बिहारमध्ये रेल्वेच्या धडकेत 28 भाविकांचा मृत्यू

August 19, 2013 9:57 PM0 commentsViews: 1668

bihar5555519 ऑगस्ट : बिहारमध्ये धमाडाघाट इथं आज सकाळी भरधाव रेल्वेची रूळावरच्या प्रवाशांना धडक बसून 28 भाविकांचा मृत्यू झालाय तर 40 जण जखमी झालेत. सहरसाजवळ धमाडाघाट या रेल्वे स्टेशनजवळ ही दुर्घटना घडली. धमाडाघाट या ठिकाणी कात्यायनी देवीचं मंदिर आहे, तिथे सध्या जत्रा सुरू आहे.

त्यामुळे स्टेशनावर मोठ्या प्रमाणात गर्दी होती. तिथे पॅसेंजरमधून प्रवासी उतरले होते. रुळाच्या दोन्ही बाजूंना पाणी साचल्यामुळे भाविक रुळामधून जात होते. त्याचवेळी पाटण्याकडे जाणारी राज्य राणी एक्स्प्रेस ही पाटणा-सहरसा इंटरसिटी रेल्वे ताशी 80 किमी वेगानं जात होती.

सध्या जत्रा सुरू असल्यामुळे तिथून जाणार्‍या सर्व रेल्वे थांबा नसला तरी हळू जातात. मात्र, राज्य राणी एक्स्प्रेसला वेग कमी करणं जमलं नाही आणि मोठी दुर्घटना घडली. या अपघातानंतर एक्स्प्रेस काही अंतर पुढे जाऊन थांबली. त्यानंतर संतापलेल्या जमावानं रेल्वेच्या काही कोचमध्ये जाळपोळ केली, तसंच रेल्वेच्या चालकालाही मारहाण केली. त्यात तो गंभीर जखमी झाला. प्रवाशांनी दोन रेल्वेनांही आग लावली.

या दुर्घटनेनंतर घटनास्थळी पोहोचण्यास रेल्वेच्या अधिकार्‍यांना उशीर झाला. त्यामुळेही जमाव आणखी संतापला होता. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मृतांच्या नातेवाईकांसाठी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केलीय.

close