फोनवरच चमत्कार,भोंदूबाबाने लाखो रूपयांना लुटले

September 3, 2013 9:14 PM1 commentViews: 879

प्रवीण मुधोळकर,नागपूर

03 सप्टेंबर : सर्व समस्यांवर परफेक्ट उपाय असा दावा करणार्‍या भोंदुबाबांनी नागपुरात मोठा धुमाकूळ घातलाय. फोनवरच चमत्कार करण्याचे आमिष दाखवून अनेकांना या लोकांनी लाखो रुपयांना फसवलंय. आता जादूटोणाविरोधी वटहुकूम निघाल्यानंतर तरी या तांत्रिक आणि बाबांच्या फसवणुकीला आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त होतेय.

“वशीकरण, ग्रहक्लेश, जादुटोणा, विदेश यात्रा, व्यवसायात थांबलेली प्रगती या सर्व समस्यांवर चमत्काराद्वारे हमखास उपाय” अशा आशयाचे स्टिकर्स आणि जाहिराती नागपूर शहरात भोंदू बाबांनी लावल्या आहेत. संकटात असणार्‍या शितलने एका बाबाशी फोनवर संपर्क साधला. त्याने दिलेल्या बँक खात्यात तिने एक लाख रुपये जमाही केले आहे. पण आपली फसवणूक झाल्यावर कळल्यावर या तरुणीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

याबद्दल अखिल भारतीय अंधाश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी अधिक महिती घेतली. तेव्हा हे चमत्काराचा दावा करणारे बाबा वेगवेगळी नावं धारण करून वेगवेगळ्या बँकेच्या खात्यांद्वारे देशभरात लोकांची फसवणूक करत असल्याचं लक्षात आलं.

जादूटोणा विरोधी कायद्याच्या अनुसुची क्रमांक दोन नुसार अशा बाबांवर पोलिसांना कारवाई करण्याचे अधिकार आहेत. पण पोलीस या कायद्याचा आधार घेतांना दिसत नाही.

अशा प्रकारे या हायटेक बाबांकडून लोकांची लाखो रुपयाने फसवणूक आजही सुरूच आहे. आता नुकताच लागू झालेला जादूटोणाविरोधी वटहुकूम वापरून त्यांना तत्काळ अटक करण्याची मागणी होत आहे.

  • vijayalaxmi

    mantrijichya mage satyysaibaba disat aahet va va va

close