S M L

"शाहीर : संयुक्त महाराष्ट्राचा"

Samruddha Bhambure | Updated On: Mar 22, 2016 09:21 PM IST

mangesh Chivte 1मंगेश चिवटे, IBN लोकमत

आज 22 मार्च... संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक धगधगतं पर्व असलेल्या स्वातंत्र्यसैनिक शाहीर जंगम स्वामी यांची नववी पुण्यतिथी! एकीकडे राज्य विधिमंडळामध्ये श्रीहरी अणे यांच्या महाराष्ट्र विभाजनाच्या मुद्द्यावरून गदारोळ सुरू आहे तर दुसरीकडे संयुक्त महाराष्ट्रासाठी आपले सर्वस्व अर्पण केलेल्या स्वातंत्र्यसैनिक शाहीर जंगम स्वामी यांची पुण्यतिथी. याच पार्श्वभूमीवर जंगम स्वामी यांनी संयुक्त महाराष्ट्र लढ्यासाठी दिलेल्या योगदानाचा आढावा घेणारा हा ब्लॉग...

स्वातंत्र्यसैनिक शाहीर जंगम स्वामी!

संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक धगधगतं पर्व!!

f72f86ca-e427-4904-b3dd-634cfe5692f8"शाहिराने स्वाभिमान कधी विकता कामा नये; पण स्वाभिमान आणि अहंकार यातला फरकही त्याला कळला पाहिजे. कला ही आपली आई आहे. तिला स्वाभिमानाने जगवा. बटिक बनविण्याचा प्रयत्न करू नका." हा मूलमंत्र शाहीर जंगम स्वामी यांनी आजच्या पिढीला दिला आहे. सहा फूट उंचीचा भारदस्त देह, विशिष्ट पद्धतीचा गोंडेदार निळा फेटा... खरे तर मुंडासे, लांब सदरा, धोतर आणि हातात एक स्टीलची बादली. त्यातही आणखी जादाचा एक धोतराचा टिळा आणि अत्तराची बाटली. 22 मार्च 2007 या दिवशी घेतलेल्या अखेरच्या श्‍वासापर्यंत या वेशभूषेमध्ये किंचितही फरक पडलेला नव्हता.

शाहीर जंगम स्वामी यांचा जन्म 12 फेब्रुवारी 1907 साली पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील भांडवली या छोट्याशा गावात झाला. परवाच शाहीर जंगम स्वामी यांची 109वी जयंती झाली. मूळचे जंगम घराण्यातील असूनही जंगम स्वामी यांना लहान असल्यापासूनच वारकरी संप्रदायाच्या कर्मयोगाची ओढ होती. लहान वयातच तत्कालीन नामवंत कीर्तनकार आणि प्रवचनकार यांच्या सान्निध्यामध्ये आल्याने जंगम स्वामींनीही कीर्तनाला सुरुवात केली. कीर्तन आणि प्रवचनाद्वारे समाजजागृतीचे काम करण्याची शपथ त्यांनी घेतली. याच माध्यमातून नवसमाज निर्मितीचे काम सुरू असतानाच एकदा पंढरपूरला आषाढी वारीच्या वेळी भर कीर्तनामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील अवतरले. स्वामींचे उच्च आणि करडया आवाजातील कीर्तन ऐकल्यानंतर भारावून गेलेल्या क्रांतिसिंह नाना पाटील यांनी "भारताच्या स्वातंत्र्यासाठी शाहिरी स्वीकारा आणि लोकांमध्ये स्वराज्याविषयी जाज्वल्य अभिमान जागृत करा" असा मंत्र स्वामींना दिला. आणि तेव्हापासून अंदाजे सन 1939 पासून आपल्या बुलंद आणि करड्या आवाजातून स्वातंत्र देवतेची वाकपूजा बांधण्यास सुरुवात केली. क्रांतिसिंह नाना पाटील यास जंगम स्वामींनी आपल्या गुरुस्थानी मानले.

दरम्यान, भोरमध्ये प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर उच्च शिक्षणासाठी जंगम स्वामी यांनी शिक्षणाचे माहेरघर असलेल पुणे गाठले. पुण्याच्या नामवंत फर्ग्युसन कॉलेजमधून बीए इंग्रजी हा विषय घेऊन प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले. याच पुण्यनगरीमध्ये त्यांनी जिवाभावाची मित्रमंडळी कमवली. खरे तर या काळात त्यांना उत्तम पगाराची नोकरी सहज मिळाली असती; परंतु स्वातंत्र्यकुंड धगधगतं ठेवण्यासाठी शाहिरी, कीर्तन आणि प्रवचन यांसारखी दुसरी समिधा नाही हे त्यांनी ओळखले होते. विषय मांडण्याची त्यांची पद्धत, समजावून देण्याची लकब, भाषणातील आवाजाचा करडा स्वर, तल्लख स्मरणशक्ती आणि इंग्रजीवरचे त्यांचे प्रभुत्व हे सर्व अचाट असल्याचा अनुभव त्यांच्याशी बोलतांना पदोपदी यायचा. आपल्या शाहिरी पोवाड्याने जनतेमध्ये भारतीय समाजमनात जनजागृती करून त्यांना इंग्रजाविरुद्धच्या लढ्यात उत्स्फूर्तपणे भाग घेण्यासाठी प्रेरित केले होते. शाहीर जंगम स्वामी यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी, जी.डी. बापू लाड यांच्याबरोबर स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता. पत्री सरकारच्या माध्यमातून त्यांनी खुल्या आणि भूमिगत चळवळीमध्ये सहभाग घेतला होता.

sdasdasda

महात्मा गांधी यांनी 1942 साली इंग्रजांना "चले जाव"चा नारा देत भारत सोडण्याचा इशारा दिला. त्यावेळी भारतीय समाजमन आणि विशेषत: मराठी माणसामध्ये स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग पेटवण्यासाठी स्वत: लिहीत पोवाडा रचला आणि डफावर थाप देत गायलासुद्धा! त्यातला एक अंतरा शाहीर जंगम स्वामी गप्पाच्या ओघामध्ये त्याच बुलंद आणि करड्या आवाजामध्ये हमखास गाऊन दाखवायचे!!

"1942 सालात,

ऑगस्ट महिन्यात,

मुंबई राज्यात,

ठराव पास झाला

संपूर्ण स्वराज्याचा...

मुहूर्त झाला अंतिम युद्धाचा,

गोरयानो (इंग्रजांनो) हिंद देश सोडा,

गावोगावी गेली गांधी गर्जना..."

हो... जी... जी...

स्वातंत्र मिळाल्यानंतर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळवण्याच्या चळवळीत ते अग्रणी नेते होते. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या वेळी त्यांनी साथी एस.एम. जोशी, आचार्य आत्रे, शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख, शाहीर आत्माराम पाटील यांच्याबरोबर भाग घेतला होता.

याच दरम्यान संयुक्त महाराष्ट्रच्या चळवळीचे अर्ध्वयू आणि पत्रकार आचार्य अत्रे यांच्याबरोबर मुंबई भागात अनेक सभा गाजविल्या आणि मराठी मने पेटविली. अशाच एका माझगावच्या सभेत आचार्य अत्रे यांनी जंगम स्वामी यांना "लोकशाहीर" ही पदवी बहाल केली.

samyukt-agitatorशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख आणि शाहीर जंगम स्वामी या त्रिकुटाने संयुक्त महाराष्ट्रच्या चळवळीमध्ये खर्‍या अर्थाने 'जान' आणली होती. अखिल महाराष्ट्रमध्ये या त्रिकुटापैकी कुणाचीही डफावर थाप पडली की उभी असलेली लोकांची गर्दी जाहीर सभेत रूपांतर होत असे. याच सुमारास मुंबईमध्ये शाहीर जंगम स्वामी पोवाड्याच्या माध्यमातून जाज्वल्य मराठी बाणा जागवीत असताना पोलिसांनी बळाचा वापर करत सभा उधळून लावण्याचा प्रयत्न केला. जंगम स्वामी यांना मारहाण केलीच, पण सभास्थानी जमलेल्या मराठी जनतेवर अमानुष लाठीहल्ला चढवला. संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या चळवळीपासून परावृत्त करण्यासाठी येनकेन प्रकारेण प्रयत्न केले गेले, पण ही तत्त्वनिष्ठ मंडळी आपल्या ध्येयापासून किंचितही दूर गेली नाहीत. उलटपक्षी तितक्याच आक्रमकपणे या सर्वांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी स्वत:ला समर्पित केले. याच सुमारास आमचे आजोबा स्वातंत्र्यसैनिक कै.साथी मनोहरपंत चिवटेसुद्धा शाहीर जंगम स्वामी यांच्या खांद्याला खांदा देत संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये सामील झाले होते. संपूर्ण देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले रक्त सांडणार्‍या आणि भारतभूमीला सर्वस्व अर्पण करणार्‍या या मंडळींसमोर आता एकमेव ध्यास होता तो म्हणजे संयुक्त महाराष्ट्राचा.

प्रखर लढ्यानंतर अखेर मुंबईसह महाराष्ट्र मिळाला पण बेळगाव, बिदर, भालकी, कारवार आणि निपाणीसह संयुक्त महाराष्ट्राच्या स्वप्नासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. मात्र हे स्वप्न अद्यापि पूर्ण न झाल्याची खंत अखेरच्या श्‍वासापर्यंत त्यांना होती. तिथला माझा मराठी बांधव अजूनही रोज अत्याचार सहन करतोय. जोपर्यंत बेळगाव आणि सीमाभाग संपूर्णपणे महाराष्ट्रामध्ये येत नाही आणि जोपर्यंत एकसंध महाराष्ट्र होत नाही तोपर्यंत मी श्वास सोडणार नाही असे जंगम स्वामी नेहमी म्हणायचे. मात्र दुदैर्वाने त्यांचे हे स्वप्न प्रत्यक्षात येण्याआधीच त्यांनी प्राण सोडला.

asdasdasइतके महत्‌कार्य केल्यानंतरही शेवटपर्यंत शाहीर जंगम स्वामी यांनी कोणतेही मोठे पुरस्कार किंवा बक्षीस स्वरूपातील रक्कम कधीच स्वीकारली नाही तर प्रत्येकवेळी नम्रपणे नाकारली. मात्र शाहिरांच्या नावाने दिले गेलेले "शाहीर पठ्ठे बापूराव"आणि "शाहीर आत्माराम पाटील" आवर्जून स्वीकारले. कारण शाहिरी हाच माझा आत्मा असल्याचे सांगताना त्यांचा ऊर अभिमानाने भरून येत असे.

1957 साली बौद्ध धर्मगुरु भंतेचंद्रमणि यांच्याकडून शाहीर जंगम स्वामी यांनी नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. यावेळी भन्तेंनी केलेल्या सूचनेनुसार आपले मूळ शिवलिंग आप्पा हे नाव बदलून नागसेन हे नाव धारण केले. तेव्हापासून नागसेन विभूते हे अधिकृत नाव झाले. पण सर्वसामान्य स्वामीजींना शाहीर जंगम स्वामी म्हणूनच ओळखत असत.

दुदैर्वाची - लाजिरवाणी गोष्ट म्हणजे स्वातंत्र्यलढ्यामध्ये झोकून दिलेल्या आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये आपले सर्वस्व अर्पण केलेल्या, डोंगराएवढं महत्‌कार्य केलेल्या अशा शाहीर जंगम स्वामी यांस शेवटच्या श्वासापर्यंत स्वातंत्र्यसैनिकाचा दर्जा मात्र मिळू शकला नाही. स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभागी झाल्याचे कागदोपत्री पुरावे मागणार्‍या सरकारच्या लालफीत शाहीच्या कारभाराने स्वातंत्र्यसैनिक शाहीर जंगम स्वामीच्या मृत्यूची साधी नोंद देखील घेतली नाही. किरण रणखांबे - नरसिंह चिवटे यांसारख्या कार्यकर्त्यांनी आणि माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांच्यासारख्या राजकीय नेत्यांनी शाहीर जंगम स्वामी यांच्या हयातीमध्ये स्वातंत्र्यसैनिकाचा दर्जा मिळावा यासाठी शासनदरबारी प्रयत्न केले. अनेकवेळा पत्रव्यवहार केला, मात्र आपले पत्र मिळाले, आपल्या पत्राची दखल घेतली आहे असे पत्र तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील, छगन भुजबळ यांच्याकडून मिळाले आहे. श्री रणखांबे - चिवटे या द्वयीनी आजही यासंबंधित शासनाशी झालेला पत्रव्यवहार जतन करून ठेवला आहे.

कीर्तन-प्रवचनामधून आणि डफावर थाप टाकून आपल्या शाहिरीच्या माध्यमातून इंग्रजाविरुद्ध भारतीयांमध्ये स्वराज्याविषयी स्फुल्लिंग जागृत करणार्‍या, संयुक्त महाराष्ट्र लढ्यामध्ये आपले सर्वस्व अर्पण केलेल्या आणि या महाराष्ट्राच्या मराठी मातीसाठी आपले रक्त सांडलेल्या स्वाभिमानी स्वातंत्र्यसैनिकास युती

सरकारकडून मरणोत्तर तरी स्वातंत्र्यसैनिकाचा अधिकृत दर्जा मिळेल का? हा प्रश्न आजही अस्वस्थ करतो आहे.

अर्थात स्वाभिमानी शाहीर जंगम स्वामी यांस अशा कोणत्याही पदवीचा मोह नव्हता, पण शेवटपर्यंत खंत मात्र नक्कीच होती. शाहीर आत्माराम पाटील यांचा मुखोद्गत असलेला पोवाडा जंगम स्वामी नेहमी म्हणायचे...

"आम्हा जन जन पांडुरंग

जन चरणी शाहीर दंग

जसा ध्रुव धुंडी कांतार

तसे आम्ही मुलुख फरार

कधी हद्दपार कधी नि:संग

कधी जपनामास तुरुंग

नाही स्वर्गाचे विमान

नाही मोक्षाचे साधन

आम्ही भवर्‍यातील सारंग

तिरी उरतो फकीर भणंग"

हा पोवाडा म्हणताना शाहीर जंगम स्वामी यांचा उंच स्वर आणि करडा आवाज मात्र मंजूळ संथ वाहणार्‍या नदीसारखा असायचा...!!

अशा या थोर स्वातंत्र्यसैनिकास विनम्र अभिवादन...! जय भीम...!!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 22, 2016 09:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close