S M L

एका ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाला अभिवादन

Sonali Deshpande | Updated On: Jan 13, 2017 06:14 PM IST

एका ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाला अभिवादन

mangesh Chivte 1- मंगेश चिवटे,डेप्युटी न्यूज एडिटर,आयबीएन लोकमत

सहकारमहर्षी कै. शंकरराव मोहिते-पाटील म्हणजे महाराष्ट्राच्या सहकार चळवळीतील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व.फक्त सहकारी साखर कारखानदारीवर न थांबता सहकाराच्या माध्यमातूनच सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा ,आरोग्य आदी सर्वच क्षेत्रात भरीव आणि रचनात्मक काम उभं करता येणं शक्य आहे हे त्यांनी कृतीतून सिद्ध केलं. त्यांच्या याच कार्याची दखल घेत चालू वर्ष सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच जन्मशताब्दी वर्ष साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलाय, याच पार्श्वभूमीवर त्यांच्या सहकाराच्या माध्यमातून उभारलेल्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय कार्याचा घेतलेला हा आढावा.

14 जानेवारी 1918 रोजी अकलूजमधील माने या गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेला शंकर वयाच्या विशीत लक्ष्मीबाई मोहिते यांच्या आग्रहाखातर सधन अशा मोहिते पाटील कुटुंबात दत्तक गेला. पण त्यापूर्वी लहान वयात शंकरने अनेक हालअपेष्ठा आणि अपमान भोगावे लागले. शाळेची फी भरायला पैसे नसल्याने शंकर मानेला सातवी मध्येच शाळा सोडावी लागली होती. त्यावेळी शाळा सोडताना याच लहानग्या शंकरने मास्तरांना " अशा 56 शाळा उभ्या करीन आणि अनेक गरिबांची पोरं फुकट शिकवीन.." असे आवेशपूर्ण उत्तर दिले होते; कालांतराने ते कृतीतून सिध्दही केले. लैकिकाअर्थानं त्यांना शालेय शिक्षणापासून वंचित राहावे लागले असले तरी समाजजीवनाच्या शाळेतील व्यावहारिक शिक्षण मात्र त्यांनी आत्मसात केले. अन्यायाविरुद्ध बंड करण्याची रोखठोक भूमिका आणि समाजासाठी काहीतरी रचनात्मक काम करण्यासाठी लागणारी दुर्दम्य इच्छाशक्ती या दोन्हीचा मिलाप शंकरराव यांच्या मध्ये होता. त्यामुळेच एका पाठोपाठ सहकारी संस्थांची उभारणी करताना, शंकररावांनी आलेल्या प्रत्येक आव्हानाला परतून लावले. आपल्या गावातील प्रत्येक मुलाला गावातच शिक्षण,नोकरी आणि आरोग्य या मूलभूत सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत या एकाच ध्येयाने झपाटलेल्या शंकररावांनी या सर्वच क्षेत्रांत भरीव असं संस्थात्मक आणि रचनात्मक काम उभं केलं. लोकांच्या पाठिंब्यावर 1952 साली आणि त्यानंतर 1957 साली झालेल्या विधानसभा निवडणुकांत शंकरराव मोहिते शेतकरी कामगार पक्षाकडून विधानसभेत निवडून गेले. मुंबईत य़शवंतराव चव्हाणांची जवळीक वाढलेली असूनसुद्धा आणि त्यांनी वारंवार आग्रह करून सुद्धा काँग्रेसमध्ये प्रवेश केला नव्हता. पक्ष प्रवेशावर बोलताना

"माझ्या भागातील शेतक-यांचे पाण्याशी संबधित आणि सहकाराशी संबंधित प्रश्न सोडवा, त्यानंतर पक्षप्रवेशासंदर्भात विचार करू " अशी बाणेदार - रोखठोक मतं शंकरराव व्यक्त करत. दरम्यान यशवंतराव चव्हाण यांच्या विनंतीला मान देत आणि शेतक-यांचे प्रश्न सोडविण्याचा शब्द घेत शंकररावांनी शेतकरी कामगार पक्षातून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षप्रवेशावेळी यशवंतराव चव्हाण यांनी शंकरराव नेहमी परिधान करत असलेली काळी टोपी काढून त्यांच्या मस्तकी काँग्रेसची पांढरी गांधी टोपी चढविली आणि शंकरराव काँग्रेसवासी झाले.

patilफक्त महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतवर्षात सहकारी तत्त्वावरील साखर कारखाना उभारला तो अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरानगर येथे. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील अर्थ तद्न्य धनंजयराव गाडगीळ या नेतेद्वयीनी राज्यात सहकाराचा पाया रोवला. कालांतराने याच मार्गाने अख्खा महाराष्ट्र चालला, आणि ग्रामीण भागाचं अर्थकारण बदलून टाकणारं सहकाराचं एक मजबूत जाळं राज्यात विणलं गेलं. विखे पाटील यांच्या पावलांवर पाऊल ठेवत महाराष्ट्रात सुरूवातीच्या काळात ज्या काही मोजक्या नेत्यांनी सहकार चळवळ आपल्या भागात रुजविली - वाढविली त्यामध्ये सर्वात आघाडीवर राहिले ते अलकुजचे शंकरराव मोहिते पाटील. 1960 च्या दशकात शंकरराव मोहिते पाटील यांनी महाराष्ट्राचे शिल्पकार आणि तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या सहकार्याने अकलूज येथे " यशवंत " सहकारी साखर कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली. यशवंतराव चव्हाण यांच्याप्रती शंकररावांची असलेली निष्ठा या कारखान्याला दिलेल्या नावांतून दिसते. दरम्यान कारखान्याचे शेअर्स गोळा करताना आणि एकूणच उभारणी करताना शंकररावना अनंत अडचणींचा सामना करावा लागला, पण शंकररावानी कधी हार मानली नाही.

1960च्या दशकांत " यशवंत " सहकारी साखर कारखान्याची उभारणी केल्यानंतर शंकरराव मोहिते पाटील थांबले नाहीत. जबरदस्त महत्वाकांक्षी असलेल्या शंकररावांनी महाराष्ट्रातील सहकारी तत्त्वावरील पहिला राजहंस कुक्कुटपालन संघ उभारला. 1965 साली उभारलेल्या या कुक्कुटपालन संघासाठी खास कलकत्ताहून विदेशी बॉयलर कोंबड्या विशेष विमानातून मागविण्यात आल्या होत्या. या उद्योगाबाबत तर शंकरराव इतके उत्साही होते की , मुंबई विमानतळावरून कोंबड्यांचा ट्रक आल्यानंतर त्यांनी त्या कोंबड्या स्वतः उतरवून घेतल्या होत्या.शेतकरी सभासदांच्या साथीने सत्तरीच्या दशकात एकट्या माळशिरस तालुक्यातून दररोज 4 लाख अंडी निर्यात होत असे. शालेय पोषण आहारामध्ये अंड्याचा समावेश असल्याने आसपासच्या पंचक्रोशीतील ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थ्यांना राजहंसची अंडी पुरविली जात असत. त्याकाळी वार्षिक दीड कोटी रुपये नफा मिळविणा-या या राजहंस कुक्कुटपालन संघाने शेअर्स धारक शेतकरी सभासदांना 8 पटीने जास्त डिविंडंट रक्कम सुपुर्द केली होती.

राजहंस कुक्कुटपालन केंद्रा पाठोपाठ शंकरराव मोहिते पाटील यांनी शिवामृत सहकारी दूध संघाची मुहूर्तमेढ रोवली. कारण शेती फायद्यात आणायची असेल तर जोडधंदा असण्यावाचून पर्याय नाही हे त्यांनी सत्तरीच्या दशकांत ओळखले होते. " ज्याच्या घरी एक गाय, तो कमवी तलाठ्याचा पगार, आणि ज्याच्या घरी 4 गाय तो कमवी मामलेदाराचा पगार " अशी ग्रामीण ढंगातली घोषणा लोकप्रिय केली आणि पंचक्रोशीतील तमाम शेतकरी समाजमन जागृत केले. संशोधक वृत्ती असलेल्या शंकररावांनी दूध उत्पादन वाढविण्यासाठी देशी गायी च्या ऐवजी जर्सी गाय चा पर्याय निवडला. मोठ्या प्रमाणात जरशी गायी आणण्यासाठी त्यांनी आपले जेष्ठ चिरंजीव विजायसिंह यांस बेंगलोर ला धाडले. महागड्या जरशी गायी परवडत नाहीत, याचा सारासार विचार करून शिवामृत सहकारी दूध संघा तर्फे सभासद शेतकऱ्यांना मोफत गाई वाटप केले आणि हळू हळू " घरटी एक गाय " हे शंकरराव यांचे स्वप्न पूर्ण झाले. ( आजही शंकरराव मोहिते यांची आठवण म्हणून अकलूजच्या शिवामृत दूध संघाच्या मुख्य कार्यालयासमोर एक झोपडी आणि समोर जरशी गाय अशी हुबेहूब प्रतिमा साकारण्यात आली आहे ) शिवामृत दूध संघाच्या माध्यमातून अकलूज - माळशिरस पंचक्रोशीतील प्रत्येक शेतकरी दूध उत्पादक शेतकरी बनला, शेतीला जोडधंदा मिळाला आणि शेतकऱ्यांचे दरडोई उत्पन्न वाढले. आज शिवामृत दूध संघाच्या माध्यमातून दररोज 2 लाख लिटर दूध संकलित केले जाते आणि दही, श्रीखंड, तूप, लस्सी यांसारख्या अनेक उपपदार्थांची निर्मिती केली जाते. शिवामृत दूध संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अनेक मुलांना रोजगाराची संधी मिळाली.

एकीकडे सहकार चळवळीच्या माध्यमातून सहकारी संस्थांची उभारणी करत असताना ग्रामीण भागात चांगल्या आणि दर्जेदार शिक्षणाची सोय उपलब्ध होत नाही ही खंत शंकररावाना होती. जिथं साधी राहण्याची व्यवस्था देखील होऊ शकत नाही, तिथं इतर शैक्षणिक सुविधांबद्दल काय बोलणार अशी परिस्थिती होती. भारत स्वतंत्र झाल्यानंतर लगेचच सन 1948 सालच्या जानेवारी महिन्यात शंकरराव यांच्या सामाजिक कार्याची आणि भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात घेतलेल्या आक्रमक सहभागाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अकलूज येथे त्यांचा जाहीर सत्कार सोहळा पार पडला. अकलूज, माळशिरस, पंढरपूर आणि एकूणच सोलापूर जिल्ह्याच्या पंचक्रोशीतील सर्वसामान्य शेतकऱ्यांनी या सत्काराच्या कार्यक्रमात 11 हजार रुपयांची थैली बक्षीस म्हणून दिली. या कार्यक्रमात सत्काराला उत्तर देताना शंकररावांच्या डोळ्यांत कृतकृत्य झाल्याचे भाव होते. आपल्या भावपूर्ण आणि जनतेच्या काळजाला भिडणाऱ्या स्वरात शंकररावांनी घोषणा केली ; " यापुढील सर्व आयुष्य जनतेच्या,सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी समर्पित करेन.. आणि जीवात जीवमान असेपर्यंत जनतेची फक्त आणि फक्त सेवा करेन.." याच सरकारच्या कार्यक्रमात पुढे बोलताना शंकरराव यांनी मिळालेल्या बक्षीसरुपी मिळालेल्या पैशात स्वतःचे तेवढेच पैसे अधिकचे देऊन आपण अकलूज येथेच गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांसाठी वसतिगृहाची स्थापना करणार असल्याची घोषणा केली. सन 1948 साल संपण्याच्या आत " विजय वसतिगृह "ची इमारत दिमाखात उभी राहिली, आणि परिसरातील शेतकऱ्यांच्या - कष्टकऱ्यांच्या मुलांच्या राहण्याची सोय झाली.

मात्र एवढ्यावरच थांबतील ते शंकरराव कसे..? माझ्या गावातील मुलांना अधिक दर्जेदार शिक्षण मिळावं ही त्यांची दुर्दम्य इच्छाशक्ती होती. यासाठीच त्यांनी साठच्या दशकात अकलूज शिक्षण प्रसारक मंडळी या संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून सदाशिवराव माने विद्यालय, रत्नप्रभादेवी मोहिते पाटील महाविद्यालय आदी विद्यालयाची उभारणी केली. सोबतच कृषी महाविद्यालयाची उभारणी करून शेतकऱ्यांची मुलं कृषी संशोधक कशी बनविता येतील यासाठी प्रयत्न केले. पण तरीही एक सल शंकरराव यांच्या मनात कायम होती. पुण्या - मुंबईत शिकतात तशी शेतकऱ्यांची मुलं इंग्रजी माध्यमात का शिकू शकत नाही..? हा प्रश्न शंकरराव याना अस्वस्थ करत असे. शेतकऱ्यांच्या मुलानाही इंग्रजी शाळेत शिकता यावं हा दूरदृष्टिकोन ठेवत शंकररावांनी 1975 साली ग्रीन फिंगर्स या निवासी इंग्रजी शाळेची उभारणी केली. आज गेल्या 40 वर्षात या शाळेने अनेक नावाजलेले संशोधक, सामाजिक विचारवंत आणि राजकीय नेते दिले. राज्याच्या मंत्रिमंडळातील संभाजी पाटील निलंगेकर, स्वतः माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील या शाळेचे विध्यार्थी आहेत. शंकरराव मोहिते पाटील यांनी उभारलेल्या सर्वच शिक्षण संस्थामध्ये आधुनिक सोयीसुविधा देण्याच्या प्रयत्न केला. आधुनिकतेची कास धरताना आपल्या मुऴ संस्कारांना देखील विसरता कामा नये याची काळजीही शाऴेत घेतली जाते. याच पार्श्वभुमिवर मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शिव पार्वती कलापथकाची निर्मिती करण्यात आली. तर शालेय विध्यार्थ्या मध्ये मैदानी खेळांची आवड निर्माण व्हावी म्हणून 1970 मध्ये प्रताप क्रीडा मंडळाची स्थापना केली. शिव पार्वती कला पथकाने आजपर्यंत मराठी चित्रपट सृष्टीला कलाकार आणि सह कलाकार दिले आहेत, तर प्रताप क्रीडा मंडळातुन आजपर्यंत अनेक राष्ट्रीय पातळीवरचे खो खो, कबड्डीपटू घडले आहेत.

शंकरराव मोहिते पाटील यांनी सहकारी संस्था बरोबरच शैक्षणिक संस्थांची उभारणी केल्यामुळे अकलूज आणि माळशिरस परिसरातील अनेक विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची आणि नोकरीची गरज देखील पूर्ण झाली. नोकरीसाठी पुण्या मुंबईतच जावं लागतं ही मूलभूत चौकट शंकरराव मोहिते पाटील यांनी मोडून काढली. अकलूजच्याच शाळेत शिकलेले साहेबराव देशमुख हे नंतर याच शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले आणि कालांतराने प्राचार्य देखील झाले. कुणी साखर कारखान्यात कामगार म्हणून तर कुणी दूध संघात क्लार्क म्हणून किंवा इतर कुठल्या तरी संस्थेत अशा अनेक संधी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या मुलांसाठी निर्माण झाल्या. शंकरराव मोहिते पाटील यांच्या अष्टपैलू कार्याचा ठसा अकलूज आणि परिसरातील जनमाणसावर उमटलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. शंकरराव मोहिते पाटलांनी उभ्या केलेल्या रचनात्मक कामामुळे अकलूज - माळशिरस आणि आजूबाजूच्या तालुक्यांतील विद्यार्थ्यांची याच परिसरात शिक्षणाची सोय झाली. सोबतच याठिकाणी उभारलेल्या अन्य संस्थामुळे मुलांना नोक-या देखील सहज शक्य झाले.

patil 1शंकरराव मोहिते पाटील ऐन तारुण्यात असताना देशाचा स्वातंत्र्यलढा अंतिम टप्प्यात आला होता. तर इकडे आपल्या संघटन कौशल्यामुळे शंकरराव मोहिते पाटील यांनी अकलूज आणि माळशिरस परिसरात युवकांचं एक जबरदस्त संघटन उभारलं होतं. याच दरम्यान महात्मा गांधीजीनी 1942 साली ब्रिटिशांना चले जावं चा नारा दिला होता. तर इकडे साता-याच पत्री सरकारचं वादळ स्वातंत्र्यसैनिक क्रांतीसिंह नाना पाटील अकलूज मध्ये आलं होते. शंकरराव मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली अकलूजच्या मुख्य चौकात क्रांतीसिंह नाना पाटील जबरदस्त सभा झाली. अन्यायाविरूद्ध शड्डू ठोकण्याचा आणि एल्गार पुकारण्याचा अंगभूत गुणधर्म असलेल्या शंकररावांनी मग आपल्या सवंगडयासहित स्वातंत्र्य चळवळीत झोकून दिले. त्यांच्या समवेतचे सहकारी आणि स्वातंत्रसैनिक रघुनाथराव माने ( गुरूजी ) यांनी नुकतीच वयाची शंभरी ओलांडली. शंकरारावांच्या आठवणी सांगताना त्यांच्या डोळ्यांत अश्रू दाटून येतात. शंकरराव यांचे समकालीन सहकारी असलेल्या सर्वांनाच शंकरराव यांचा कोण अभिमान..अजूनही शंकरराव यांचा बद्दलचा विषय काढला कि तासन तास बोलणारे अनेक वयोवृद्ध अकलूज आणि माळशिरस नव्हे अक्ख्या सोलापूर जिल्ह्याच्या पंचक्रोशीमध्ये आढळतील यातच त्यांचे कार्य आणि संघटन कौशल्य किती मोठे होतं याची खात्री पटते.

नोकरीच्या शोधात असलेल्या अनेत तरूणांना शंकरराव मोहेिते पाटील यांनी स्वयंरोजगार उभे करण्याकरिता प्रोत्साहित केले. यांपैकीच एक असलेले श्रीपतराव गायकवाड. रोजगाराच्या शोधात श्रीपतरावांनी कोल्हापुरहुन थेट अकलूज गाठलं होतं. शंकरराव मोहिते यांची थेट भेट घेण्याचा प्रयत्न केलेल्या श्रीपतरावांना मात्र यात काही यश येत नव्हतं, कारण शंकरराव नेहमी लोकांच्या गराड्यात. मग नामी शक्कल लढवत श्रीपतराव यांनी शंकररावांना थेट शेतात गाठलं आणि आपली कहाणी सांगितली. या युवकाला त्याची फोटोग्राफीची आवड लक्षात घेउन फोटो स्टुडिओ उभा करण्यासाठी सर्वोतोपरी मदत केली. आजही श्रीपतराव गायकवाड यांच्या दुकानाच्या बोर्डावर "शंकरराव मोहिते पाटील यांच्या प्रेरणेणे राजू फोटो स्टुडिओ " असा बोर्ड लागला आहे. गायकवाड यांच्याकडे शंकरराव मोहिते पाटील आणि एकूणच मोहिते पाटील कुटुंबियांच्या ब्लँक अँण्ड व्हाईट असंख्य आठवणी फोटोरुपाने उपलब्ध आहेत.

शंकरराव मोहिते पाटील यांनी सहकाराच्या माध्यमातून अकलूज - माळशिरस आणि पंचक्रोशीतील परिसरात समृद्धी आणली. हा परिसर अक्षरश नंदनवन केला. मात्र सोबतच या परिसराची सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील भुक भागविली. स्वता एक नावाजलेले पेैलवान असलेले शंकरराव कुस्तीसाठी काही न करतील तर नवलच. शंकरराव मोहिते पाटील यांनी कुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी अकलूज येथे तालीम सुरू केली. ज्यांची आर्थिक परिस्थिती गरीब आहे अशा मल्लांची राहण्याची आणि खाण्यापिण्याची सोय केली. दरम्यान 1975 साली शंकररावांनी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचं आयोजन अकलूज येथं केल. महाराष्ट्र केसरीच्या मानाच्या गदेसाठी खेळली जाणारी कुस्ती अकलूज मध्ये खेळली गेली. या कुस्ती स्पर्धेला उपस्थित राहण्यासाठी महाराष्ट्रातील तमाम कुस्तीप्रेमींनी लाखोंच्या संख्येत गर्दी केली होती. ( शंकरराव मोहिते पाटील आणि एकूणच मोहिते पाटील कुटुंबियांना कुस्तीच अक्षरश वेड होतं. याच वेडापायी स्वतः पैलवान असलेल्या शंकरराव यांनी आपल्या सर्व 6 मुलांना व्यायाम आणि कुस्तीची आवड निर्माण व्हावी म्हणून काही काळ तालमीत राहायला ठेवले होते. यांपैकी विजयसिंह आणि प्रतापसिंह यांचा कुस्तीप्रती असलेला ओढा लक्षात घेत शंकरराव यांनी गावोगावच्या यात्रा मध्ये भरणाऱ्या कुस्तीच्या फडात विजयसिंह आणि प्रतापसिंह या दोन्ही मुलांना कुस्ती खेळायला उतरवीत असतं. अशाच एका कुस्तीच्या मैदानात शरद पवार यांचे लहान बंधू प्रतापराव पवार यांनी विजयसिंह मोहिते यांस अस्मान दाखविले होते. हा पराभव शंकरराव यांच्या जिव्हारी लागला होता. त्यांनी विजयसिंह यांस अजून मेहनत घ्यायला बाध्य केले. आणि योगायोगाने अशाच एका कुस्तीच्या मैदानात पुन्हा एकदा प्रतापराव पवार आणि विजयसिंह मोहिते आमने - सामने आले. यावेळी मात्र मागील पराभवाचा बदला घेत अवघ्या काही क्षणांत प्रतापराव पवार यांस चितपट केले. पवार यांनी आपल्या आत्मचरित्र मध्ये आवर्जून या घटनेचा उल्लेख केला आहे )

तमाशा म्हणजे ग्रामीण महाराष्ट्राची ओळख. मात्र समाजाचा तमाशाकडे पाहण्याचा तसा नकारात्मकच होता किंबहुना आजही फारसा सकारात्मक नाही. तमाशाला किंवा लावणीला जायचं म्हणजे चोरून लपून जायच अशी परिस्थिती. मात्र तमाशा- लावणी कडे बघण्याचा हा दृष्टीकोन बदलण्यासाठी शंकरराव मोहिते पाटील जाणीवपुर्वक प्रयत्न केले. साधारणात सत्तरीच्या दशकांत तमाशा परिषदेचे अध्यक्ष रंगराव पाटील यांच्या निधनानंतर तमाशा थिटएर्स चालक - मालक अक्षरश पोरके झाले होते. याच दरम्यान तमाशा - चालक परिषदेतील सर्व प्रमुख सदस्य़ांनी अकलूज गाठल, आणि शंकररावांना तमाशा परिषदेचं अध्यक्षपद स्विकारण्याची विनंती केली. शंकररावांनी मोठ्या मनाने ही विनंती मान्य केली आणि तमाशा परिषदेच्या अध्यक्षस्थानी विराजमान झाले. त्यावेळी तमाशा थिएटर मध्ये झालेल्या एका भाषणात शंकरराव म्हणाले होते कि " कलावंत हा कलेचा भोक्ता असतो. कला - कलावंत श्रेष्ठ आहेत.समाजात त्यांची कदर करायलाच हवी. " शंकररावांचा हाच सांस्कृतिक वारसा मोहिते पाटील यांच्या पुढील पिढीने जपला आहे. शंकरराव मोहिते पाटील यांच्या निधनानंतर मोहिते पाटील लावणी स्पर्धा महाराष्ट्रातील एकमेव लावणी स्पर्धात्मक कार्यक्रम असून यावर्षी ही स्पर्धा 25 व्या वर्षांत पदार्पण करत आहे.

एकीकडे समाजाच्या जबाबदा-या पार पाडताना शंकरराव मोहिते कौंटुबिक पातळीवरही यशस्वी ठरत होते. आपल्या सर्व 6 मुलांच्या आणि 3 मुलींच्या शिक्षणाकडे त्यांनी कधीच दुर्लक्ष होवू दिले नाही. सर्व मुलांना त्यांच्या त्यांच्या इच्छेनुसार करिअर निवडण्याची मोकळीक दिली. त्यामुळेच शंकरराव यांचे सर्वात ज्येष्ठ चिरंजिव विजयसिंह आणि सर्वात धाकटे बंधु प्रतापसिंह यांनी राजकीय वाट निवडली. तर इतर चिरंजीव राजसिंह , मदनसिंह , उदयसिंह आणि जयसिंह यांनी उद्योग व्यवसायाच्या वाटा निवडल्या. यांपैकी विजयसिंह आणि प्रतापसिंह यांनी पुढे स्वकतृत्वावर राज्यमंत्रीमंडळात मंत्री पदापर्य़ंत मजल मारली. शंकरराव मोहिते यांचे ज्येष्ठ चिरंजीव असलेल्या विजयसिंह यांच्या विवाहानिमित्त 1972 च्या दुष्काळात पार पडलेल लक्षभोजन त्याकाळी देशभर चर्चेचा विषय ठरला होता. अगदी BBC आणि London Times या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांनीही भर दुष्कळांत झालेल्या या लक्षभोजनाची ठळक मथळयाखाली दखल घेतली होती. लक्षभोजनाच्या नकारात्मक चर्चेमुळे काँग्रेस पक्षाच्या हायकमांडने शंकरराव यांचे पुढील विधानसभा निवडणुकीत तिकिट कापले होते. मात्र याला सणसणीत चपराक म्हणून अकलूजकरांनी त्यावेळच्या निवडणुकीत विधानसभेचा आमदार बिनविरोध निवडून दिला होता. त्यावेळी या लक्षभोजनाचे समर्थन करताना शंकरराव मोहिते पाटील समाजकारणात - राजकारणात असल्याने आजपर्यंत अनेकांचा पाहुणचार घेतला त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी लक्षभोजन दिले, असे म्हणत लक्षभोजनाचे समर्थन केले होते. पुण्यात वसंत व्याख्य़ानमालेत गाजलेल्या एका खुमासदार भाषणात स्वता शंकरराव मोहिते पाटील यांनी हा किस्सा कथन केला होता. " फक्त 1 लाख नाही तर 1 लाख 18 हजार पेक्षा जास्त लोकांना आम्ही जेवू घातले , वरचे 18 हजार का कमी करता..? असा प्रतिप्रश्न करत आमचं कर्तव्य म्हणून आम्ही पाहुणचार केला असे सांगत. पण सोबतच याच दरम्यान सलग 2 वर्षे दुष्काळग्रस्ता साठी टँकरने मोफत पाणी पुरवठा आणि रोज 9 हजार लोकांना सुकडी वाटप करत होतो , दुर्दैवाने त्याची कुणीही दखल घेतली नाही ही सल माझ्या मनात अखेरपर्यंत राहील ; असे भावपूर्ण उद्गार काढत.

आपल्या रोखठोक भुमिकांसाठी प्रसिद्ध असलेल्या शंकरराव मोहिते पाटलांनी कमाल जमीन कायद्या विरोधात स्वताच्याच सरकारविरोधात थेट भुमिका घेतली होती. महाराष्ट्र सरकारने 1969 साली जिरायती शेतक-यांच्या जमीनीवर जाचक अटी लादणारा सिंलिंग अँक्ट कायदा केला होता. या कायद्या विरोधात शंकररावांनी अक्षरश रान पेटविले होते. याच सुमारास शंकरराव मोहिते पाटील यांनी 1 लाख शेतक-यांचा " रुमनं मोर्चा " काढला होता. दरम्यान शेतक-यांच्या प्रश्नावर आक्रपणे लढा देण्यासाठी शंकरराव मोहिते पाटील यांनी काँग्रेस पक्षात असताना देखील समांतर अशी शेतकरी संघटना स्थापन केली होती. थोडक्यात शेतक-यांच्या घामाला दाम मिळवून देण्यासाठी शरद जोशींनी नव्वदीच्या दशकात शेतकरी संघटनेची स्थापना केली होती, त्याअगोदरही ख-या अर्थाने शेतकरी संघटनेची स्थापना अकलूज मध्ये् शंकरराव मोहिते पाटील यांनी केली होती. ( याच दरम्यान यशवंत साखर कारखान्याच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयाच्या उदघाटन सोहळ्याला शंकरराव यांनी तत्कालीन संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब यांस प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले होते. अर्थातच शंकररावांनी आपल्या व्यक्तिगत आयुष्यात आदराचे स्थान देणाऱ्या यशवंतरावांच्या हस्तेच या कार्यालयाचे उद्घाटन करविले होते. मात्र भव्य - दिव्य कार्यालय, आकर्षक सागवानी लाकडाच फर्निचर आणि सर्वत्र लावलेले वातानुकूलित यंत्र (AC ) पाहून यशवंतराव देखील आश्चर्यचकित झाले. त्यांना सहकारी तत्वावर उभारलेल्या एका कारखान्याने एवढा अवाढव्य खर्च कार्यालयावर करावा हे मनोमन पटले नाही. यावरच न थांबता मुंबईत गेल्यानंतर यशवंतराव चव्हाण यांनी एका बैठकीमध्ये अकलूज च्या यशवंत साखर कारखान्याच्या कार्यालयाचे उदाहरण देत, " सहकारी साखर कारखान्यांनी अशा प्रकारची उधळपट्टी करू नये असे आदेशच दिले . " मात्र नंतरच्या काळात यासंदर्भात स्पष्टीकरण देताना शंकरराव मोहिते पाटील यांनी एका बैठकीत आपली निर्भीड भूमिका स्पष्ट करताना " गावातला शेतकरी उद्या काही कामा निमित्त जेव्हा पुण्या - मुंबईला जाऊ लागेल तेंव्हा तिथली चकचकीत कार्यालयं आणि वातानुकूलित यंत्र पाहून हुरळून जायला नको, म्हणून AC बसविलेत. नाहीतर पुण्या - मुंबईत चकचकीत कार्यालयात मशीन मधून गार - गार वार येत या समजात माझा शेतकरी राहायला नको या शुद्ध भावनेपोटी आम्ही कार्यालय AC केलीत. उलट तुम्ही सर्वांनीच करा असे आवाहन केले."

शंकरराव मोहिते पाटील यांनी सत्तरीच्या दशकात सदाशिवनगर येथील चितळे यांचा चितळे प्राईवेट साखर करखाना स्वतची जमीन गहाण ठेवून विकत घेतला. त्याकाळी त्यांनी ठरविलं असतं तर सत्तरीच्या दशकातच त्यांना हा कारखाना पुढेही खाजगी तत्त्वावर सुरु ठेवला असता आणि स्वतःच्या संपत्तीमध्ये वाढ करता आली असती. पण "पैशाच्या भौतिक संपत्तीपेक्षा जनसंपत्ती आयुष्यभर पुरते " या आपल्या ब्रीदवाक्याच व्यक्तिगत आयुष्यात आचरण करत हा खाजगी कारखाना विकत घेतल्यानंतर सहकाराच्या माध्यमातून पुढे सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला. सहकारतत्वाचं नैतिक अधिष्ठान असलेल्या शंकररावांनी हा कारखाना सहकारी तत्वावर रूपांतरित केला आणि एकाच वर्षात नफ्यात चालवून दाखविला.

11 फेब्रुवारी 1969 रोजी वयाच्या 61 व्या वर्षी शंकरराव मोहिते - पाटील यांचे निधन झाले. अवघे 61 आयुर्मान मिळालेल्या शंकररावांचा मोहिते- पाटील यांच्या घराण्यात दत्तक जाण्याअगोदरचा 20 - 22 वर्षांचा काळ वगळला तर खऱ्या अर्थाने त्यांना काम करण्यासाठी मिळाली ती फक्त 35 वर्षे. याच कार्यकाळात त्यांनी महिलांच्या हाताला काम देण्यासाठी विजय प्रिंटिग प्रेस, गरीब मुलांसाठी विजय वसतिगृह, शिक्षणासाठी अकलूज प्रसारक शिक्षण प्रसारक मंडऴच्या माध्यामातून शाळा - महाविद्यालये, शेती संशोधक घडविण्यासाठी कृषी महाविद्यालये, शेतक-यांना जोडधंदा उपलब्ध करून देण्यासाठी राजहंस कुक्कुटपालन संघ, शिवामृत दूध संघाची स्थापना आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यशवंत सहकारी साखर कारखान्याची उभारणी नंतरच्या काळात मॉल च्या धर्तीवर शंकर बाजार ची उभारणी अशा एक ना अनेक संस्था शंकररावांनी निर्माण केल्या आणि सक्षमपणे पुढे चालविल्या. याशिवाय सामाजिक , सांस्कृतिक , क्रीडा क्षेत्रात भरीव योगदान देताना प्रताप क्रीडा मंडळाची स्थापना, तमाशा परिषदेचे अध्यक्षपद, कुस्तीपटू घडविण्यासाठी तालीमची स्थापना आणि नंतरच्या काळात शेतक-यांच्या प्रश्नावर लढण्यासाठी शेतकरी संघटनेची स्थापना. थोडक्यात शंकरराव मोहिते पाटील यांचा आत्मा हा गावातील तळागळातील सर्वसामान्य शेतकरी होता. " ज्याच्या शेतात पाणी त्याच्या मनगटात पाणी असंही शंकरराव नेहमी म्हणायचे. " त्यांच्याच कल्पनेतून आणि पाठपुराव्यामुळे माळशिरस तालुक्यातील अनेक ऱखडलेल्या सिंचन योजना मार्गी लागल्या,आणि शेतकरी समृद्ध झाला. मात्र शंकररावांनी स्वप्न पाहिलेली कृष्णा - भीमा स्थिरीकरण योजना अजूनही राज्य सरकारच्या लाल फितीत अडकून आहे. या योजनेच्या माध्यमातून कायम अवर्षणग्रस्त असलेले 5 जिल्हे आणि 43 तालुक्यातील जलसिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविला जावू शकतो असा आजही दावा केला जातो. मात्र " फिजिबिलिटी " मुद्द्यावर अजूनही अभ्यासकांचे एकमत झालेलं नाही असं कारण देत ही योजना बासनात गुंडाळली गेल्यात जमा आहे. खरं तर " अकलूज - बारामतीच्या श्रेयवादात " कृष्णा - भीमा स्थिरीकरण योजनेचा पद्धतशीर बळी गेला हेच उघड सत्य आहे. शंकररावांच जन्मशताब्दी वर्ष साजरं करणारं फडणवीस सरकारने या योजने संदर्भात पुन्हा एकदा गांभीर्याने सकारात्मक विचार केला तर ते खरचं शंकरराव मोहिते पाटील यांना अभिवादन ठरेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 13, 2017 06:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close