‘नाशिकमध्ये राष्ट्रवादीच, राष्ट्रवादीला पाडते’

August 16, 2013 8:13 PM0 commentsViews: 1865

16 ऑगस्ट : नाशिकमध्ये कुठं तरी चुकतंय. कधी कधी स्टेजवर बसणारे आमचीच लोकं काही चुकीचं करताय की काय हे कळायला मार्ग नाही. नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादीला राष्ट्रवादीच पाडते असा घरचा अहेर राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाला दिला. अजित पवारांनी थेट छगन भुजबळ यांच्यावरच निशाणा साधलाय.

याच व्यासपीठावर छगन भुजबळही हजर होते. त्यांनी आपल्या स्टाईलमध्ये अजितदादांना उत्तर दिलं. नाशिकमध्ये बाजार समिती आहे तिच्या भरभराटीसाठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे. पण एवढं सगळं चालवण्यासाठी दादा प्रामाणिकपणा लागतो असा टोला भुजबळांनी अजित पवारांना लगावला. नाशिक येथील पिपंळगावमध्ये राष्ट्रवादीच्या शेतकरी मेळावा पार पडला.

यावेळी बाजार समितीतर्फे बांधण्यात आलेल्या शरद पवार मार्केट आवाराचं उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं. यावेळी ते बोलत होते. गेल्या विधानसभा, लोकसभा आणि महापालिका या सर्व निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीची कमालीची पिछाडी झाली. दरम्यान, नाशिकमधल्या खड्‌ड्यांचं खापर मनसेवर फोडू नका, असं मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. त्याला अजित पवारांनी उत्तर दिलंय. आम्ही खड्डे बुजवतो आणि नाशिककर खड्डे पाडणार्‍यांना मतं देतात असा टोला त्यांनी मनसेलाही लगावला.

close