S M L

अविस्मरणीय आफ्रिकन सफारी !

Sachin Salve | Updated On: Jul 27, 2013 09:37 PM IST

अविस्मरणीय आफ्रिकन सफारी !

meena_karnik_blog                                              Posted By- मीना कर्णिक, चित्रपट समीक्षक

युरोप फिरून आल्यानंतर, तिथल्या विकसित देशांमधली समृद्धी अनुभवल्यानंतर दक्षिण आफ्रिकेतला अनुभव अगदी वेगळा असतो. नुकतीच पंधरा दिवसांची या देशाची सफर केल्यानंतर निदान मला तरी तसंच वाटलं. केप टाऊन, प्लेटेनबर्ग बे, न्यासना, जोहानसबर्ग, प्रेटोरिआ यापैकी कुठेही फिरताना मनात सतत एक आपलेपणाची भावना निर्माण होत होती. माणसांशी संवाद साधताना परक्याशी बोलल्यासारखं वाटत नव्हतं. जाताना अनेकांनी दक्षिण आफ्रिकेतल्या गुन्हेगारीच्या (ऐकीव) कथा सांगून सावधगिरीचा इशारा दिला होता. पण त्यात अतिरेकाचाच भाग जास्त असल्याचं आमच्या लक्षात आलं. कुठेही, कधीही आम्हाला कोणताही अनुचित अनुभव आला नाही. किंबहुना, कृष्णवर्णीय असो वा श्‍वेतवर्णीय, भारतीय म्हणून खूप मान मिळाला, प्रेमाने वागवलं गेलं, मदत केली गेली.

तसं बघायला गेलं तर मी ज्या शहरांमध्ये किंवा गावांमध्ये फिरले त्यांचं व्यक्तिमत्त्व अजिबातच सारखं नव्हतं. जुलै महिना म्हणजे दक्षिण आफ्रिकेतला थंडीचा काळ. त्यामुळे संध्याकाळी पाच वाजताच काळोख होत होता. (रात्री दहा वाजेपर्यंत टक्क उजेड असलेल्या युरोपपेक्षा परदेशातला हा अनुभवही वेगळा.) त्यामुळे फिरायला निघायचं ते सकाळी लवकर. रस्त्यावर कृष्णवर्णीयांचं वर्चस्व सहज जाणवतं, पण त्याचबरोबर जगभरातून स्थायिक झालेले लोकही भेटतात. अगदी भारतातल्या हैदराबादपासून ते फ्रान्सपर्यंत आणि पाकिस्तानपासून जर्मनीपर्यंत.

आम्ही राहत असलेल्या अपार्टमेंटमधून समोरच जगातलं एक आश्‍चर्य मानला गेलेला टेबल माऊंटन दिसत होता. या पठाराभोवती केप टाऊन वसलंय. सिटी बसची टूर घेतली तर टेबल माऊंटनवर जाता येतं. पण त्यासाठी नशिबाने साथ द्यावी लागते. आम्ही पोहोचलो त्या दिवशी रविवार होता. त्यामुळे सगळं शहर बंद होतं. आमच्या समोरचा टेबल माऊंटन अगदी स्वच्छ दिसत होता. पण दुसर्‍या दिवशी पहाटे पाहिलं तर त्यावर ढगांचं साम्राज्य होतं. दाट ढग. अशा वेळी वर जाणारी केबल कार बंद ठेवली जाते. या ढगांनी पुढचे चारही दिवस आपला मुक्काम हलवला नाही आणि अगदी वरपर्यंत जाण्याची आमची इच्छा अपुरी राहिली. मात्र, सिटी टूरमुळे या शहराची ओळख व्हायला मदत झाली. टेबल माऊंटनला एक अख्खी फेरी मारून ही बस शहराच्या विविध भागांमधून फिरते आणि जगातल्या अत्यंत देखण्या शहरांमध्ये केप टाऊनचा समावेश का होतो हे समजतं.

केप टाऊन म्हणजे निसर्ग सौंदर्याची उधळण. केप ऑफ गुड होप, म्हणजे जिथे हिंदी महासागर आणि अटलांटिक महासागर एकमेकांना भेटतात तो भाग. केप टाऊनपासून केप पॉईंटला जायचं, वाटेत ऑस्ट्रिच फार्मवर दक्षिण आफ्रिकेतल्या या सगळ्यात महत्त्वाच्या पक्षाची भेट घ्यायची, (ऑस्ट्रिचचा उपयोग इथे मोठ्या प्रमाणावर केला जातो. या पक्षाची अंडी खाल्ली जातात, शोभेची वस्तू म्हणून त्यावर चित्रं काढून ती सुव्हिनिअर शॉप्समधून विक्रीला असतात. ऑस्ट्रिचचं मांस अतिशय चविष्ट लागतं. मुख्य म्हणजे रंगाने लाल असूनही त्यात इतर प्रकारच्या रेड मीटसारखं कोलेस्टेरॉल नसतं. ऑस्ट्रिचच्या पिसांपासून अनेक शोभेच्या आणि उपयोगाच्या वस्तू बनवल्या जातात.) मग दोन महासागरांचं मिलन पाहून परत येताना छोट्या छोट्या पेंग्विन्सना पाहून हरखून जायचं आणि शेवटी क्रिश्टेनबॉश या बोटॅनिकल गार्डनला भेट द्यायची म्हणजे अख्खा दिवस हवा.

याच रस्त्यावर टेबल माऊंटनच्या पायथ्यावर शहरातल्या उच्चभ्रूंचे बंगले आहेत. अर्थात, इथे हॉलीवूडच्या अनेक कलावंतांनीही घर घेऊन ठेवलंय असं आमच्या गाईडने सांगितलं. आणि पैसे असतील तर का नाही घेणार? मागे डोंगर आणि समोर निळाशार देखणा समुद्र. स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो याहून वेगळा असूच शकत नाही.

afrika34523

केप टाऊनला बंदर आहे, वॉटर फ्रन्ट. तिथूनच रॉबेन आयलंडला आपण जातो. बोटीतून सुमारे एक तास प्रवास केल्यावर रॉबेन आयलंडला पोचता येतं. मग बसने आणखी पुढे, प्रत्यक्ष तुरुंग होता त्या ठिकाणी. याच बेटावर वर्णभेदाच्या काळात अनेक कृष्णवर्णीयांबरोबर १९६२ साली अटक झाल्यानंतर नेल्सन मंडेलांना ठेवलेलं होतं. आपल्या तुरुंगवासाच्या २७ वर्षांपैकी तब्बल १८ वर्षं मंडेलांनी इथे काढली. इथलं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे रॉबेन आयलंडचा इतिहास सांगण्यासाठी असलेले गाईड्स हे तिथे काही काळ प्रत्यक्ष तुरुंगवास अनुभवलेले राजकीय कैदी असतात. त्यामुळे त्यांच्या कथनाला एक वेगळी धग असते. प्रत्यक्ष अनुभवाची तीव्रता असते.

केप टाऊनहून वाईन कशी बनते हे पाहण्यासाठीही एकेक दिवसाच्या टूर्स आयोजित केल्या जातात. शहराच्या अवतीभोवतीही खूप काही पाहण्यासारखं आणि करण्यासारखं आहे. तासा दोन तासाच्या अंतरावर असलेल्या ??मध्ये शार्क केज डायव्हिंग करता येतं. म्हणजे बोटीतून आपल्याला समुद्रात नेतात आणि मग एका पिंजर्‍यातून आपण समुद्राच्या खाली जातो आणि प्रत्यक्ष समोर शार्कना पाहतो. तरुण मुलामुलींना साहसी सफर करायची तर दक्षिण आफ्रिकेसारखं ठिकाण नाही असं म्हटलं जातं ते उगीच नाही. मुद्दा आपल्यापाशी किती वेळ आहे हा आहे.

केप टाऊनपासून पार डर्बनपर्यंत समुद्रकिनार्‍याला लागून असलेल्या मार्गाला गार्डन रूट म्हटलं जातं. याच गार्डन रूटवर असलेल्या प्लेटनेनबर्ग बे नावाच्या एका गावात आमचा पुढचा मुक्काम होता. ६०० किलोमीटर्सचा प्रवास कारने पाच तासांमध्ये आम्ही पार केला आणि पुन्हा एकदा निसर्गाने मुक्त हस्ते केलेली उधळण अनुभवली. प्लेटेनबर्गच्या समुद्रामध्ये व्हेल पहायला जाता येतं. आमच्या सुदैवाने आम्हाला एक दोन नव्हे, तब्बल पाच व्हेल्स बघायला मिळाले. प्लेटेनबर्गपासून पाऊण तासावर न्यासना हे आणखी एक बंदराचं अतिशय सुंदर शहर वसलंय. दुसर्‍या दिशेला गार्डन ऑफ इडनमध्ये रंगीबेरंगी पक्ष्यांचं वास्तव्य आहे. मन्की लँड आहे ज्यात तर्‍हेतर्‍हेची माकडं राहताहेत.

समुद्रकिनार्‍याची मजा पोटभर चाखली आणि पोर्ट एलिझाबेथहून आम्ही जोहानसबर्गला कूच केलं. दुपारी तिथे पोहोचल्यानंतर लगेच दुसर्‍या दिवशी कुगरला रवाना झालो. कुगर नॅशनल पार्क हे दक्षिण आफ्रिकेतलं जंगल. २० लाख एकरांवर पसरलेलं. बिग फाईव्ह पहायला इथे जगभरातून येतात. बिबट्या, सिंह, हत्ती, पाणघोडा आणि जंगली रेडे हे ते बिग फाईव्ह, माणूस नावाच्या प्राण्याला धोकादायक असणारे. पण त्या खेरीज जिराफ, झेब्रा, हरणं, काळवीटं, असे अनेक प्राणी आपल्याला इकडे बघायला मिळतात. मुख्य म्हणजे ते इथे आनंदाने रहातात. माणसांकडून शिकार होण्याची भीती या प्राण्यांना अजिबात नसते.

तीन दिवसांच्या कूगर सफारीनंतर पुन्हा जोहानसबर्गला आलो. मुंबईसारखं हे शहर. पण कोणत्याही शहराप्रमाणे हे कसं वसलं याचा वेधक इतिहास आहे. इथल्या सोन्याच्या खाणींमुळे युरोपातून श्रीमंत व्यापारी कसे आले, इथल्या स्थानिक कृष्णवर्णीयांकडून त्यांनी कशी गुलामी करून घेतली हा इतिहास अंगावर काटा उभा करतो. पण आपल्यासाठी या शहराचं मोल आणखी एका गोष्टीसाठी आहे. वकिली करायला म्हणून मोहनदास करमचंद गांधी दक्षिण आफ्रिकेला आले आणि तब्बल २१ वर्षं इथे राहिले. इथे आलेल्या अनुभवांची शिदोरी घेऊन ते भारतात परतले आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व त्यांनी केलं.

जोहानसबर्ग शहरात एक गांधी स्न्वेअर आहे. या चौकात गांधीजींचा वकिलाच्या कपड्यातला एक पुतळा उभा केलाय. शिवाय, कार्लटन हॉटेलच्या ५०व्या मजल्यावर ‘सत्याग्रहाचे हिरोज’ या शीर्षकाखाली एक कायमस्वरुपी प्रदर्शन आहे. इतक्या उंचावरून चारही दिशांना विस्तारलेलं सगळं शहर पाहता पाहता हे प्रदर्शनही बघायचं. तास दोन तास सहज जातात. या शहराचीही सिटी बस टूर आपल्याला वेगवेगळ्या भागांची ओळख करून देते. पण जोहानसबर्गइतकंच महत्त्वाचं आहे सोवेटो हे शहर. वर्णभेदाच्या काळात श्‍वेतवर्णीयांनी सगळ्या कृष्णवर्णीयांसाठी वसवलेलं. अतिशय छोटी छोटी घरं त्यांच्यासाठी बांधून दिली आणि त्यांना तिथे रहायला पाठवून दिलं. नेल्सन आणि विनी मंडेला यांचं घरही इथे आहे. आज तिथे एक सुरेख म्युझियम बनलंय. आर्चबिशप डेसमंड टुटू यांचा टुमदार बंगला आज इथे आहे. आणि शहराचा आजचा चेहरामोहरा बदलून गेलाय. पर्यटकांची गर्दी वाढतेय.

सोवेटोपासून १७ किलोमीटरवर गांधीजींचं टॉलस्टॉय फार्म आहे हे माहीत होतं. पण त्याचा नक्की पत्ता कुणीच सांगत नव्हतं. इथवर आलो आणि टॉलस्टॉय फार्म पहायचं नाही असं कसं चालेल. आमच्या गाडीच्या ड्रायव्हरचं नाव होतं गुडमन. या गुडमननेही कंबर कसली आणि आम्ही मिळून अखेर एका निर्जन माळरानावर असलेलं टॉलस्टॉय फार्म शोधून काढलं. प्रत्यक्ष त्या जागेची झालेली दूरवस्था पाहून निराशा झाली तरी आपण ज्या भूमीवर उभे आहोत तिथे शंभर वर्षांपूर्वी महात्मा गांधी वावरले होते या विचाराने शहाराही आला.

गांधीजी हा इतिहास आहे. आम्हाला प्रत्यक्ष वर्तमानालाही भेटायचं होतं. प्रेटोरिया ही दक्षिण आफ्रिकेची राजधानी. तिथल्याच हॉस्पिटलमध्ये नेल्सन मंडेला गेले महिनाभरापेक्षा जास्त काळ आहेत. आज हे हॉस्पिटल पर्यटकांसाठीच नाही तर खुद्द दक्षिण आफ्रिकेच्या नागरिकांसाठीही तीर्थक्षेत्रासारखं झालंय. कुटुंबच्या कुटुंब इथे येतात, फुलं वाहतात, आपल्या लाडक्या ताता मडिबांसाठी संदेश लिहितात आणि फोटो काढून आपल्या आठवणीसाठी घेऊन जातात.

आमच्यासाठी तर दक्षिण आफ्रिका म्हणजे अनेक आठवणींचा खजिनाच बनलाय. पंधरा दिवसांमध्ये युरोपातल्या चार देशांच्या चार शहरांना भेट देता येते. पण तेवढाच काळ दक्षिण आफ्रिकेसारख्या एकाच देशात घालवता येतो. कदाचित त्यामुळेच या देशाची वेगवेगळी रुपं पहायला मिळाली. इतिहासाच्या आणि भूगोलाच्या पुस्तकांमधले शब्द जिवंत होऊन अनुभवता आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 27, 2013 09:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close