S M L

महानंद 'अमूल' सारखा ब्रँड होणार का ?

Sachin Salve | Updated On: Apr 10, 2016 09:01 PM IST

महानंद 'अमूल' सारखा ब्रँड होणार का ?

mangesh_chivate_ibn_lokmatमंगेश चिवटे , डेप्युटी न्यूज एडिटर, आयबीएन लोकमत 

असं म्हणतात की... राजकारणामध्ये कोणीही कायमचा शत्रू अथवा मित्र नसतो. याचं ताजं उदाहरण आपल्याला सहकारातील सर्वात मोठ्या सहकारी संस्थेच्या म्हणजेच महानंदच्या निवडणुकीच्या निमित्ताने पाहायला मिळालं...महानंद अर्थात महाराष्ट्र राज्य सहकारी दूध संघावर सत्ता मिळवण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक चक्क एकत्र आले...आश्चर्य म्हणजे सहकारातील एकमेकांचे आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी सर्वांनी नेत्यांनी बंद खोलीत खलबते केली...आणि सरतेशेवटी महानंदची निवडणूक बिनविरोध पार पडली..आणि नुकतेच राज्याचे महसूल मंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांची महानंदच्या अध्यक्षपदी वर्णी लागली आहे.. महानंदच्या निवडणुकीच्या निमित्ताने पडद्याआड झालेल्या राजकारणाचा आढावा घेणारा हा ब्लॉग...

विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 9 मार्च रोजी सुरू झालं..आणि आमदार महोदय तथा सहकारातील दिग्गजांची मुंबईत धावपळ सुरू झाली..कारण याच दरम्यान सहकारातील सर्वात मोठ्या सहकारी संस्थेची म्हणजेच महानंदच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकलं गेलं होतं..लागलीच महानंद या राज्यातील मलाईदार दूध संघाच्या संचालकपदाची आपली वर्णी लागावी यासाठी सहकारातील सर्वपक्षीय मातब्बर नेत्यांनी कंबर कसली...ऐन अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान महानंदची निवडणूक लागल्याने सर्वपक्षीय नेत्यांची चलबिचल सुरू झाली..

सभागृहात रोज अनेकविविध मुद्द्यांवरून एकमेकांवर तुटून पडणार्‍या या सर्वपक्षीय नेत्यांना एकत्र यायचं होतं..पण भेटायचं कुठं हा यक्षप्रश्न होता..म्हणूनच चक्क विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या दालनामध्ये एक सर्वपक्षीय नेत्यांची गुप्त बैठक पार पडली...त्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही काँग्रेससोबतच चक्क भाजपचे दिग्गज नेतेही उपस्थित होते..विशेष म्हणजे महसूल मंत्री एकनाथ खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासाठी पुढाकार घेतला. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही या बैठकीसाठी पुढाकार घेतला होता..विशेष म्हणजे एकमेकांचे कट्टर राजकीय वैरी अजित पवार आणि विखे-पाटील सुद्धा अगदी मांडीला मांडी लावून बसले होते..mahanand milk

थोडक्यात, 'विना सहकार नहीं उद्धार' असे म्हणत महानंदच्या दुधावरील लोणी चाखण्यासाठी राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप आदी प्रमुख पक्ष एकत्रित आले होते.

अर्थात सहकार दुरुस्ती कायद्यानुसार सहकारी संस्थेच्या संचालकपदी आता 21 पेक्षा अधिक संचालक असणार नाहीत हा कायदा आल्यामुळे राजकीय सोय लावण्यासाठी विदर्भ-मराठवाडा-पश्चिम महाराष्ट्र अशा 4 भागांची विभागणी करण्यात आली.. 4 संचालक पदं ही उपरोक्त 4 विभागांसाठी सर्वपक्षीय नेत्यांनी वाटून घेतली..त्यातल्याही काही जागा महिलांसाठी आरक्षित आहेत म्हणून या सर्वपक्षीय नेत्यांनी नामी शक्कल लढवत संचालकपदासाठी आपल्या पत्नींना पुढे केलं..मग यामध्ये मागे राहतील ते सत्ताधारी कसे? एकनाथ खडसे यांनी आपल्या पत्नी मंदाकिनी खडसे यांचं नाव पुढं केलं..अर्थात हे नाव पुढे आल्यानंतर महानंदच्या अध्यक्षपणी कोणाची वर्णी लागणार हा प्रश्नच निकालात निघाला होता..

महानंदचं लोणी

बिनविरोध झालेल्या संचालक मंडळाची यादी

- महिला राखीव (2 जागा)

- महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे (भाजप)

नवनिर्वाचित अध्यक्ष - महानंद

- प्राजक्ता सुरेश धस (राष्ट्रवादी)

माजी राज्यमंत्री सुरेश धस यांच्या पत्नी

 - मराठवाडा - (4 जागा )

 - हरिभाऊ बागडे, फुलंब्री (भाजप)

विधानसभा अध्यक्ष

- रामकृष्ण बांगर, औरंगाबाद (राष्ट्रवादी)

- राजेंद्र नारायण सूर्यवंशी, लातूर (काँग्रेस)

- विलास बडगे, बीड (राष्ट्रवादी)

- विदर्भ - (4 जागा)

- नीळकंठ कोडे, नागपूर (काँग्रेस)

- विलास काटेखाय, भंडारा (राष्ट्रवादी)

- दयाराम पगाते, गोंदिया (भाजप)

- राजाभाऊ ठाकरे, यवतमाळ (भाजप)

 

-पश्चिम महाराष्ट्र - (4 जागा)

- विनायक धोंडीराम पाटील, सांगली (राष्ट्रवादी)

- डी.के. पवार , सातारा (राष्ट्रवादी)

- विष्णू धर्माजी हिंगे, पुणे (राष्ट्रवादी)

- वसंतराव जगदाळे, कराड (काँग्रेस)

उर्वरित महाराष्ट्र

- प्रशांत यशवंतराव गडाख, नेवासा (राष्ट्रवादी)

- राजेश नामदेव परजणे, अहमदनगर (काँग्रेस)

- विक्रांत जयदेवसिंह रावल, धुळे (राष्ट्रवादी)

- चंद्रकांत रघुवंशी, नंदुरबार (काँग्रेस)

- अनुसूचित जमाती

- वैभव मधुकरराव पिचड (राष्ट्रवादी)

- रणजित विजयबाबू देशमुख (काँग्रेस)

इतर मागास प्रवर्ग

- चंद्रकांत गणपतराव देशमुख, सांगोला (शेकाप व राष्ट्रवादी पुरस्कृत)

वरील सर्वपक्षीय नेत्यांची नावे अशी एकत्रितपणे पाहिली तर राजकारणामध्ये कधीच कोणी कोणाचा शत्रू नसतो, असतील ते फक्त मित्रच असतात आणि सर्व राजकारणी एकमेकांच्या सोयीनुसार नेहमीच परस्परपूरक भूमिका घेतात हेच अधोरेखित होतंय. त्याचबरोबर सहकारातील दिग्गज नेत्यांच्या मुलांनाच महानंदमध्ये संधी मिळाली आहे हे सुद्धा या उपरोक्त यादीवरुन सहज लक्षात येतं.

eknath_khadse_bannerराज्यातले पक्ष छोट्या छोट्या विषयांवरून विधानसभेत एकमेकांना विरोध करतानाच चित्रं पाहायला मिळतं..अनेकदा तर फक्त विरोधासाठी विरोध होत असतो.. विधिमंडळाचं महत्त्वाचं कामकाज पक्षांच्या स्वार्थी राजकीय भूमिकांसाठी बंद पाडलं जातं.. पण हा विरोध काही वैचारिक नसतो... तत्त्वांचाही नसतो. हे सिद्ध होतं महानंदच्या या उदाहरणावरून. महानंदाचं लोणी हातातून जाण्यापेक्षा वाटून खाल्लं तर वाईट काय? अशी सोईस्कर भूमिका घेणारे हे पक्ष दुष्काळाच्या विषयावरही एकत्र येऊन उपाययोजना आखतील का? याची उभा महाराष्ट्र वाट पाहतोय..

जाता जाता -

आश्चर्याची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे यापूर्वी महानंदवर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे वर्चस्व होते. महानंदमधला भ्रष्टाचार जलसिंचन घोटाळ्याएवढाच मोठा आहे असा आरोप नेहमीच होत आला. सहकारीतील अनेक राजकीय कार्यकर्ते तर आमदारकी नको, पण मला महानंदवर एकदा तरी संधी द्या अशी विनवणी पक्षश्रेष्ठींकडे करायचे..कारण दुधाच्या लीटरमागे 5 पैसे पकडले तरी लाखोंचा मलिदा संचालकांना मिळत असे असा जाहीर आरोप तत्कालीन विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी विधानसभेत वेळोवेळी केला होता.

दरम्यान 2014 साली भाजप-शिवसेना युतीचे शासन आल्यानंतर तक्रारी-चौकशीचा फैरा तत्कालीन संचालक मंडळाच्या मागे लावले गेले आणि त्यातूनच महानंदचे संचालक मंडळ मुदतीपूर्वीच बरखास्त करण्यात आलं... अर्थात राज्याचे महसूल तथा पशु-दुग्धसंवर्धन मंत्री एकनाथ खडसे यांनीच या सर्व कारवाईला गती दिली होती...महानंदची बाराखडी माहिती असलेल्या खडसे यांनी सत्तेत आल्यानंतर मात्र सर्वपक्षसमभाव या न्यायाने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या साथीने महानंदमध्ये जोरदार एंट्री केली आहे. प्रवेश करतानाच सर्व पक्षांना आपल्या खिशात ठेवत आपल्या पत्नीलाच महानंदच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवडून आणले आहे...आता खडसेंच्या नेतृत्वात महानंदचे लोणी वाटून खाल्ले जाईल की इथली वर्षानुवर्षे लागलेली भ्रष्टाचाराची कीड थांबवून महानंद गुजरातच्या अमूलसारखं आश्वासक ब्रँड म्हणून नावारूपास येईल हेच पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 10, 2016 09:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close