आसाराम बापूच्या अटकेची शक्यता

August 30, 2013 10:22 PM0 commentsViews: 865

asaram bapu30 ऑगस्ट : लैंगिक शोषण प्रकरणी स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु आसाराम बापू याची पोलिसांसमोर शरण येण्याची वेळ आता संपली आहे. राजस्थान पोलिसांच्या म्हणण्यानुसार त्याला उद्या सकाळी कधीही अटक होऊ शकते. सध्या आसाराम बापू भोपाळमध्ये आहे. त्याला अटक करण्यासाठी जोधपूर पोलिसांचं एक खास पथक आज रात्री भोपाळला रवाना होणार आहे.

पोलिसांना समन्स बजावल्यानंतर त्यांना शरण येण्यासाठी पुरेसा वेळ दिला गेला, त्यामुळे आता आसाराम बापू जिथे असतील, तिथून त्यांना अटक करण्याशिवाय पर्याय नाही, यापुढे आम्ही त्यांना अतिरिक्त वेळ देऊ शकत नाही, असं पोलिसांचं म्हणणं आहे. पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकाच्या माध्यमातून त्यांच्या हालचालींवर नजर ठेवली जातेय.

आसाराम बापू कुठे भूमिगत होऊ नयेत म्हणून पोलीस आवश्यक ती खबरदारी घेत आहेत. आज गुजरात हायकोर्टाने आसाराम बापूचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर तिथंच त्याला पहिला झटका बसला.

दरम्यान, आसाराम बापू हे आजारी असल्यामुळं ते कुठं प्रवास करु शकत नाहीत, असं त्याच्या मुलानं सांगायला सुरुवात केली आहे. एकीकडे पोलिसांना सर्व सहकार्य करू, असं म्हणणारा आसाराम पोलिसांसमोर जायला टाळाटाळ करतोय. आधी प्रकृती अस्वास्थाचं कारण दिलं. नंतर नातेवाईकाचं निधन झाल्याचं कारण दिलं. त्याचवेळी गुजरात हायकोर्टात अंतरिम जामीन मागितला. पण तिथेही दिलासा मिळाला नाही. म्हणून मग आपण भोपाळ एअरपोर्ट गेलो होतो. पण फ्लाईट चुकली, अशी बतावणी केली. दरम्यान, बापू भोपाळ एअरपोर्टवर गेला तेव्हा तिथेही काही संतप्त नागरिकांना बापूला धक्काबुक्की केली.

तर स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आसाराम बापूच्या नाशिमधल्या आश्रमावर आज काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. यावेळी बापूचा प्रतिकात्मक पुताळाही जाळण्यात आला. याआधी नागपूरमध्येही भीमसेनेच्या कार्यकर्त्यांनी आसारामच्या नागपूरमधल्या आश्रमावर दगडफेक केली होती.

close