S M L

ब्लॉग : अलविदा कॅप्टन !

Sachin Salve | Updated On: Aug 23, 2013 08:03 PM IST

ब्लॉग : अलविदा कॅप्टन !

sandeep_chavan_Posted by -संदीप चव्हाण, डेप्युटी न्यूज एडिटर, IBN लोकमत

नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यात गोळ्या झाडून हत्या... मंगळवारची सकाळच उजाडली त्या या ब्रेकिंग न्यूजनं... अंधश्रद्धा निर्मूलनासाठी नरेंद्र दाभोलकर यांनी केलेले कार्य अवघ्या देशानं गौरवलं... अंनिस म्हणजेच अंधश्रद्धा निर्मूलन संघटनेचे ते संस्थापक सदस्य... समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी नरेंद्र दाभोलकर यांनी अवघं आयुष्य वेचलं... त्यांचा विचार संपवता येत नाही म्हणून त्यांनाच संपवण्याचा घाट घातला गेला... पण माणूस संपवून त्याचा विचार संपत नाही. विचाराला विचारानंच उत्तर द्यावं लागतं... दाभोलकरांचा हा विचार महाराष्ट्रानं पहिल्यांदा अनुभवला तो खेळाच्या मैदानात. महाराष्ट्रातील आजच्या पिढीला खेळाच्या मैदानातील त्यांचं योगदान फारच कमी लोकांना माहीत असेल.

आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू महाराष्ट्राचे व्हाईस कॅप्टन... बांगलादेशविरुद्धच्या कबड्डी स्पर्धेसाठी भारतीय संघातnarendra dabholekar img 3 निवड झालेले मुंबई-पुण्याबाहेरचे पहिले कबड्डीपटू... कबड्डीतील संघटन कौशल्यासाठी महाराष्ट्र सरकारचा सर्वोच्च असा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारानं सन्मानित... कबड्डीतील बोनस लाईनसाठी आग्रही मांडणी करणारा खंदा प्रशासक. माणूस साप्ताहिकातून आपल्या लेखाद्वारे अनेक खेळाडूंच्या करिअरला नवी दिशा देणारे क्रीडा समीक्षक...

क्रीडा क्षेत्रातील अशी अनेक नानाविविध भूमिका नरेंद्र दाभोलकरांनी भूषविल्या... अभिमानानं मिरवल्या आणि सीमारेषेबाहेर राहून प्रसंगी त्यापासून अलिप्तपणाही दाखवला... खेळाडूपेक्षा खेळ मोठा... खेळातील सचोटी जपण्यासाठी त्यांनी आपले अवघे आयुष्य खर्ची घातले... ते सर्वत्र होते आणि कुठेही नव्हते... मनात आणलं असतं तर त्यांनी कबड्डीतील संघटनेचं मानाचं पद सहज भूषविलं असतं. तेवढा त्यांचा वकूब होता, पण जाणीवपूर्वक ते त्यापासून दूर राहिले... नव्यांना संधी हे त्यांचं ध्येय...

 

त्यांच्या या ध्येयवादातून सातारा, सांगलीकडे कबड्डीची एक नवी पिढी घडली... साता-यातील श्री शिवाजी उदय मंडळ संस्था ही त्यांच्या या कार्याची साक्ष देतेय... या संस्थेची भव्य वास्तू उभारण्यासाठी त्यांनी घेतलेले श्रम सातारकर कधीच विसरू शकणार नाही.

narendra dabholekar img 2कबड्डीतील पहिला अर्जुन पुरस्कार ज्या सदा शेट्ये यांना मिळाला त्यांची प्रतिक्रिया खूपच बोलकी होती. सदा शेट्ये म्हणतात... खेळात हारजीत ही असतेच, पण त्यापलीकडेही खेळाकडे सचोटीनं पाहण्यास नरेंद्र दाभोलकर यांनी शिकवले... त्यांच्यासारख्या व्यक्तीनं माणूस साप्ताहिकात माझ्यावर लिहिलेला लेख हा मी माझा बहुमान समजतो... नरेंद्र दाभोलकर म्हणजे कबड्डीतील सचोटी... हे सांगताना पाणावलेले सदा शेट्ये यांचे डोळे नरेंद्र दाभोलकरांचं खेळातील त्यांच्या योगदानाची साक्ष देणारे...

नरेंद्र दाभोलकरांचं सगळ्यात मोठं योगदान जर क्रीडा क्षेत्रात काय असेल तर त्यांनी क्रीडा क्षेत्रातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी आपलं आयुष्य वेचलं. खेळातील अपप्रथा दूर करण्यासाठी ते झटले... अवघा महाराष्ट्र त्यांना यासाठी सदैव ओळखत राहील...

नरेंद्र दाभोलकर मरत नसतात, प्रत्येक विचारागणिक ते जिवंत असतात... आपल्यात... तुमच्यात... आपणा सगळ्यात... आपल्यातील नरेंद्र दाभोलकर आपण मरून देता कामा नये हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 22, 2013 03:07 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close