मर्जीप्रमाणे निकाह केला म्हणून कुटुंबावर बहिष्कार

August 27, 2013 3:51 PM0 commentsViews: 1632

sayad family nikha27 ऑगस्ट : महिलांना समान अधिकार मिळाला पाहिजे असं सांगत रूढी परंपरांना फाटा देऊन एकाच मंडपात दुल्हा-दुल्हन समोरासमोर बसून निकाह केल्याचा धाडसी प्रयोग बारामतीत दोन उच्चशिक्षित मुस्लीम तरूणींनी केलाय. पण त्यांचा हा धाडसी निर्णय वादात सापडलाय. या निकाहाला सनातनी मुस्लीम धर्मगुरुंनी बाद ठरवत सय्यद कुटुंबीयांवरच बहिष्कार टाकलाय. विशेष म्हणजे या निकाहाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते. या निकाहामुळे सय्यद कुटुंबीयावर बहिष्कार घालणे अत्यंत चुकीचं आहे असं स्पष्ट मत मुस्लीम सत्यशोधक समाजाचे सय्यदभाई यांनी व्यक्त केलं.

बारामतीमध्ये 25 ऑगस्ट रोजी सय्यद कुटुंबीयाच्या आसमाचं लग्न हडपसरच्या शेख कुटुंबीयातील मुलाशी झालं. विवाहात महिलांना समान वागणूक मिळावी यासाठी आसमा आणि करीष्मा या दोन बहिणींनी आपल्या लग्नाची तयारी वेगळ्या पद्धतीने केली. त्याची सुरूवात त्यांनी लग्न पत्रिकेपासून केली. मुस्लीम समाजात लग्न पत्रिकेत मुलींचे नाव टाकत नाही. पण या परंपरेला बाजूला सारत दोघींही आपला नावं पत्रिकेत छापून आणली.

तसंच ऐन निकाहाच्या वेळी एकाच मंडपात दुल्हनला दुसर्‍या बाजूला बसवले जाते आणि नवर्‍या मुलांला दुसर्‍या बाजूला बसवले जाते. आणि साक्षीदारांनी दोघांकडे जाऊन कबुली घेऊन निकाह लावला जातो.  पण आसमा आणि करिष्मा यांनी ही पद्धत साफ बाद ठरवली. आणि एकाच मंडपात सर्वांसमक्ष निकाह केला. त्यांचा हा धाडसी निर्णय येथील सनातनी मुस्लीम धर्मगुरूंना सहन झाला नाही. ही पद्धत मुस्लीम धर्मामध्ये मान्य नाही.

तसंच लग्न लावणारा काझी हा अधिकृत नसल्याचं सांगत या कुटुंबांवर बहिष्कार घालण्यात आलाय. या निकाहामुळे मुस्लीम धर्मियांच्या भावना दुखावल्याचा आरोप करत मुस्लीम समाजातील काही लोकांनी विभागीय कार्यालयासमोर काळ्या फिती लावून निदर्शनं सुद्धा केली. तर हा निकाह बिल्कुल चुकीचा नाही. त्यांनी इस्लाम धर्माच्या विरोधात काहीही केलं नाही. नव्या काळानुसार निकाह करणे हे योग्य आहे असं मुस्लीम सत्यशोधक समाजाचे सय्यदभाई यांनी ठणकावून सांगितलं. मीही माझ्या मुलाचं पुण्यात समोरासमोर बसवून निकाह लावून दिला होता त्याला कुणीही विरोध केला नाही अशा निकाहाला विरोध करणे अंत्यत चुकीचे आहे असंही सय्यदभाईंनी सांगितलं.

close