हता अशाच भावना मनात आल्यात आणि येतात. दिल्लीची ‘ती’ घटना भयावहच होती. त्या घटनेतील बळीत मुलगी ही माझ्या कुटुंबातील आहे, या भावनेनं मी दु:ख व्यक्त करतो. मी स्वातंत्र्य मानतो पण भारताचा स्वातंत्र्य दिन मानत नाही. मी प्रजासत्ताक मानतो, पण भारताचा प्रजासत्ताक दिन मानत नाही. मी बाबासाहेबांनी दिलेली घटना मानतो पण हा देश मानत नाही. पूर्वी शाळेत असताना भारत माता की जय म्हणताना रक्त सळसळायचं. प्रचंड अभिमान वाटायचा. स्फूर्ती यायची, चेहर्‍यावर हास्य असायचं. पण जेव्हापासून हा देश जात, अस्पृश्यता, जातीवर आधारित समाजव्यवस्था असल्याचं कळायला लागल्यापासून देश या संकल्पनेला तडा गेलाय. देशाची घटना, त्यातून निर्माण होऊ शकणारी लोकशाही, प्रजासत्ताक या संकल्पनेतून बाबासाहेबांनी सारं केलं. पण त्यांची संकल्पना प्रत्यक्षात अस्तित्वात आलीच नाही. मग मी ठरवलं, असंच जगायचं या देशाचा मृत नागरिक म्हणून…

blog5
दलित - मला काही दिवसांपूर्वी एका डॉक्टरचा फोन आला. परळ येथील एका मोठ्या सरकारी हॉस्पिटलमध्ये दोन मागासवर्गीय डॉक्टरांना जातिवाचक बोललं जातं, त्यांचे वरिष्ठ त्या मागासवर्गीय डॉक्टरांना जातिवाचक बोलत असतात, बातमी करा म्हणून त्यांचा फोन होता. इथल्या महत्त्वाच्या खात्यात ठराविक जातीच्या लोकांनाच मोक्याच्या पोस्ट मिळत असतात. मागासवर्गीय अधिकारी सतत अडगळीत पडलेले असतात. कोणताही विभाग असो, कोणतंही खातं असो, तिथं जातपात असतेच असते. पुतळा विटंबनेच्या घटना घडत असतात. 11 जुलै 1997 सालात मुंबईतील रमाबाईनगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची घटना घडली. लोकांची माथी भडकावण्यात आली. 10 दलित ठार झालेत. संपलं त्यांचं स्वातंत्र्य… पुढच्या काळात निवडणुका झाल्या. युतीची सत्ता गेली. त्यासाठी दलितांच्या भावनेची किंमत मोजून मतांच्या स्वातंत्र्याचा लिलाव झाला. 2005 सालात खैरलांजी प्रकरण झालं. भैयासाहेब भोतमांगे या बौद्ध समाजातील व्यक्तीच्या कुटुंबातील तरुण मुलीवर बलात्कार करून हत्या करण्यात आली होती.

शेतकरी - या देशातील शेतकरी आत्महत्या करतो, पण व्यापारी कधी आत्महत्या करत नाहीत. सध्या कांद्याच्या काळ्याबाजाराचा प्रकार पाहा ना… शेतकरी कांदा पिकवून तो शेतात दोन रुपयांना विकतो. पण हाच कांदा बाजारात 80 रुपयांना मिळतोय. कधीकाळी ‘जहाँ डाल डाल पर सोने कि चिडिया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा’ असं म्हटलं जायचं. मात्र तसं राहिलं नाही. आता आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याच्या जळालेल्या कापसाची ‘चिडिया’ उरली आहे.

कामगार - इथला गिरणी कामगार देशोधडीला लागला. पण गिरणीमालक एफआयनं गब्बर झाला.पस्तीस वर्षं सेवा केलेल्या गिरणी कामगाराला पुन्हा गावी पाठवताना त्याच्या हातावर दोन-तीन लाख रुपये टेकवण्यात आले. तर त्याच मिलच्या जागेवर गिरणीमालक 25 हजार कोटी, 50 हजार कोटी रुपये कमावत आहेत. ही दरी का?

अल्पसंख्याक - या देशात नियमित दंगली होत असतात. 1993 सालात मुंबईत दंगल झाली. यावेळी अनेक मुस्लीम महिलांना ठार मारण्यात आलं. एकाच ठिकाणी हिंदू- आणि मुस्लिमांना ठार मारण्यात आलं होतं. 2002 सालात गुजरातमध्ये हिंदू-मुस्लिमांच्या दंगली झाल्या. यावेळी मुस्लिमांना ठेचून मारण्यात आलं. त्यांनी पुन्हा डोकं वर काढता कामा नये असं मारण्यात आलं. महिलांना तर त्यांच्या पोटातील गोळ्यासह मारण्यात आलं. मुस्लीम अधिकार्‍याला कॉन्फिडेन्शियल विभागात नेमलं जात नाही.

दिल्लीतील बलात्काराची घटना मला सतत आठवत असते. 6 जणांनी बलात्कार केला, जेवढं टोचता येईल तेवढं टोचलं आणि ठार केलं. अशा घटना रोजच घडत असतात. पूर्वी भारत माता की जय म्हणताना अभिमान वाटायचा. जन्माला घालणारी ती माता. देशाच्या पोटात अनेक लोक राहतात यामुळेच देशाला माता म्हणत असावेत, असा भाबडा समज होता. पण मुंबईतील दंगल, खैरलांजी, गुजरातच्या दंगली या घटना पाहिल्यानंतर/जगल्यानंतर आता भारत माता की जय हे शब्द तोंडातून निघत नाहीत. ज्या देशातील कामगारवर्गाला, शेतकरीवर्गाला, दलितांना, अल्पसंख्याकांना या देशाचे जर नागरिक मानलं जात नसेल, ज्या भगिनीवर, मातेवर असा लिंगभेदातून, जातीय वादातून, धर्मवादातून जर बलात्कार होत असेल तर यापुढे मला भारत माता की जय म्हणताना या माझ्या भगिनी आठवतील… तुम्हाला आठवतील का?

 • pandit patil

  mala hi bolayachi echha nahi ahe,
  hi sarkar kay karate?
  sainik marale jat ahet?
  roj roj balatkar hot ahe.?
  tari hi hi sarkar gapp ka?
  karan ki yachya aai-bahini-muli yachya var balatkar hot nahi mhanun he gapp basale ahet.

 • Sachin J

  Khup chan mat mandle ahai sir, kharach khup dadagiri ani bharstachar vadhala ahai,
  sir me ek software engineers ahai, me jevha pan ek software develop karto na tar mala adhi tyacha flow chart create karava lagto, ani jar flow chart barobar jar create zala nahi na tar maze software pan proper develop hot nahi, asech ya bharatachi paristhiti zali ahai, ki Bottom pasun tar Top paryant (Galli Pasun tar Delhi Paryant) sagala flow chart bighadla ahai, sagale lok pase khalyashivay kamach karat nahi… ani yacha fatka garibana busto…

 • Brave Bravest

  Kharach bharat ha Garib, alpa-sankhyank ,dalit yancha desh nahi aahe,

 • मधुकर बनसोडे चुनाभट्टी

  प्रत्येकाच्या मनातील भावना अगदी स्पष्टपणे व्यक्त केल्या आहेत . खूपच छान !!!
  ६६ वा स्वातंत्र्य दिन हर्ष-उल्हासात साजरा करण्यात आला . गेल्या ६६ वर्षात जी प्रगती केली त्याविषयी दुमत संभवत नाही परंतु आज जो विकास झाला आहे , जे स्वातंत्र्य मिळाले आहे त्याची फळे सर्वसामावावेषक आहेत का ? हा खरा प्रश्न आहे . स्वातंत्र्याची बीजे रोवली परंतु त्याचा वटवृक्ष होणे अभिप्रेत होते ,ते मात्र सध्या झाले आहे किंवा नाही याचे सिंहावलोकन होणे गरजेचे वाटते . सर्वसामान्याच्या मनातील याच भावना ध्वनित करण्यासाठी हा काव्य प्रपंच ……
  आता “ हे ” स्वातंत्र्य हवे …..

  कृषी प्रधान देशात आता शेतकऱ्यांना स्वातंत्र्य हवे ,
  …ते बाजार समित्यां , दलालां पासून !
  पालक -विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य हवे ,
  …ते लूट करणाऱ्या शिक्षण संस्थांपासून !
  माता-भगिनींना स्वातंत्र्य हवे ,
  … ते बलात्कारी नराधम-पिशाच्च वृतीपासून !
  रोग्यांना स्वातंत्र्य हवे ,
  … ते रोगापेक्षा भयाण ठरणाऱ्या मेडिकल बिलांपासून !
  जनतेला स्वातंत्र्य हवे ,
  … ते संवेदनशुन्य प्रशासन आणि कोडग्या राजकारण्यांपासून !
  प्रवाश्यांना स्वातंत्र्य हवे ,
  …. ते टोलमुक्त-खडेमुक्त रस्त्यांपासून !
  समाजाला स्वातंत्र्य हवे ,
  … ते धर्म-जातीच्या नावाने विष पेरणाऱ्यांपासून !
  गुंतवणूक दारांना स्वातंत्र्य हवे ,
  … ते सहकारातील स्वार्थी अपप्रवृत्ती पासून !
  समाजाला स्वातंत्र्य हवे ,
  … ते स्थानिक स्वराज्य संस्थातील भ्रष्ट नोकरशहा- नगरभक्षकापासून !
  विधानसभा – संसदेला स्वातंत्र्य हवे ,
  … ते गोंधळी आमदार – खासदारां पासून !
  श्रद्धेला स्वातंत्र्य हवे ,
  … ते बाबा-बुवांच्या अंधश्रद्धेच्या ‘जादू’ पासून !
  उद्योगधंदे -शेतीला -गावांना स्वातंत्र्य हवे ,
  … ते वीज भारनियमना पासून !
  निसर्गाला स्वातंत्र्य हवे ,
  … ते मानवी अतिक्रमणापासून !
  घर खरेदीदाराला स्वातंत्र्य हवे ,
  … ते अवास्तव लूट करणाऱ्या बिल्डरा पासून !
  मुलींना स्वातंत्र्य हवे ,
  …. ते गर्भातच मारणाऱ्या माता-पिता आप्तास्वकीयांपासून !
  उपवर मुलींच्या माता -पित्यांना स्वातंत्र्य हवे ,
  … ते हुंड्यासाठी अडणाऱ्या-मारणाऱ्या ‘वरां ’ पासून’ !
  कुपोषित बालकांना स्वातंत्र्य हवे ,
  … ते टाळूवरचे लोणी हडपणाऱ्या यंत्रणा पासून !

  सैनिकांना स्वातंत्र्य हवे ,
  सैनिकांना स्वातंत्र्य हवे ,
  खरतर ” लोकशाही ” लाच आता स्वातंत्र्य हवे ,
  … ते लोकशाहीचा गळा घोटनाऱ्या ‘सर्व (च) ‘ घटकांपासून !!!
  तिरंग्यालाही स्वातंत्र्य हवे ,
  …. ते भ्रष्ट – विवेकशून्य ‘हाता’ पासून !

  ……….. आणि तरीही सर्व देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा !!!!!

  श्री सुधीर लक्ष्मीकांत दाणी , बेलापूर , नवी मुंबई

 • archana kamble

  samajatylya pratyek tharacha vichar kela aahet hya lekha madhe. khup chan.

 • Sanket Utagi

  Khup chan lekh lihila aahe sir..

 • shende

  swatantra milale pan british adminitration as it is we are not able to make laws. as per modern society and we are killing the laws.

 • Shoeb Sayed

  good!!!

close