सांगलीत पोलिसांच्या मुलांसाठी पाळणाघर !

September 2, 2013 10:12 PM0 commentsViews: 78

02 सप्टेंबर : पोलीस म्हटलं की, चोवीस तास ऑन ड्युटी. त्यामुळे कुटुंबाकडे लक्ष द्यायला जमत नाहीच. महिला पोलिसांना ही समस्या विशेष भेडसावते. त्यातच प्रश्न लहानग्यांचा असला तर, एकीकडे कर्तव्याची जाणीव आणि दुसरीकडे अपराधीपणाची भावना अशा दुहेरी कात्रीत मन सापडतं. यावर उपाय म्हणून यांच्या सांगली जिल्ह्यात महिला पोलिसांच्या मुलांसाठी पाळणाघर सुरु करण्यात आलंय. राज्यातला हा अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम आहे.
राज्यात गेल्या दहा वर्षांमध्ये पोलीस दलात मोठ्या प्रमाणात महिलांची भरती करण्यात आली. त्या चांगली कामगिरीही बजावत आहेत. मात्र, महत्त्वाच्या घटनांच्या वेळी चोवीस तास ड्युटी, कुटुंबाची विशेषतः मुलांची जबाबदारी अशी कसरत महिला पोलिसांना करावी लागते. आता या पाळणाघरामुळे त्यांना बराचसा दिलासा मिळणार आहे.
पाळणाघरात अनेक सोयीसुविधा आहेत. लहान मुलांसाठी खेळणी, जेवणाची सोय करण्यात आलीये. त्यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी महिला पोलीस आणि स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात येणार आहे. गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यात महिला पोलिसांसाठी ही सोय सुरू झालीय. आता राज्यातल्या इतर शहरांमध्येही, विशेषतः मोठ्या शहरांमध्ये अशीच पाळणाघरं सुरु करण्याची गरज आहे.

close