कालविधान आणि दाभोलकर !

August 31, 2013 8:48 PM1 commentViews: 1002

dipti_raut_ibn_lokmat_nashik

            Posted by- दीप्ती राऊत, ब्युरो चीफ, IBN लोकमत,नाशिक

‘मागील जन्मी तुम्हा दोघांकडून एक पाप घडले होते. त्यातून मुक्ती मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तुम्ही दोघांनी लग्न करणे’ असा सल्ला गुरुमहाराज देतात. दोघांच्या वयातलं अंतर तब्बल 17 वर्षांचं. तो 45 वर्षांचा आणि ती 27 वर्षांची. गुरुंच्या मोहिनीत तिही संमोहित झालेली. सदसदविवेक बुद्धी आणि पालकांचा विरोध धडकावून तिचंही भान हरपलेलं. गुरु महाराज एका पवित्र दिवशी पवित्र मुहूर्तावर तमाम भक्तगणांच्या साक्षीनं त्या दोघांचं लग्नही लावून दिलं. अर्थात धार्मिक, पवित्र कार्य म्हणून फोटोही काढायचा नाही ही ताकीद गुरु महाराजांनी त्यावेळी दिलेली.

विषय इथे संपला नाही. आपल्या नवर्‍याचं आधीच लग्न झालेलं आहे, त्याची बायको त्याला सोडून गेली आहे आणि त्याला मोठा मुलगा आहे हे लग्नानंतर सदर तरुणीला कळालं. तिच्या पायाखालची जमीन सरकली. ती बायको तशीच असल्यानं सोडून गेली, आता महाराजांचे आशीर्वाद आहेत, तुमचा संसार चांगला होईल असा दिलासा तिला सासूनं दिला आणि इतर शिष्यांनीही. हळूहळू महाराज, महाराजांचा शिष्य असणारा आपला नवरा, इतर भक्तगण या साऱ्यातील भंपकपणा  तिच्या लक्षात येऊ लागला. आपली फसवणूक झालीए हे तिच्या लक्षात आलं. तिनं प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केली. पण तोपर्यंत बराच उशीर झालेला असतो. तिच्या प्रश्नांना ना तिच्या नवर्‍यानं उत्तर दिली, ना गुरुमहाराजांनी. तरीही तीन वर्ष त्यांचा हा ‘संसार’ चालला. दोघांमधले वाद वाढत गेले तसे गुरुमहाराजांनी दुसरे कालविधान केले – या विवाहातून तुमचे मागील जन्माचे पापक्षालन झाले आहे, आता तुम्ही विभक्त व्हावे म्हणजे या जन्मातून तुम्हाला मोक्ष मिळेल…  गुरुंचा सल्ला शिष्याला शिरसावंद्य होता. या तरुणीचा मात्र विभक्त होण्यास नकार होता. शेवटी गुरुंच्याच सल्ल्यानं बहुदा तिचे पती घरातून अचानक गायब झाले. जाताना त्यांच्या एकत्र राहाण्याचे सर्व पुरावे नष्ट करून गेले, गुंतवणुकीची, मालमत्तेची सर्व कागदपत्र सोबत घेऊन गेले. ते कुठे गेले याचं उत्तर ना गुरुंनी दिलं, ना शिष्यांनी.

nashik bhondu baba
ही घटना कोणत्याही आदिवासी दूर्गम मागास भागातली किंवा इसवीसनपूर्व काळातली नाही, तर सन 2012 मधली, नाशिकसारख्या अद्ययावत शहरातील, सुशिक्षित, उच्चभ्रू, सुसंस्कृत, सुजाण कुटुंबातली आहे. नाशिकच्या महात्मा नगर या उच्चभ्रू वस्तीत सदर गुरुमहाराजांची ‘ओपीडी’साजरोजपणे सुरू आहे. सगळे शिष्य त्यांना ‘सर’ म्हणतात. आणि हे सर त्यांच्या शिष्यांचे ‘कालविधान’ ठरवतात. कोणी कोणती प्रॉपर्टी घ्यायची, कोणता व्यवसाय निवडायचा, कोणतं घर घ्यायचं, इतकंच नाही तर कोणत्या शिष्यानं कोणाशी लग्न करायचं हे कालविधानही हेच सर ठरवतात. हे सर म्हणजे मोठं अध्यात्मिक प्रस्थ. नाशिकमधील अनेक सुविद्य, सुशिक्षित आणि प्रतिष्ठित मंडळी सरांची शिष्यगण. कुणी व्यापारी, कुणी राजकारणी, कुणी बिझनेसमन, कुणी आर्कीटेक्ट. हो, वर उल्लेखलेल्या ‘कालविधाना’तील तरुणीही आर्कीटेक्ट आणि ज्या शिष्याशी सरांनी तिचं लग्न लावून दिलं, ते तर नाशिकमधील अत्यंत नावाजलेले आर्कीटेक्ट. सदर तरुणी त्यांच्या फर्ममध्येच प्रॅक्टीस करीत असताना ऑफीसमधील या सरांच्या आणि नंतर त्यांच्या सल्ल्यानुसार या अध्यात्मिक सरांच्या काह्यात आली आणि आयुष्याची राखरांगोळी करून बसली.

आठ महिने डिप्रेशनची ट्रीटमेंट घेतल्यावर ही तरुणी पुर्ववत झाली. भानावर तर चांगलीच आली. अशाचप्रकारे सरांनी लग्न लावून दिलेल्या इतर शिष्यांशी तिनं संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यातल्या एका मुलीनं तर आत्महत्याच केल्याचं पुढे आलं. पण तिच्या कुटुंबियांनी लज्जेखातीर त्याबाबत चुप्पी बाळगली. हिनं ठरवलं, आणखी इतक मुलींचा बळी जाऊ द्यायचा नाही. वकिलांच्या माध्यमातून तिनं पोलिसात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. हा सारा प्रकार एकून सहाजिकच पोलीस पहिल्यांदा चक्रावून गेले. नंतर त्यांच्या पद्धतीप्रमाणे त्यांनी तिला या पोलीस स्टेशनमधून त्या पोलीस स्टेशनमध्ये चकरा मारायला लावल्या. पीडित तरुणीने आपल्या लग्नाला उपस्थित शिष्यगणांना साक्षीसाठी बोलवण्याचा प्रयत्न केला. सरांविरोधात कोणता शिष्य साक्ष देणार हो? तिची निराशा झाली. पवित्र कार्य म्हणून सरांनी लग्नाचे फोटोही काढून दिले नव्हते. तोही पुरावा नाही. मंगळसूत्र खरेदीची पावती नव्यानं गायब केलेली. तोही पुरावा संपलेला. एवढ्या नामवंत माणसाची बदनामी होतेय, ती मुलगीच चांगल्या चालीची नाही… नेहमीचा अपप्रचार सुरू झाला. पोलिसांना फोन गेले, वार्ताहरांना फोन गेले. काही पदाधिकारी तर थेट पोलीस स्टेशनमध्ये जाऊनच बसले तक्रार दाखल होऊ नये म्हणून.

तरीही तरुणीची जिद्द आणि तिच्या वकिलांचं कौशल्य पणाला लागलं. शेवटी तिसऱ्या दिवशी पीडित तरुणीचा तथाकथित नवरा असलेले ते सुविद्य आर्कीटेक्ट आणि त्यांचे अध्यात्मिक गुरु यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. पण गुन्हा काय दाखल करावा हा मोठाच प्रश्न होता. शेवटी फसवणुकीचं तकलादू कलम लावण्यात आलं आणि त्यांची जामिनीवर सुटका झाली. सदर प्रकरणातील आर्कीटेक्ट शिष्याची प्रॅक्टीस जोरदार सुरू आहे, अध्यात्मक सरांची ओपीडी जास्तच तेजीत आहे. त्यांचे बरेचसे अध्यात्मिक साहित्य प्रकाशित झाले आहे. प्रवचने सुरू आहेत. महाराष्ट्रातल्या एका राज्यस्तरीय वर्तमानपत्रात सध्या त्यांचे साप्ताहिक सदरही सुरू आहे, अध्यात्मिक निरुपणाचे. एकटी पडली आहे ती तरुणी.

एवढा सारा प्रकार होऊन या प्रकरणाला वर्तमानपत्रातून प्रसिद्धी मिळणंही अशक्य होतं. चळवळीचा वारसा सांगणाऱ्या एका संपादकांकडे ही तरुणी मोठ्या आशेनं गेली. सोबत अनिसचे कार्यकर्तेही होते. नंतर त्यांनीही तिची बातमी छापली नाही, का तर ते सरांचे जवळचे मित्र, सरांच्या अनेक पुस्तकांच्या प्रकाशानाला ते प्रमुख पाहुणे म्हणून असतात. त्यामुळे ती दारंही बंद झालेली. दरम्यान, या तरुणीने डॉ. दाभोलकरांशीही संपर्क साधला. दाभोलकरांनी तिच्या प्रकरणात लक्ष घातलं. नाशिकच्या गंगापूर पोलीस स्टेसनमध्ये ही तक्रार दाखल झाली होती. त्याचा दाखला देऊन दाभोलकरांनी थेट गृहमंत्री आर आर पाटील यांच्याकडे लेखी तक्रार केली होती.

दाभोलकरांच्या जाण्यानंतर जादुटोणा विरोधी विधेयकाच्या मसुद्याची चर्चा सुरू आहे. या कायद्याचं अकरावं कलम आहे – पूर्वजन्माचा दाखल देऊन किंवा अंगी दैवी संचार असल्याचा दाखला देऊन लैंगिक संबंध प्रस्थिपित करण्यास भाग पाडणे – हा कायदा, हे कलम असते तर नाशिकमधील या पीडित तरुणीला न्याय मिळाला असता आणि तिचं कालविधान कायद्याच्या कसोटीवर जोखलं गेलं असतं ही खंत.

  • Madhukar Dube

    Courage personafied…

close