का घडतंय पुन: पुन्हा तेच?

August 27, 2013 10:16 PM7 commentsViews: 1146

ketki joshiPosted By – केतकी जोशी, असोसिएट एडिटर,IBN लोकमत

 
पुन्हा तेच घडलंय… अगदी तसंच… फक्त ठिकाण, शहर बदललंय… नाहीतर काय फरक आहे? पुन्हा एकदा एका मुलीचं आयुष्य उद्‌ध्वस्त करून टाकणारा बलात्कार… त्यावरच्या संतप्त प्रतिक्रिया… निषेध मोर्चा… अगदी तेच… विरोधकांनी केलेली सत्ताधार्‍यांच्या राजीनाम्याची मागणी… पण या सगळ्यांमध्ये पुन्हा एकदा सुरक्षिततेचा प्रश्न फक्त चर्चेच्या पातळीवर… एखाद्या मुलीला, महिलेला अगदी मनापासून खरोखर सुरक्षित वाटायला पाहिजे, असं का नाही वाटत कोणाला?

मुलींना कुठेही, कधीही अगदी बिनधास्तपणे फिरता येतं अशी ख्याती या मुंबईची… अगदी रात्री-अपरात्रीही कोणाची सोबत नसेल तरीही महिला मुंबईत घराबाहेर पडू शकतात, बाहेर फिरू शकतात असं म्हटलं जायचं… अगदी लोकलच्या प्रवासापासून ते रस्त्यावर चालण्यापर्यंत खरोखर या मुंबईत सुरक्षित वाटायचं… अगदी पहाट असो किंवा अपरात्र पुरुषांच्या सोबतीनं महिलाही मुंबईत आपली जबाबदारी, कर्तव्यं पार पाडण्यासाठी बाहेर जाऊ शकायच्या.

मग आताच हे असं का घडतंय? कोणतीही वेळ असो, का शंका येते मनात… कसली तरी अनामिक भीती प्रत्येकीच्याच मनाच्या कोपर्‍यात दडून बसलेली… बाहेर तर पडावंच लागतं… अनेकींना आपलं पोट भरण्यासाठी, शिक्षणासाठी, करिअरसाठी…थांबून कसं चालेल. म्हणून बाहेर तर पडतातच या महिला… पण मनातल्या या भीतीचं काय करायचं? ज्या शहरात इतक्या विश्वासानं आलो, विसावलो, ज्या शहरानं आत्मविश्वास दिला,तिथं असं अविश्वासाचं वातावरण कसं झालं याचं उत्तर काही मिळत नाही.

कितीतरी वेळेस लोकलमध्ये रात्री अगदी उशिरा प्रवास करताना किंतुही मनात यायचा नाही. आता मात्र दिवसाही सांभाळावं लागतंय… न जाणो, कोणीतरी हल्ला करेल का आपल्यावर, कोणी डब्यात शिरेल… बाहेरून एखादा दगड आला तर… सगळ्यात वाईट म्हणजे या कालच्या घटनेनं तर दिवसाही असुरक्षितता वाटायला लागली आहे. आपण खंबीर राहायला पाहिजे, प्रतिकार करायला पाहिजे… आवाज उठवला पाहिजे… सगळं पटतंय… पण संधीच नाही मिळाली तर… ही भीतीही आहेच ना!

mumbai gang rape

निर्भया प्रकरणानं धास्तावलेल्या पोलिसांनी आता या प्रकरणात अगदी युद्धपातळीवर तपास करून पाचही आरोपींना अटक तर केलीय, पण त्यामुळे या मुलीचं उद्‌ध्वस्त झालेलं आयुष्य परत येऊ शकतं का? या बलात्कार झालेल्या आरोपींना फक्त शिक्षा देऊन हे प्रकरण संपत नाही. तर या मुलींचं पुनर्वसन करणं, त्यांना परत सामान्य त्यांचं पूर्वीसारखं आयुष्य जगण्याची संधी देणं ही त्याहीपेक्षा मोठी आव्हानं आहेत.

या सगळ्यामध्ये एकाच गोष्टीचं वाईट वाटतं, ते म्हणजे निर्भया प्रकरणात किंवा आताच्या मुंबईच्या प्रकरणात बलात्कार झाल्यानंतर ती तिथं कशाला गेली होती, हा प्रश्न कसा काय विचारला जाऊ शकतो… एखाद्या मुलीवर बलात्कार झाल्यावर तिचे कपडे, तिचं अमुक वेळेला बाहेर जाणं, तिच्यासोबत कोणी होतं की नव्हतं, ती तिथं जायची गरजच काय होती, या सगळ्यावर कशी काय चर्चा होते… बाहेर गेलेल्या मुलीवर, महिलेवर बलात्कार होतो, तेव्हा ती बाहेर जाण्याचा मुद्दा उपस्थित करणार्‍यांना एकच प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे जेव्हा घरात घुसून बलात्कार केला जातो, तेव्हा काय म्हणायचं…आपल्यावर कोणत्याही क्षणी बलात्कार होईल या भीतीनं मुलींनी, महिलांनी बाहेर जाण्याचं थांबवायचं…

उलट आपल्या समाजातल्या मुलींना, महिलांना कोणत्याही वेळेस, कुठेही निर्धास्तपणे जाता यावं असं वातावरण आपल्या समाजात निर्माण व्हावं यासाठी काय करता येईल यावर नुसतीच चर्चा करण्यापेक्षा काय करता येईल ते पाहिलं पाहिजे… आणि ते अगदी वैयक्तिक पातळीपासून ते प्रशासकीय पातळीपर्यंत झालं पाहिजे… पण साधा जाता जातासुद्धा मुलीला, महिलेला ते अगदी वृद्ध बाईलाही धक्का मारण्याची मानसिकता कशी बदलता येणार? मुळात बाई दिसली की अश्लील बोलणं, तिला स्पर्श करणं, धक्का मारणं हे कसं थांबवणार…

एखाद्या मुलीनं नकार दिला की तो पचवण्यापेक्षा तिच्यावर अ‍ॅसिड टाकणं सोपं आहे, असा विचार कधी बदलणार… आणि या सगळ्यासाठी गरज आहे ती अत्यंत कठोर आणि जरब बसणार्‍या अशा शिक्षेची… गुन्हा केला तरी काही दिवसांनी सुटून बाहेर येऊ शकतो, हे माहिती असल्यामुळे शिक्षेचं गांभीर्य राहत नाहीये. अगदीच नशीब असेल तर गुन्हा सिद्धही होत नाही… कधी कधी तर गुन्हा सिद्ध होऊ नये यासाठी काय करावं लागतं हेदेखील आधीच माहिती असतं… त्यामुळेच तर शिक्षेची जरब नाही आणि नैतिकतेचा धाक नाही अशा परिस्थितीत विनयभंग, बलात्कार ते अगदी अ‍ॅसिड टाकण्यापर्यंत म्हणनूच धाडस केलं जातं. अत्यंत कठोर आणि गंभीर अशी शिक्षा झाल्याशिवाय त्याबद्दल जरब बसणार नाही… पण तोपर्यंत असे आणखी किती बलात्कार घडत राहणार?

 • Amol Mane

  balatyakaryala golya ghalun thar marnyachi shiksha vhayala pahije. tarach he thambel. shivay polisankadun dekhil yogya ashe pratibandhatyamak upay vhayala pahijet. tarach mahila surakshit vavaru shaktil.

 • Amol Mane

  balatyakaranya chaukat golya ghalun maral pahije mhanje parat ase krutya honar nahi. polisankadun pratibandhatyamak upay vhayala pahijet.

 • SANDEEP CHAVAN

  KHARAY, GARAJ AAHE TI KATOR KAYDYACHI… PURUSHANCHI MANSIKTA BADLNYACHA EKACH PARYAY AAHE TO MHANJE KADAK KAYDA AANI TYACHI KATOR AMALBAJWANI…

 • Ashok Samindar Hole

  khare tar garaj ahe kathor kaydyachi,karan kuni ek vyakti kinva sanstha ya ghatananna payband ghalu shakat nahi. karan ya ghatana kuthehi ani kunasobatahi ghadu shaktat..

 • Dnyandev Bhoir

  या सर्व वाईट गोस्टीना भारतीय चित्रपट सृष्टी व सेन्सर बोर्ड जबाबदार आहे….सिंनेमात वाईट गोस्टी ना खतपाणी, उत्तेजित , आंगप्रदरशन आशलील चाले आसे प्रोसतहान देणार्‍या वाईट गोस्टी दाखवून समाजामध्ये आराजकता माजवतात…. आणि या गोस्टी घडवून आणतात

 • Saagar lokare

  I like your blog…to destroy such activities we have to first change ourselves by changing our thoughts.

 • Saagar lokare

  Also I must have to mention here that your news program Salaam Maharashtra is one of the best news bulletin ever seen…If it possible give news bulletins whole day on channel.

close