S M L

चला माऊली...

Samruddha Bhambure | Updated On: Jul 7, 2015 02:51 PM IST

चला माऊली...

 

Rajendra- राजेंद्र हुंजे, न्यूज एडिटर, आयबीएन लोकमत

आषाढी वारी सोहळा म्हणजे, द्वैताकडून अद्वैताकडे सुरू झालेला प्रवास, वारी म्हणजे चैतन्याचा महामेळा, वारी म्हणजे विठुरायाच्या दर्शनाची ओढ, वारी म्हणजे अमाप उत्साह...

ज्ञानोबा - माऊली तुकाराम... बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम या जयघोषानं आता पंढरपूरच्या पालखी मार्गावरचा आसमंत दुमदुमून निघणार आहे. लाखोंच्या संख्येनं वारकरी या पारंपरिक आषाढी वारी सोहळ्यामध्ये सहभागी होऊन आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी निघाले आहेत.

आषाढी वारी सोहळ्याची तयारी तशी महिनाभरापूर्वीच सुरू झालेली आहे. तिकडे शेगावहून गजानन महाराजांच्या पालखीनं तर एक महिना आधीच वारीसाठी प्रस्थान ठेवलंय. त्यापाठोपाठ जळगाव जिल्ह्यातून मुक्ताईंची, त्यानंतर निवृत्तीनाथांची आणि सगळ्यात शेवटी संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांची पालखी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवते. तब्बल 21 दिवसांचा पायी प्रवास करून झाल्यावर या सर्व पालख्या पंढरपुरात एकत्र येतात, त्या आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी...

BLOG2

आपल्यामध्ये असलेलं मीपण काढून टाकायचं असेल, तर वारीमध्ये जायलाच हवं असं म्हटलं जातं. मी तु पण गेले वाया, भेटता पंढरीच्या राया... असं संतांनी आपल्या अभंगांमध्ये म्हटलं आहेच. वारीमध्ये तमाम वारकर्‍यांसोबत प्रवास केल्यानंतर आपल्यामध्ये एक सांघिक भावना वाढीस लागते. एवढंच नाही, एकमेकांना सोबत घेऊन जाण्याची सवय जडते. घर-संसारापासून तब्बल एक महिनाभर आपण दूर असतो, तरीही या वारकरी कुटुंबात सहभागी झाल्यानंतर आपल्याला आपल्या कुटुंबीयांची आठवणही येत नाही. हीच शिकवण सर्व संतांनी आपल्याला घालून दिली आहे. पण त्याचं अनुकरण आपण आपल्या आयुष्यात केलं तर, त्याची खरी किंमत आपल्याला कळू शकेल. अगदी लहान मुलांपासून ते 80 वर्षांच्या आजी-आजोबांपर्यंत सगळेजण मोठ्या आनंदाने या आनंद यात्रेमध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात. याबद्दलच कवी दासू वैद्य म्हणतात...

जगण्याचा पाया, चालण्याचे बळ, विचारांची कळ...तुकाराम

शब्दांचे इमान, अक्षरांचे रान, अभंगाचे पान... तुकाराम

भेदणारे मूळ, आशयाचे कुळ, भाषेचा कल्लोळ... तुकाराम

वारी सोहळ्याची ही परंपरा गेल्या 350 वर्षांपेक्षाही अधिक जुनी आहे. अगदी सुरुवातीपासून वारीमधली शिस्त ही सगळ्यांच्या आयुष्याला एक वेगळं वळण लावून जाते. लष्कारामध्ये अनुभवायला मिळणारी शिस्त वारीत गेलं की, शिकायला मिळते. पालखी जेव्हा मुक्कामासाठी विसावते. त्याअगोदर समाजआरती केली जाते. त्यावेळी सगळ्या दिंड्या पालखी तळावर एकत्र जमतात. सगळ्याच दिंड्यांमधून टाळ-मृदुंगाचा गजर आणि विठुनामाचा जयघोष सुरू असतो. पण त्याचवेळेला जेव्हा चोपदार आपला दंडक वर करतात, त्यावेळी मात्र अचानक पालखी तळावर एकदम शांतता अनुभवयाला मिळते. चोपदारांनी एकदा दंडक वर केला की, सगळ्यांनी जागीच थांबायचं हा नियम... एवढ्या लाखभर लोकांपर्यंत पोहोचणं अशक्य असलं तरीही, चोपदारांच्या एका सूचनेनं हा संबंध वारकरी समाज स्तब्ध झालेला असतो. ही शिस्त कुणी सांगून येत नाही, ही शिस्त वारीमध्येच शिकायला मिळते. खरंतर तो चोपदारांच्या प्रती दाखवलेला मान असतो. अशाच नित्यक्रमाने वारकरी पंढरपूरकडे वाटचाल करत असतात.

वारी सोहळ्याच्या मार्गावर ठिकठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम नियोजित असतात. त्यानुसार आपलं आणि समाजाचं प्रबोधन करत हा वारकरी समाज, पायी हळूहळू चाला, मुखाने हरिनाम बोला, असं म्हणत पुढं जातो. ऊन-वारा-पाऊस या कशाचीही तमा न बाळगता, वारकरी पुढचं पाऊल टाकत असतो. पाऊस आला तरी, वारी थांबत नाही, त्यातही -

भेटी लागी जीवा । लागलीसे आस ।।

पाहे रात्रंदिवस वाट तुझी ।।

असा अभंग आळवत ही मंडळी पंढरपूरच्या विठुरायाच्या भेटीची आस मनात ठेवून पुढे जातात.

पालखी सोहळ्यामध्ये संतांच्या प्रमुख पाच पालख्या राज्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणाहून पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान ठेवतात. त्यात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत निवृत्तीनाथ, संत एकनाथ, संत मुक्ताई, संत सोपानकाका, संत नामदेव, गजानन महाराज याशिवाय अनेक संतांच्या पालख्या पंढरपूरच्या आषाढी एकादशी सोहळ्यासाठी प्रस्थान ठेवतात. त्यामुळं महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून निघणार्‍या या पालख्यांमुळे जय जय रामकृष्ण हरीचा जयघोष आणि टाळ-मृदुंगांचा नाद कानी येऊ लागतो.

BLOG3

संतांनी आपल्या अभंगांची रचना करताना, नेहमीच प्रवाहाच्या पलीकडे जाऊन समाजाच्या जडणघडणीचा विचार केलेला दिसून येतो. इतकंच नाही, तर जगण्यातली व्यावहारिकता आणि त्यापलीकडचं आयुष्यही त्यांनी आपल्या ओव्यांमधून समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. माऊली, वारीबद्दल किती सांगावं तितकं थोडं आहे. अहो, वाट कसली बघताय, चला सहभागी व्हा. या वारी सोहळ्यामध्ये... माऊली, वारीत घडणार्‍या दररोजच्या घडामोडी आणि तिथलं यथार्थ दर्शन तुम्ही पाहू शकणार आहात आयबीएन लोकमतवर दररोज संध्याकाळी 6.30 वाजता "भेटी लागी जीवा" या आमच्या विशेष कार्यक्रमात. जर तुम्हाला वारीत सहभागी होण्यास काही अडचणी येत असतील, तर कशाला विचारात पडला आहात. आयबीएन लोकमतनं ही सुविधा तुमच्यासाठी तुमच्या घरीच उपलब्ध करून दिलीय. दररोज संध्याकाळी भेटी लागी जीवामधून...चला तर माऊली... सहभागी होऊया या वारी सोहळ्यामध्ये...

चला पंढरीसी जाऊ

रखुमाई देवी वरा पाहू...

twitter: @RajendraHunje

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 7, 2015 02:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close