दाभोलकरांचे खुनी गजाआड कधी?

August 27, 2013 10:14 PM1 commentViews: 247

27 ऑगस्ट : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला आज एक आठवडा पूर्ण होतोय. पण अजूनही पोलिसांच्या हाती काहीही ठोस पुरावे लागलेले नाहीत. त्यामुळे तपासही दिशाहीनच असल्याचं चित्र आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे हाती लागलेत, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतरही तपासात काहीच प्रगती झालेली नाही.

मंगळवार 20 ऑगस्ट 2013…सकाळी 7 वाजून 22 मिनिटांनी डॉ.नरेंद्र दाभोलकर यांचा पुण्यात गोळ्या झाडून खून झाला. त्यानंतर संपूर्ण राज्यातलं वातावरण ढवळून निघालं. डेक्कन पोलीस स्टेशनपासून अगदी थोड्या अंतरावर झालेल्या या हल्ल्याचा लवकरात लवकर तपास करू, असं आश्वासन पोलिसांपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळ्यांनी दिलं. पण सात दिवस उलटले तरीही तपास मात्र अगदी प्राथमिक अवस्थेतच आहे. याबद्दल तीव्र संताप व्यक्त होतोय.

डॉ. दाभोलकर यांच्या खुनाचा शोध घेण्यासाठी पोलिसांची 19 पथकं कामाला लागली आहेत. पोलिसांच्या हाती काही सीसीटीव्ही फूटेज लागलंय. 40 पेक्षा जास्त मोटरसायकलींचा तपास करण्यात आलाय, तसंच तळोजा, येरवडा कारागृहातल्या आरोपींचीही चौकशी करण्यात आलीये. काही कट्टरतावादी संघटना, बुवा-बाबा, खडे-रत्न विकणारे दलाल यांचीही चौकशी करण्यात आलीये. तर याबाबत महत्त्वाचे धागेदोरे मिळाले असल्याची माहिती खुद्द मुख्यमंत्र्यांनीच दिली होती.

सूत्रधारापर्यंत तर नाहीच पण मारेकर्‍यांपर्यंतही अजून पोलीस पोहोचू शकलेले नाहीत. पुण्यात गेल्या काही दिवसांमध्ये अशा खुनाच्या घटना घडल्यात आणि त्यातल्या आरोपींना शोधण्यात पोलिसांना अपयश आलंय. त्यामुळे डॉ. दाभोलकरांच्या खुन्यांचंही तसंच होऊ नये, ही महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा आहे.

तपास कुठपर्यंत?

 • - पोलिसांची 19 पथकं कामाला
 • - सीसीटीव्ही फूटेज हाती
 • - 40 पेक्षा जास्त मोटरसायकलींचा तपास
 • - तळोजा, येरवडा कारागृहातल्या आरोपींची चौकशी
 • - कट्टरतावादी संघटना, बुवा-बाबा, खडे-रत्न विकणारे दलाल यांचीही चौकशी

 • Sanjay Pethe

  … आठवडा उलटून गेला तरी अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या ” डॉ. दाभोलकरांचे मारेकरी ” सापडत नाहीत …
  सिनेमात आणि सिरीयल्स्मध्ये नेहमी असे दाखवतात, की उतावळ्या व्यक्ती, ह्या नेहमीच पोलिस यंत्रणेकडे एखाद्या ” संशयित व्यक्तीवर किंवा संघटनेवर ” विनापुरावा आरोप करीत, केस मधील लक्ष दुसरीकडे वळवण्याचा जाणूनबुजून प्रयत्न करीत असतात आणि सरतेशेवटी, ह्या उतावळ्या व्यक्तींवरच Boomerang होउन, ते आरोपी असल्याचे सिद्ध होते.
  .
  डॉ. दाभोलकरांच्या मारेकऱ्यांच्या बाबतीतही ” तसेच ” काही असेल का ? म्हणूनच बुचकळ्यात पडलेले सरकार आणि पोलिस यंत्रणा, ह्यांच्या संशयाची सुई अजून गरगर फिरत बसली नसेल ना ? …
  .
  (माफ करा सायेब … म्या आपला अडानी मानूस … म्हटल आपनबी टकूर चालवून पाऊ )

close