S M L

भाजप कुणासोबत जाणार ?

Sachin Salve | Updated On: Oct 21, 2014 05:12 PM IST

भाजप कुणासोबत जाणार ?

sachin salveसचिन साळवे, असोसिएट एडिटर-वेब, आयबीएन लोकमत

 तब्बल 15 वर्षांनंतर सत्तेच ताट भाजपच्या पुढ्यात मांडण्यात आलंय. पण बहुमताचा 'लाडू'च ताटात नसल्यामुळे भरलेलं 'ताट' भाजपपासून थोडं दुरावलंय. भाजपसोबत 25 वर्ष संसार करणार्‍या शिवसेनेला सत्तेच दार खुणावत आहे. तर दुसरीकडे गेली 15 वर्ष सत्तेत वाटेकरू असलेल्या राष्ट्रवादीनेही पुन्हा सत्तेत येण्यासाठी धडपड सुरू केलीये.

यंदाची विधानसभा निवडणूक ऐतिहासिक ठरली. स्वबळावर सर्वच पक्ष मैदानात उतरले त्यामुळे पंचरंगी लढाई पाहण्यास मिळाली. प्रचाराच्या रणधुमाळी सर्वच नेत्यांनी एकमेकांवर चिखलफेक करण्यास एकही संधी सोडली नाही. ऐन मतदानाच्या दिवशीही मतदाराजाने दिलदार होत भरघोस मत टाकली. राज्यात कधी नव्हे ती मतदानाच्या टक्केवारीने साठीपार केली. त्यामुळे महाराष्ट्राचा निकाल काय लागेल याकडे अवघ्या महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागले होते. सर्व एक्झिट पोलमध्ये भाजप बाजी मारेल असे अंदाज व्यक्त करण्यात आले होते. बहुंताश एक्झिट पोलचे निकाल जवळपास जुळले. भाजपने आजपर्यंत सुवर्णकामगिरी करत 123 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला. तर सत्ता मिळवून दाखवणारच अशी गर्जना करणारी शिवसेना 63 जागा जिंकत दुसर्‍या स्थानावर आली. मागील निवडणुकीचा निकाल पाहता अनुक्रमे दोन्ही पक्षांनी जोरदार आघाडी घेतली. पण सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपला काही बहुमताचा आकडा गाठता आला नाही.

bjp_news3राज्यात सरकार स्थापन करायचं असेल तर भाजपला कुणाची तरी साथ घ्यावीच लागणार आहे. हे ओळखूनच गेली 44 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात आपली भूमिका 'पॉवर'फूल पणे निभावणारे शरद पवार यांनी 'मौके पर चौका' मारला आहे. निकाल संध्याकाळपर्यंत पूर्ण होण्याअगोदर राष्ट्रवादीने विनाअट भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. 'बाहेरून पाठिंबा' या शब्दावर प्रफुल्ल पटेल यांनी जोर दिला. तर आज आम्ही सत्ता स्थापन करण्याच प्रक्रियेत सहभागी होणार नाही. काँग्रेसने अगोदरच शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत प्रस्ताव दिला होता असा गौप्यस्फोटही पवारांनी केला. विशेष म्हणजे निकाला अगोदर भाजपसारख्या हिंदुत्ववादी पक्षाला पाठिंबा देणार नाही अशी भूमिका शरद पवारांनी घेतली होती. पण सत्तेच्या सारीपाटावर कधी काय घडू शकते आणि राजकारणाला कशी दिशा द्यायची हे पवारांशिवाय दुसरं कुणीही करू शकत नाही.

पवारांनी एकाप्रकारे भाजपला दोन ऑप्शन दिले. एक तर आमचा बाहेरून पाठिंबा घ्या आणि सत्ता स्थापन करा. आणि दुसरा असा की जर शिवसेनेनं पाठिंबा दिला नाही तर काँग्रेससह आम्ही शिवसेनेला पाठिंबा देऊन सत्ता स्थापन करू असा गृभीत इशाराच पवारांनी दिला. पवारांनी इशारा दिल्यानंतर दिवसभर भाजपच्या नेत्यांनी बैठक न घेतल्याचा निर्णय घेतला होता तो संध्याकाळी रद्द झाला. दिल्लीत पंतपध्रान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि नितीन गडकरी यांच्यात बैठक झाली. पण तसं पाहण्यास गेलं तर पवारांचे संबंध सत्ताधार्‍यांपासून ते विरोधकांपर्यंत चांगले होते.

केंद्रात असताना पवारांनी सर्वांशीच आपली मैत्री जपून ठेवली. मग कधी ते शिवसेनाप्रमुखांना भेटणे असो किंवा नितीन गडकरींची भेट असो असे अनेक प्रसंग घडले. पवारांवर तसे आरोपही झाले पण मैत्रीची ग्वाही देऊन पवारांनी सर्वांना उत्तर दिलं. त्यामुळे लोकसभेच्या वेळी शरद पवार भाजपमध्ये सामिल होती अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली होती. विधानसभेत तर ती उघडपणे होऊ लागली. आता राष्ट्रवादीने अगोदरच पाठिंबा दिल्यामुळे ती आणखी बळावली.

विशेष म्हणजे संघानेही अगोदर राष्ट्रवादीला विरोध केला आणि आज निर्णय घेण्याचा अधिकार भाजपवर सोपवला. दिल्ली विधानसभेच्या वेळीही भाजपने सर्वात जास्त जागा जिंकल्या होत्या. पण बहुमताचा आकडा न गाठता आल्यामुळे तटस्थ राहत विरोधी बाकावर बसणे पसंत केले. राज्यातही आताही तसाच पेच निर्माण झालाय. एकीकडे ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांनीच पाठिंबा जाहीर केलाय. तर दुसरीकडे ज्यांची साथ सोडली तेही दुरावले आहे. त्यामुळे भाजप कुणासोबत जाणार हा प्रश्न आता उपस्थित झालाय.

शिवसेनेचं 'वेट अँड वॉच'

युती तुटली आणि घटकपक्षांनी 'जय महाराष्ट्र' केला त्यामुळे शिवसेनेनं '151 मिशन' असा नारा देत विधानसभेच्या रिंगणात एकट्याने उडी घेतली. उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभांतून भाजपवर सडकून टीका केली. 'सामना'तून रोज भाजप घटकपक्षंाचा समाचार घेतला गेला. अफझल खान, उंदीर, दिल्ली समोर झुकणार नाही अशा अनेक गर्जना उद्धव यांनी केल्या. एवढंच नाहीतर यंदा भगवी दिवाळी साजरी करणार अशी घोषणाचा उद्धव यांनी केली. पण जनतेनं थोडं धीराने घ्या असा सल्ला देत शिवसेनेच्या पदरा 63 जागा टाकल्यात. ज्यांच्यावर युती तुटण्याचा आरोप केला तो भाजप पक्ष सर्वात मोठा भाऊ ठरला. त्यामुळे आता मोठा भाऊ असूनही शिवसेनेला लहान भाऊ होण्याची वेळ आलीये. जो महाराष्ट्राचा विकास करेल त्याला पाठिंबा देऊ असं वक्तव्य उद्धव यांनी केलं. आता मोठा भाऊ काय निर्णय घेतो ? सोबत घेण्यासाठी मातोश्रीवर फोन खणखणतो तो की नाही याची वाट आता उद्धव पाहत आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 20, 2014 11:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close