शांततेनं लढत राहू, विचारांची लढाई लढू -निखिल वागळे

August 28, 2013 10:37 PM0 commentsViews: 876

28 ऑगस्ट : दाभोलकरांच्या मारेकर्‍यांमुळे आज राज्यात अशांतता पसरलीय. याला सरकारही तितकंच जबाबदार आहे. अशा अपप्रवृत्तीविरोधात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लढा देत राहू, गौतम बुद्ध आणि महात्मा गांधींच्या अहिंसेच्या मार्गाने लढत राहू, तुम्हाला नेस्तनाबूत विचाराने करू. यासाठी निश्चितपणे प्रयत्न करू. हीच दाभोलकरांना श्रद्धांजली नसून हा आमचा सलाम असेल, अशा शब्दात आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी ठणकावून सांगितलं. तसंच जिथं तिरस्कार असणार नाही, तिथं विषमता असणार नाही, वैमनस्य असणार नाही, जिथं केवळ समता नांदेल आणि सर्वांना न्याय मिळेल असा समाज निर्माण करण्याचा निर्धार आपल्याला करावा लागेल.

डॉं.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी आणि त्यांचा विचार कसा पसरवता येईल यासाठी पुण्यात राष्ट्र सेवा दलाकडून निर्धार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असलेल्या आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी 50 वर्षांपूर्वी 28 ऑगस्टलाच मार्टिन ल्युथर किंग यांनी अमेरिकेत काढलेल्या ऐतिहासिक मार्चचा संदर्भ देत तरुणांनी नरेंद्र दाभोलकरांचे विचार जागवण्याकरिता पुढाकार घ्यावा, असं आवाहन केलं.

या कार्यक्रमाचे सामाजिक कार्यकर्ते अभिजीत वैद्य अध्यक्ष होते. सामाजिक कार्यकर्त्या रजिया पटेल, ऍडव्होकेट असीम सरोदे, साप्ताहिक कलमनामाचे संपादक युवराज मोहिते, दाभोलकरांची कन्या मुक्ता दाभोलकर यांनीही मनोगतं व्यक्त केली. ज्येष्ठ नाट्यकर्मी डॉ.श्रीराम लागू यांनी निर्धार प्रतिज्ञेची उपस्थितांना शपथ दिली. कार्यक्रमाला अनेक मान्यवर तसंच राज्याच्या कानाकोपर्‍यातून आलेले तरुण-तरुणी मोठ्या संख्येने सामील झाले होते.

close