विधान परिषदेच्या निवडणुकीत फोडाफोडीचे राजकारण अंगलट

September 3, 2013 9:53 PM0 commentsViews: 2425

आशिष जाधव, मुंबई
03 सप्टेंबर : सोमवारी पार पडलेल्या विधानपरिषद पोटनिवडणुकीत आमदारांच्या मतांची चांगलीच बेगमी झालीय. अपक्ष उमेदवार पृथ्वीराज काकडे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीची दहा मतं फोडल्याचा दावा जरी केला असला, तरी सेना भाजपचीही काही मतं फुटल्याचं स्पष्ट झालंय. त्या पोटनिवडणुकीत मतांच्या फोडाफोडीचं राजकारण चांगलंच रंगलं. त्यातूनच पुढच्या काळात नवीन राजकीय समीकरणं जुळून येऊ शकतात.

 

विधानपरिषदेची पोटनिवडणूक धनंजय मुंडे विरुद्ध पृथ्वीराज काकडे असा थेट सामना होता. पण प्रत्यक्षात ही लढाई गोपीनाथ मुंडे विरुद्ध अजित पवार अशी होती. त्यामुळे मतांच्या फोडाफोडीचं राजकारण चांगलंच तेजीत आलं. सेना भाजप युतीने आघाडीची तब्बल दहा मतं फोडल्याचं निकालावरुन स्पष्ट झालं.
प्रत्यक्षात मात्र या निवडणुकीत जवळपास 20 ते 22 मतं फुटल्याचा संशय व्यक्त होतोय. काँग्रेस राष्ट्रवादीच्या समर्थक आमदारांबरोबरच भाजप-शिवसेना आमदारांची काही मतं फुटल्याचं आता समोर येतंय. काँग्रेस राष्ट्रवादीकडून सेना-भाजपच्या आमदारांना वळवण्याचा प्रयत्न झाल्याचं खुद्द उद्धव ठाकरे म्हणत आहेत. तर दुसरीकडे आपली मतं फुटली कशी याविषयी दोन्ही काँग्रेस एकमेकांकडे संशयानं बघत आहेत. जवळपास 59 मतांनी धनंजय मुंडेंचा विजय जरी झाला असला तरी तब्बल दहा मतं फोडून गोपीनाथ मुंडेंनी राष्ट्रवादीला चांगलाचा हादरा दिलाय. मतं कशी फुटली आणि कुठे गेली, यावरुन आघाडीत चांगलंच काथ्याकूट होईल, हे स्पष्ट आहे.

close