दाभोलकरांचे मारेकरी मोकाटच

August 24, 2013 3:37 PM0 commentsViews: 345

dabholkar44424 ऑगस्ट : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला आता 100 तास उलटून गेलेत. मात्र अजूनही मारेकरी मोकाटच आहे. पुणे क्राईम ब्रांच, मुंबई क्राईम ब्रांच या प्रकरणाचा तपास करत आहे. मात्र पोलिसांच्या हाती अजूनही काहीच धागेदोरे लागले नाही. ज्या दोन मारेकर्‍यांनी गोळीबार केला त्यातील एकाचे रेखाचित्रही प्रसिद्ध करण्यात आले.

ज्या दुचाकीवरून ते आले होते त्याचा नंबर पोलिसांनी मिळाला होता यासाठी 18 वाहनं ताब्यात घेण्यात आली पण हाती काहीच लागलं नाही. एव्हाना सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी मिळवले असून त्यातूनही काहीही निष्पन्न झालं नाही. विशेष म्हणजे दाभोलकर यांच्या हत्येच्या अगोदर त्यांना हिंदूत्त्ववादी संघटनांकडून धमक्या मिळाल्या होत्या.

त्यांच्या खुनानंतर राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हा हत्येचा कट होता असं स्पष्ट केलं होतं. जर हा कट होता तर राज्याचं गुप्तचर खातं आणि पोलिसांना याचा सुगाव का लागला नाही असा प्रश्न उपस्थित झालाय. आज दाभोळकरांचा खून होऊन चौथा दिवस उजाडला तरीही आरोपी मोकाटच आहे. आरोपींना लवकरच हुडकून काढू असं गृहराज्यमंत्री सांगत आहेत. तर तपास दिशाहीन सुरू असल्याबद्दल नाराजी व्यक्त होतेय.

close