दाभोलकरांचा खून हा पूर्वनियोजित कट -मुख्यमंत्री

August 20, 2013 1:31 PM4 commentsViews: 3892

cm pruthaviraj chavhan20 ऑगस्ट : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून हा पूर्वनियोजित कट होता. या प्रकरणाचा कडक तपास करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. तसंच या कटाची कुणालाही काहीही माहिती असल्यास त्यांनी पुणे क्राईम ब्रांचला कळवावी. माहिती देणार्‍याला 10 लाखांचं बक्षीस देण्यात येईल अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली.

दाभोलकर यांचा खून महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीला हादरा आहे. हल्लेखोरांची गय केली जाणार नाही अशी प्रतिक्रियाही मुख्यमंत्र्यांनी दिली. ते कोल्हापूरमध्ये बोलत होते. तर पुरोगामी महाराष्ट्रात अशी घटना घडणं हे अत्यंत धक्कादायक आहे अशी प्रतिक्रिया गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी दिली.

या प्रकरणी तपास करण्याचे आदेश देण्यात आले असून पुणे पोलीस हल्लेखोरांचा कसून शोध घेत आहे असंही पाटील यांनी सांगितलं. दरम्यान, राज्यभर सामाजिक संघटनांनी आणि कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवत आहे. नाशिकमध्ये जेल भरो आंदोलन करण्यात आलंय. तर मुंबई आणि पुण्यात कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली.

 • abhay

  महाराष्ट्राचा नव्हे भारताचा अतिशय ज्ञानतपस्वी,मानवतावादी, अगदी साधी सरळ व्यक्ती आज सृष्टी आड गेली नव्हे घालवली. त्यांच्या विचारांचे खंडण करण्याचे सामर्थ्य हत्या करणाऱ्या किंवा त्यांना विरोध करणाऱ्यांच्या विचारात अजिबातच नव्हते. हेच यामुळे सिध्द झाले. शेवटी ही विचारांची लढाई विचारांनी लढाईची असते. पण हिस्त्र रानटी लोकांना त्याचे काय, अगदी रानटी हटटी धर्माध मनाच्या लोकांनी जशी नालंदा तक्षशिला, ही भारतीय लोकांची निर्मिती, शोध असलेली विद्यापीठे जाळून टाकली. लाखो बौध्द भिक्षूंचे खून केलेत. ते विचाराने आणि आचाराने खऱ्या अर्थाने विवेकवादी अगदी भ्रारतीय राज्य घटना, मानव व निसर्ग संबधित बौध्द धम्माचे व जागतिक दर्जाचे विद्वान म्हणून खऱ्या अर्थाने पालनकर्ते ठरले व जगले. त्यांना सांभाळणाऱ्या त्यांच्या कुटंुबास व चळवळीस नम्र प्रणाम.

 • Rakesh Patil

  कसली श्रद्धांजली आणि कसली अंत्ययात्रा….

  हा नैसर्गिक मृत्यू आहे काय? कि अपघाती निधन?

  हा तर खून आहे ज्याची तुलना गांधी हत्येशीच होऊ शकते!

  हे दुष्कृत्य डॉ. दाभोलकर ह्यांच्या अंधश्रद्धा निर्मुलन कार्यांच्या विरोधकांनीच
  म्हणजेच धर्मांध सनातनी विकृत मानसिकतेच्या गुंडांनी केले आहे ह्यात काही शंका आहे
  काय?

  …आणि कोण होते दाभोलकरांचे विरोधक?

  चीड येते ती अशा विकृत्तीना पाठीशी घालणाऱ्या सुसंस्कृत (?) समाजाची!

  अजून पोलिस तपास चालू आहे, स्टेटमेंट यायचे आहे; म्हणून काही बोलू नका म्हणे!

  …पोलिस तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया ह्यातून काय निष्पनन व्हायचे ते होईलच!

  त्यातील राजकीय, जातीय वैगैरे संदर्भ जे काही असतील ते प्रक्रियेतून स्पष्ट व्हायचे ते होतीलच.

  पण सूर्यप्रकाशा इतक्या सत्य आणि स्पष्ट गोष्टी चा निषेध करायला कोणत्या निष्कर्षांची
  वाट पहायची?

  सकृतदर्शनी (prima facia) इ. शाब्दिक खेळ करून तरी आम्हाला सनातन्यांचा निषेध करायचा अधिकार नाही काय?

  धर्मांध सनातनी विकृत अप-प्रवृत्तींचा तसेच ह्या मुलतत्ववाद्यांना पाठीशी
  घालणाऱ्या त्यांच्या समर्थकांचा जाहीर निषेध…

  आता ह्या विषयावर शुल्लक राजकारण नको, संप नको, पुणे बंद नको …

  १. जादूटोणा विरोधी विधेयक सरकारने तडकाफडकी मंजूर करावे.

  २. सनातन प्रभात आणि तत्सम जातीय व धर्मांध वातावरण निर्माण करणाऱ्या संस्थांवर
  कायमची बंदी घालावी.

  हीच खरी श्रद्धांजली.

  नरेंद्र दाभोलकर अमर रहे!

 • asmita

  काल पुण्यात झालेली डॉ . दाभोळकरांची हत्या हि एक शोकांतिका होती . आजवर ज्यांनी प्रस्थापित समाजाच्या चुकीच्या रूढी , परंपरा किंवा मान्यता यांच्याविरोधात
  समाज कल्याणाचे काम करायचे पाहिले ,नवा विचार मांडायचा पाहिला , त्यांना उपेक्षा , विरोध नि असा दुर्दैवी अंत हेच मिळाले आहे . इतिहास सांगतो कि एखाद्या व्यक्तीच्या विचारांना सोनेरी कड हि त्या व्यक्तीच्या आहुतीने मिळते मग ते महात्मा गांधी असोत , मार्टिन ल्यूथर किंग असोत , नाहीतर डॉ . दाभोलकर असोत . पण प्रत्येक वेळी समाजाला बलिदानाची गरज का ? का आपण कुठल्यातरी तथाकथित धर्म ठेकेदारांचे अस्तित्व मान्य करतो आणि सुधारकवादी लोकांचा त्यांच्यासाठी नरबळी देतो ?
  बुद्धी नावाची गोष्ट गहाण ठेवण्याची इतकी सवय का व्हावी?
  आता खरच समाज , राज्यकर्ते यांना खरच चाड असेल तर जादूटोणा बिल ताबडतोब पास करू घ्या .

  अन्यथा दाभोलकरांचे बलिदान एक नरबळी ठरेल .

 • SUDHIR LAXMIKANT DANI

  .…. हि दाभिंकता आता थांबवा
  भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे , महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे हा दांभिकपणा जो पर्यंत थांबत नाही तो पर्यंत डॉ . नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येवर भाष्य करणे , प्रतिक्रिया देणे निरर्थक ठरते . दाभोलकरांच्या निकटवर्तीयांनी त्यांच्या अंत्यसंस्कारानंतर एका वाहिनीला दिलेली प्रतिक्रिया मात्र सरकारच्या डोळ्यात ( बंद ? ) झणझणीत अंजन घालणारी आहे . त्यांनी सांगितले ( खरे बोलू !) ” मला सरकारकडून फारशी काही आशा नाही “. याचा अर्थ असा की मारेकरांना पकडून काही शिक्षा होईल वा भविष्यात अंधश्रद्धा निर्मुलन विधेयक संमत होईल याविषयी आशादायी चित्र नाही . अर्थातच जनसामान्यांची देखील हीच भावना आहे आणि या पूर्वीच्या अनुभवातून ती निर्माण झालेली आहे . माहिती कार्यकर्ते सतीश शेट्टीचे उदाहरण यासाठी पुरेसे बोलके आहे .

  भारतीय लोकशाही व्यवस्थेतील राजकीय पक्षांचे सरळ सरळ ” धार्मिक ध्रुवीकरण ” झालेले दिसते . त्यामुळे धर्मनिरपेक्षता हि केवळ तोंडी लावण्यापुरतीच आहे हे वास्तव आहे . महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचे राज्य आहे अशी सातत्याने दवंडी पिटली जाते , यात प्रसारमाध्यमांचा देखील सिंहाचा वाटा आहे . प्रत्यक्षात ज्या राज्यात अंधश्रद्धे विरोधातील विधयक सातत्याने डावलले जाते , जातपंचायतीच्या निर्णयावर समाजाला नाचवले जाते , स्रीभृणहत्या थांबत नाहीत , बलात्कार करणाऱ्यांना वर्षानुवर्षे शिक्षा होत नाही त्या राज्याला पुरोगामी म्हणून संबोधणे हिच खरी अंधश्रद्धा आहे असे म्हणणे खचितच अयोग्य ठरणार नाही . पुरोगामित्वाच्या परिभाषेत हे सर्व बसते का ? याचा उहापोह होणे गरजेचे वाटते , अन्यथा हे केवळ मृगजळ / दिशाभूलच ठरते.
  आज दाभोलकरांच्या हत्तेनंतर प्रसारमाध्यमे खास करून टीव्ही वाहिन्या ‘टीव -टीव ‘ करत आहेत . या सर्वाना सामान्य जनतेचा प्रश्न हा आहे की , हे विधेयक सरकारच्या गळी उतरविण्यासाठी , ज्यांचा याला विरोध आहे त्यांचे पितळ उघडे पाडण्यासाठी म्हणून लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून कोणते कर्तव्य बजावले . प्रसारमाध्यमांची केवळ ‘ प्रतिक्रिया ‘ वादी भूमिका सवेंदनशुन्यच ठरते . अंधश्रध विधेयक पास करून घेणे हि केवळ एकट्या दाभोलकरांची जबाबदारी होती काय ? डॉ . दाभोलकरांची ची हत्या हि केवळ व्यक्तीची हत्या नसून दुष्ट्प्रवृतीने अहिंसात्मक -सतप्रवृती -विवेकी विचारांचा गळा घोटण्याचा प्रकार आहे . विरोधाला थेट संपवायचेच हि नवी संस्कृती महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात रुजताना दिसते आहे आणि हे सर्वात जास्त घातक दिसते .
  सर्वात महत्वाचे हे की , ज्या राजकीय पक्षांनी -नेतृत्वानी दाभोलकर प्रस्तुत महाराष्ट्राच्या अंधश्रध विधेयकाला आजपर्यंत त्यांनी प्रत्येक अधिवेशनाच्या वेळेस मंत्रालयाचा उबराठा झिजवूनही केवळ वाटण्याच्या अक्षदा दाखविल्या त्यांना दाभोलकर कुटुंबियांचे सांत्वन करण्याचा , हत्तेविषयी हळहळ करण्याचा नैतिक अधिकार उरतो का ? जर सरकारला ‘हो ‘ असे वाटत असेल तर पुढच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संबंधीत विधयक एकमताने संमत करावे , हीच खरी या दिव्य आत्म्याला आदरांजली ठरेल .

close