पूर्वजन्माचे जोडीदार सांगून भोंदू बाबानं लावलं लग्न !

August 30, 2013 8:54 PM0 commentsViews: 1550

दीप्ती राऊत,नाशिक

30 ऑगस्ट : जादुटोणा किंवा अंधश्रद्धा हे शब्द ऐकले की पहिलं बोट जातं ते अडाणी आणि निरक्षर जनतेकडे…पण सुशिक्षित, साक्षर आणि उच्चभ्रू समाजालाही या अंधश्रद्धांनी असंच पोखरलंय.शिष्यांची भविष्य सांगून लग्न लावून द्यायची आणि फसवणूक उघड झाल्यावर नामानिराळ व्हायचं..हा भयंकर प्रकार आहे नाशिक शहरातल्या उच्चभ्रू वस्तीतला..याला बळी पडलीये एक उच्चशिक्षित तरुणी..

गेल्या वर्षी याच दिवसात ती गंगापूर रोड पोलिसांकडे चकरा मारत होती. “पोलीस तक्रार घेत नव्हते. त्यांनी भविष्य सांगितलं आणि तुम्ही एकलंत, त्यात कोणाचा दोष असं पोलिसांचं म्हणणं होतं” अशी व्यथा पीडित तरूणींने मांडली.

27 वर्षांची एक उच्चशिक्षित तरुणी गुरुच्या नादाला लागून 45 वर्षांच्या इसमाशी लग्न करते आणि फसवली जाते यावर विश्वास ठेवणं कठीणच. त्यावेळी तीही गुरुंच्या पूर्ण संमोहनाखाली आलेली.

गुरुंनी कालविधान केलं आणि आश्रमात यांचं लग्न लावून दिलं. पवित्र कार्य म्हणून कुणाला बोलवू दिलं नाही की फोटोही काढू दिले नाहीत.. पुढे तिच्या लक्षात आलं.

पीडित तरूणी म्हणते, 3 वर्षांनी लक्षात आलं काहीतरी गडबड आहे. यांचा डिवोर्स झालेला नाही. 22 दिवस ते गायब झाले. तुझा माझा संबंध संपला म्हणे, त्यांचे शिष्य धमकी देऊ लागले, तू पुन्हा सेंटरवर येऊ नको, मी डीप्रेशनमध्ये गेले.

नाशिकमधल्या याच गंगापूर रोड पोलीस स्टेशनमध्ये गेल्या वर्षी प्रथितयश गुरुंच्या आणि त्यांच्या उच्चविद्याभूषित शिष्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. पण उचित कायद्याच्या आभावी कडक कारवाई होऊ शकली नाही. म्हणूनच जादुटोणा विरोधी कायदा आणि पूर्वजन्मीचा दाखला देऊन लैंगिक फसवणूकीविरोधातील त्यातील कलम महत्त्वाचं आहे.

या केसमध्ये कोणती कलमं लावायची हाच पोलिसांपुढचा मोठा प्रश्न होता. पूर्वजन्माचा दाखला देऊन लैंगिक संबंधात फसवणूक करणारे असे प्रकार सर्रास सुरू आहेत. ते रोखण्याची ताकद या कायद्यात आहे.

… कायदा नसल्यानं साक्रीकर यात अडकला नाही. त्यांच्या शिष्यांनाही धाक बसला नाही. माझ्या लग्नानंतर आणखी दोन प्रकार झाले. एका शिष्येचं जबरदस्तीनं लग्न लावून देण्यात आलं, तिनं आत्महत्या केली असंही पीडित तरूणीने सांगितलं.

close