नक्षलग्रस्त भागात नवी पहाट, 412 तरूणांना नोकर्‍या !

August 17, 2013 4:41 PM0 commentsViews: 321

महेश तिवारी, गडचिरोली

17 ऑगस्ट :नेहमी बंदुकीच्या सावटाखाली जीवन जगणार्‍या भामरागड सारख्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागातल्या बेरोजगार मुलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याची संधी मिळालीय. इथल्या कमी शिकलेल्या मुलांना मुंबई, पुणे, नागपूरसारख्या मोठ्या शहरांत नोकर्‍या मिळाल्यात. गडचिरोली जिल्हा प्रशासनाच्या किमान कौशल्य कार्यक्रमामुळे त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळालीय.

गडचिरोली जिल्ह्यातली भामरागड, सिरोंचा, कोरची ही दुर्गम तालुके सतत पोलीस-नक्षलवाद्यांच्या चकमकीच्या छायेत असतात. इथल्या खडतर परिस्थितीमुळे 5 वी ते 10वी शिकून बेरोजगार राहिलेल्या मुलं मग नक्षलवादी चळवळीकडे आकर्षित होतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी एक योजना तयार केली. 775 मुलांची निवड करून त्यांना औरंगाबादला पाठवण्यात आलं.

या मुलांना तीन महिन्याचं हॉटेलिंग, वाहन व्यवसायाशी संबंधित प्रशिक्षण देण्यात आलं. नोव्हेंबर 2011 पासून 9 तुकड्यांचं प्रशिक्षण झालंय. आणि त्यातल्या 412 मुलांना मुंबई, पुणे, नागपूर, खंडाळा यासारख्या ठिकाणी पंचतारांकीत हॉटेल्स, कार शोरूममध्ये नोकर्‍याही मिळाल्यात.

किमान कौशल्य रोजगार योजनेसाठी प्रत्येक मुलावर 15 हजार रुपये खर्च होतो. गडचिरोलीचे पालकमंत्री आर.आर.पाटील यांनी त्यासाठी निधी उपलब्ध करून दिलाय. त्यामुळे उपेक्षित जीवन जगणार्‍या भामरागडसारख्या दुर्गम भागातल्या बेरोजगार मुलांच्या जीवनात नवा सूर्योदय झालाय.

बेरोजगारांच्या हाताला काम

  • - तीन महिन्यांचं हॉटेलिंग, वाहन व्यवसायाशी संबंधित प्रशिक्षण
  • - नोव्हेंबर 2011 पासून 9 तुकड्यांचं प्रशिक्षण
  • - 412 मुलांना मुंबई, पुणे, नागपूर, खंडाळा याठिकाणी मिळाल्या नोकर्‍या
close